छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांमध्ये त्यांचा जाज्वल्य इतिहास जिवंत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    22-Jul-2025
Total Views | 8


मुंबई : छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांमध्ये त्यांचा जाज्वल्य इतिहास जिवंत आहे. या किल्ल्यांना आता जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोने दर्जा देणे ही अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सोमवार, २१ जुलै रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे मुंबई भाजपच्या वतीने आयोजित कर्तव्यपूर्ती सोहळ्यात ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आल्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी ज्येष्ठ संगीतकार पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर, जेष्ठ गायिका उषा मंगेशकर, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, आ. संजय उपाध्याय, आ. प्रवीण दरेकर, आ. प्रसाद लाड, आ. कालिदास कोळंबकर, आ. अमित साटम यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात मराठी गीते, पराक्रमी पोवाडे, स्मृतिगीते आणि ‘जाणता राजा’ महानाट्यातील शिवराज्याभिषेकाचा थरारक देखावा सादर करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आपल्या सर्वंकरिता हा अभिमानाचा दिवस आहे. आपल्या राजाचे कार्य नेहमीच वैश्विक होते. तरीसुध्दा वैश्विक संस्थेने त्यांच्या वैश्विकतेला मान्यता देणे, ही मोठी गोष्ट आहे. युनेस्कोमध्ये नामांकनासाठी विविध राज्यांनी विविध स्थळे सुचवली. आपण महाराष्ट्राच्या वतीने हे १२ किल्ले सुचवले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही नावे पाठवली. आशिष शेलार यांच्या नेतृत्वातील टीमने तांत्रिक प्रेझेंटेशन केले. या किल्ल्यांची रचना आणि स्थापत्यसोबतच त्यांची प्राचीनतादेखील आपण मांडली. युनेस्कोच्या टीमला डोंगरदऱ्यांमध्ये असलेली या किल्ल्यांची रचना भावली. या किल्ल्यांवर विविध प्रकारची स्थापत्य रचना करण्यात आली हे त्यांनी पाहिले.

"या सगळ्या किल्ल्यांचे स्थापत्य, त्यात वापरलेली साधनसामग्री यामुळेसुद्धा त्यांचे वेगळेपण युनेस्कोच्या लक्षात आले. रायगडासारखा अभेद्य किल्ला महाराजांनी बांधला आहे. नाशिकपासून चेन्नईपर्यंत आणि जिंजीपर्यंत हे स्वराज्य पसरले होते आणि महाराज रायगडावरून प्रशासन चालवत होते. छत्रपती शिवरायांनी उभ्या केलेल्या परंपरेमुळेच त्यांनी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर पुढच्या काळात मराठ्यांनी हिंदवी स्वराज्य उभे केले. महाराजांना कमी आयुष्य मिळाले. अनेकांना वाटत होते की, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनंतर स्वराज्य समाप्त होईल. त्याकरिता औरंगजेब महाराष्ट्रात आला. मात्र, औरंगजेब समाप्त झाला पण साम्राज्य समाप्त झाले नाही. त्यानंतर १०० वर्षे संपूर्ण भारतात हिंदवी स्वराज्य स्थापित झाले आणि देव देश आणि धर्माची रक्षा करत राहिले. या जाज्वल्य इतिहासाचा वारसा चालवणारे आपण सगळे आहोत. हा इतिहास ज्या भिंतींमध्ये जिवंत आहे ते छत्रपती शिवरायांचे किल्ले आहेत. या किल्ल्यांना आता जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोने दर्जा देणे, ही संपूर्ण भारतासाठी आणि मराठी माणसासाठी अभिमानाची बाब आहे," असेही ते म्हणाले.

काही जणांकडून अडचण आणण्याचा प्रयत्न!

मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "देवेंद्रजींच्या अथक परिश्रमामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडकिल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मानांकन मिळाले. महाराजांचा पराक्रम अद्वितीय, अतुलनीय आहे. त्यांनी जगासमोर युद्धनीती, शौर्य यासोबतच राज्यकारभार कसा चालवला पाहिजे याची मोहिनी टाकणारा हा राजा आहे. याच राजाच्या १२ गडकिल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मानांकन मिळाले. माझ्या महाराजांची महती आणि कर्तृत्व जगाला माहित आहे. पण झारीतील शुक्राचार्य सातत्याने यात अडचण येण्यासाठी मनोकामना करत होते. आपल्याकडे सगळे पुरावे होते," असे ते म्हणाले.




'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121