छोट्या ताराची मोठी गोष्ट

    28-Jul-2025
Total Views |

ताडोबातील माया वाघिणीची कहाणी फारच प्रसिद्ध. मायामुळे काही वेळा ताडोबाच्या भूमीवर अधिराज्य गाजवणार्‍या इतर वाघिणींच्या चुरसकथा झाकोळल्या गेल्या. यामधीलच एक वाघीण म्हणजे छोटी तारा. तिची कहाणी सांगणारा हा लेख...

ताडोबाच्या मोहर्ली भागात 2009 साली येडाअण्णा नामक वाघ आणि तारा ऊर्फ लक्ष्मी नामक वाघिण या जोडीने तिसर्‍यांदा पिल्ले जन्माला घातली. एकूण पिल्ले जन्मली चार. नाव मिळाले ऊखान, सर्किट, छोटी तारा आणि इमली. पुढे पिल्लांची ही गँग ‘सर्किट गँग’ म्हणून प्रसिद्ध झाली. यामधील फक्त छोटी तारा ताडोबाच्या जामनी भागात स्थिरावली आणि ताडोबाच्या एक नव्या अध्यायाला सुरुवात झाली.

2013 ते 2025 या गेल्या 12 वर्षांत छोटी तारा या वाघिणीने तब्बल सात वेळा पिल्लांना जन्मास घातले आहे. गब्बर, सॅटर्न ऊर्फ नामदेव, टायसन, मटकासुर, रुद्र, युवराज, मोगली या प्रबळ नर वाघांचा वंश तिने वृद्धिंगत केला आहे. 2016 मध्ये तिने मटकासुरच्या दोन राजकुमारांना जन्म दिला. त्यांची नावे होती ताराचंद आणि छोटा मटका. आज छोटा मटका ताडोबाच्या ईशान्य भागात आपली एकहाती सत्ता चालवत आहे. त्यानेही आपल्या आईप्रमाणे त्याच्या राण्या बबली, झरनी आणि भानुसखिंडीच्या मुलांची काळजी घेऊन त्यांना मोठे केले आहे. आज त्याची मुले आपापल्या प्रदेशांवर आपली वहिवाट लावत आहेत.

मायाच्या अचानक अदृश्य झाल्यानंतर छोटी ताराच्या मुली रोमा आणि बिजली या ताडोबाच्या भागात स्थिरावल्या. छोट्या ताराने आपल्या मुलीसाठी म्हणजेच बिजलीसाठी जामनी तलावाचा भाग सोडून दिला. युवराजसोबत मिलन करून झालेल्या एका पिल्लासोबत बिजलीने त्याचवेळी आपल्या आईने जन्मास घातलेले एक पिल्लू वाढवले. एकाअर्थी यातून बिजलीने आपल्या आईच्या उपकाराची परतफेड केली म्हणा. एकत्रित वाढलेल्या पिल्लांची ही जोडी पुढे ताडोबाचे मामा-भाचे म्हणून प्रसिद्ध झाली. तिकडे रोमाने ताडोबा तलावाचा भाग आपल्या ताब्यात घेतला.

आज छोटी तारा आपल्या दोन पिल्लांसह ताडोबाच्या पांढरपौनी भागावर राज्य करत आहे. जिथे आजपर्यंत मायाची वंशावळ होती, अशा ताडोबाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागात आज वयाच्या 15व्या वर्षी ती तिच्या दोन राजकन्यांना वाढवत आहे. त्यांची सुरक्षितता निश्चित करत आहे. आज ताडोबात नर वाघांची वंशावळ वेगवेगळी असली, तरी माधुरी आणि छोटी तारा यांनी ताडोबाला खर्‍या अर्थाने समृद्ध केले आहे. आता गात्र थकली आहेत, पण तरी अजून तिची जबाबदारी संपलेली नाही. तिच्या मुलींना अजून पुढचे सात ते आठ महिने वाढवायला, त्यांना युद्धाचे आणि शिकारीचे धडे द्यायला तिला ठाम उभे राहावेचे लागेल. उद्या या मुली वसंत बंधारा, चिकलवाही, पांढरपौनी आणि ऐनबोडीच्या क्षेत्रात नव्याने राज्य करतील. ताडोबाच्या राज्यात जितकी चर्चा मायाची झाली, जितके प्रेम मायाच्या वाट्याला आले, तितके छोट्या ताराच्या वाट्याला क्वचितच आले असेल. पण ती शांतपणे आपले काम करत राहिली. छोट्या ताराने पुढे आईचा वारसा चालवत आपला वंश वृद्धिंगत करण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली असून ताडोबाच्या इतिहासात आपले नाव अजरामर केले आहे.

छोट्या ताराचा छोटा मटका

काही महिन्यांपूर्वी प्रकाशझोतात आलेला छोटा मटका हा वाघ छोट्या ताराचाच मुलगा. मटकासुरासोबत प्रजनन करून छोट्या ताराच्या पोटी जन्मास आलेला छोटा मटका हा वडिलांनी स्थिर साम्राज्याच्या गादीवर बसेल, असे वाटत होते. मात्र, तसे घडले नाही. छोटा मटक्याची तारुण्यातील वर्षे रक्तरंजित होती. 2021च्या पावसाळ्यात छोटा मटका हा मोगलीकडून अतिशय वाईट पद्धतीने जखमी झाला. त्यावेळी मोगली ताडोबाच्या ईशान्य भागाच्या अलिझंजा भागात राज्य करत होता. एप्रिल, 2022 मध्ये अलिझंजा नवेगाव भागावर छोटा मटकाने आपला वरचष्मा निर्माण केला आणि मोगलीला हद्दपार केले. आईसारखा सज्जन, धीरगंभीर आणि वडिलांसारखा शूर असा छोटा मटका हा आज ताडोबाचा सर्वांत मोठा वाघ आहे. त्याच्या समकालीन नर वाघांच्या तुलनेत सगळ्यात मोठा प्रदेश त्याच्याकडे आहे. तो अलिझंजा, नवेगाव रामदेगी, निमढेला ते अगदी कोअर झोनमध्ये काळा आंबापर्यंत राज्य करत आहे. बबली, भानुसखिंडी आणि झरनी या त्याच्या भागातील तीनही राण्यांच्या मुलांची सुरक्षा त्याने सुनिश्चित केली आहे. त्यांपैकी चांदनी, चंदा आणि नयनतारा या त्याच्या मुली त्याच्याच राज्यात त्यांच्या त्यांच्या आईचा भाग घेऊन स्थिरावल्या आहेत.

अक्षता बापट
(लेखिका वन्यजीव निरीक्षक आहेत.)