मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी शेतकऱ्यांसाठी नव्या योजनेची घोषणा! कृषीमंत्र्यांची माहिती

    22-Jul-2025
Total Views | 46




नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसादिनी राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने नव्या योजनेच्या अंमलबजावणीची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांसाठी ही 'कृषीसमृद्ध' भेट असल्याचे कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी मंगळवार, २२ जुलै रोजी जाहीर केले. त्यांनी नाशिक येथे माध्यमांशी संवाद साधला.

मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की, "महाराष्ट्रातील शेतकरी राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा घटक आहे. राज्याच्या कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणुकीस प्रोत्साहन देण्याकरीता अर्थसहाय्य करण्यासाठी कृषी विभागामार्फत नव्यानेच योजना जाहीर करण्यात आली आहे. कृषी समृद्धी योजनेसाठी निधी उपलब्ध करुन देण्यास सन २०२५-२६ पासून पुढील ५ वर्षांमध्ये दरवर्षी ५ हजार कोटी रुपये अशी एकूण २५ हजार कोटींची तरतूद करण्यास मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे."

"कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण करणे, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढविणे, पीक विविधीकरण करणे, मूल्य साखळी बळकट करणे, तसेच हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे, हा कृषी समृद्धी योजनेचा मुख्य उद्देश आहे. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कृषी समृद्धी योजनेमुळे माझ्या शेतकरी बांधव-भगिनींच्या जीवनात खऱ्या अर्थाने समृद्धी येईल," असा विश्वास मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केला.




'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121