"तुमच्यासारखे देशद्रोही माणसं भारतात असल्यामुळेच..."; चित्रा वाघ यांचा नाना पटोलेंवर घणाघात
12-Jun-2025
Total Views | 52
मुंबई : तुमच्यासारखे देशद्रोही माणसं भारतात असल्यामुळेच पाकिस्तानचं फावतंय, असा घणाघात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काँग्रेस नेते नाना पटोलेंवर केला आहे. नाना पटोलेंनी ऑपरेशन सिंदूरबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून त्यांनी पटोलेंना खडेबोल सुनावले.
चित्रा वाघ म्हणाल्या की, "नानांच्या नाना कळा आणि पाकिस्तान्यांचा यांना भलताच कळवळा? ऑपरेशन सिंदूर हा पहलगाममध्ये ज्या ज्या मातांचे कुंकू पुसले गेले त्याचा हुंकार होता. आपल्या भारतीय सैनिकांनी जीव पणाला लावून, दहशतवादाविरुद्धा उभे राहून मोठ्या शौर्याने त्यांच्या घरात घुसून मारले,त्या शौर्याला तुम्ही लहान मुलांच्या कंप्युटर गेमची उपमा देत आहात. तुमच्या बुद्धीची कीव येते. राजकारणासाठी आणखी किती नीच पातळी तुम्ही गाठणार आहात?" असा सवाल त्यांनी केला.
'त्या' काँग्रेस नेत्यांना कंप्युटर गेम प्लेअर म्हणणार का?
"नुकतेच विशेष सर्वपक्षीय मंडळाने ३० देशांमध्ये जाऊन आपल्या देशाची भूमिका मांडली. पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर उघड केला. दहशतवादाविरोधातील भारताची भूमिका तुमच्या काँग्रेस पक्षातील काही मान्यवरांनी जगासमोर मांडली. मग त्यांना कंप्युटर गेम प्लेअर म्हणून तुम्ही त्यांची अवहेलना करणार आहात का? तुमच्यासारखे देशद्रोही माणसं भारतात असल्यामुळेच पाकिस्तानचं फावतंय. तुमचे राहुल गांधी परदेशात जाऊन सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागतात आणि तुम्ही जवानांच्या शौर्याची आणि माता भगिनींच्या दु:खाची चेष्टा करत आहात. एकंदरीत काय तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच असून तो डीएनए देशद्रोहाचा आहे. काँग्रेसचा हात आणि दहशदवादाला साथ हेच आता वारंवार सिद्ध होत आहे," अशी टीकाही चित्रा वाघ यांनी नाना पटोलेंवर केली आहे.