मंत्र्यांनी असे वक्तव्य करणे अतिशय चुकीचे! माणिकराव कोकाटेंच्या 'त्या' वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
22-Jul-2025
Total Views | 13
मुंबई : मंत्र्यांनी असे वक्तव्य करणे अतिशय चुकीचे आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. शासन भिकारी आहे, शेतकरी नाही, असे वक्तव्य माणिकराव कोकाटे यांनी केले होते. यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांना फटकारले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "ते काय बोलले ते मी ऐकलेले नाही. परंतू, जर त्यांनी असे वक्तव्य केले असेल तर मंत्र्यांनी असे वक्तव्य करणे अतिशय चुकीचे आहे. पीक विम्यासंदर्भात आपण जाणीवपूर्वक निर्णय घेतला आणि त्याची पद्धत बदलली. कारण पीक विम्यात काही वर्षांमध्ये जरी शेतकऱ्यांना फायदा झाला तरी बहुतांश वर्षांमध्ये त्याचा अधिक फायदा हा कंपन्या घेत आहेत, हे आपल्या लक्षात आले. त्यामुळे त्याची पद्धती बदलली. ती पद्धती बदलत असताना आपण दुसरा निर्णय हा घेतला की, शेतकऱ्यांना मदत तर करूच, त्यासोबत दरवर्षी ५ हजार कोटी रुपये शेतीमध्ये आपण गुंतवणूक करू आणि त्याची यावर्षीपासून सुरुवातदेखील केली आहे. ५ वर्षात २५ हजार कोटी रुपये शेतीतील गुंतवणूक आपण वाढवत आहे. त्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य काही योग्य नाही. देशातील कुठल्याही राज्याच्या अर्थव्यवस्थेत आजही सगळ्यात चांगली अर्थव्यवस्था महाराष्ट्राची आहे," असे ते म्हणाले.
"शासन शेतकऱ्यांकडून एक रुपया घेते. आम्ही शेतकऱ्याला एक रुपया देत नाही. त्यामुळे शासन भिकारी आहे. शेतकरी नाही. एक रुपया ही किंमत फार थोडी आहे. एक रुपयाच्या विम्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाच-साडेपाच लाख बोगस अर्ज माझ्याच काळात सापडले. मी ते बोगस अर्ज तत्काळ रद्द केले आणि नव्याने घोषणा केल्या," असे विधान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले होते.