बीड : (Santosh Deshmukh Case) मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याच्या दोषमुक्तीच्या अर्जाच्या याचिकेवर मंगळवार दि. २२ जुलैला बीड जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली यावेळी न्यायालयाने कराडच्या दोषमुक्तीचा अर्ज फेटाळून लावला. या निर्णयामुळे खटल्याला गती मिळण्याची शक्यता आहे.
मागील झालेल्या सुनावणीदरम्यान वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जावर आणि संपत्ती जप्तीबाबत युक्तिवाद झाला होता. विशेष सरकारी वकील उज्जवल निकम यांनी त्याला जोरदार विरोध केला. दरम्यान न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर त्यावरील निर्णय राखून ठेवला होता. मंगळवारी झालेल्या सुनावणीत यावर चर्चा झाली. यावेळी वाल्मिक कराडने केलेल्या दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाकडून फेटाळण्यात आला आहे. मात्र, कराडच्या संपत्ती अर्जावरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला आहे.
उज्जवल निकम यांची प्रतिक्रिया
"वाल्मिक कराडने संतोष देशमुखांच्या खटल्यातून दोषमुक्त करण्यासंदर्भात दिलेला अर्ज दिला होता. तो अर्ज आज न्यायालयाने फेटाळला आहे. अर्ज फेटाळल्यानंतर दुसरा आरोपी विष्णू चाटे आणि इतर सर्व आरोपींनी आम्हाला या खटल्यातून वगळावे, दोषमुक्त करावे अशा प्रकारे अर्ज केला. तसेच वाल्मिक कराडने जामिनावर मुक्तता करावी असादेखील अर्ज केला. त्यावर देखील आम्ही आमचे म्हणणे मांडून विरोध केला आहे. आज न्यायालयात ड्राफ्ट चार्ज करून वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांविरोधात वेगवेगळ्या कलमांखाली १२ ते १३ आरोप निश्चित केले जावे, असा विनंती अर्ज केला आहे. या अर्जाची सुनावणी पुढे होणार आहे. देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींनी जे दोषमुक्तीचे अर्ज केले आहेत ते उशिरा दाखल केले आहे. आरोपपत्र दाखल केल्यानंतर दोन महिन्यात अर्ज करणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी तो अर्ज केला नव्हता. न्यायालयाने हे अर्ज फेटाळावे, अशी देखील आम्ही मागणी केली आहे. आता ४ ऑगस्ट रोजी यावरील पुढील सुनावणी होणार आहे", अशी माहिती उज्जवल निकम यांनी दिली आहे.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\