आफ्रिकन चित्त्यांची पहिली तुकडी लवकरच भारतात दाखल होणार
शनिवारी दि. १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण
13-Sep-2022
Total Views | 99
मुंबई(प्रतिनिधी): नामिबियातून येणारी चित्यांची पहिली तुकडी १७ सप्टेंबर रोजी मध्यप्रदेशातील श्योपूर येथील कुनो राष्ट्रीय उद्यानात आणली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसादिवशी म्हणजेच १७ सप्टेंबर रोजी जयपूरमार्गे मध्य प्रदेशातील कुनो-पालपूर राष्ट्रीय उद्यानात तब्बल आठ चित्ते आणण्यात येणार आहेत. चित्ता रीइंट्रोडक्शन कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान मोदी यापैकी तीन चित्त्यांना त्याच दिवशी उद्यानात सोडतील.
कुनो राष्ट्रीय उद्यानात आठ चित्ते दाखल होणार आहेत, त्यापैकी पाच मादी आणि तीन नर चित्त्यांचा समावेश आहे. शनिवारी दि.१७ सप्टेंबरच्या सकाळी चित्त्यांना चार्टर्ड कार्गो विमानातून आणण्यात येणार आहे. हे चित्ते नामिबियाची राजधानी विंडहोक येथून जयपूरला आणण्यात येतील आणि त्यानंतर हेलिकॉप्टरने पालपूरला पाठवले जातील. कुनो नॅशनल पार्क येथे विशेष हेलिपॅड बांधण्यात आले आहे. पहिले ३० दिवस चित्त्यांना विलगीकरणात ठेवले जाणार आहे. त्यांच्या आरोग्याची आणि इतर बाबींवर लक्ष ठेवण्यात येईल. पशुवैद्यकीय चाचणीनंतर त्यांना त्यांचा राखीव जागेत सोडण्यात येईल. चित्ता भारताच्या हवामानाशी जुळवून घेत आहेत की नाही या सर्व गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातील कुनो नॅशनल पार्कमध्ये "चीता रीइंट्रोडक्शन" प्रकल्पाचे उद्घाटन करतील.
भारतात 'आफ्रिकन चित्ता' आणण्यासाठी या वर्षी जून महिन्यात भारत आणि नामिबिया यांनी सामंजस्य करार केला. त्या अनुषंगाने हे चित्ते भारताच्या ७५व्या स्वंतंत्र्य दिनानिमित्त दि. १५ ऑगस्टच्या आधी मध्यप्रदेशच्या पालपूर कुनो राष्ट्रीय उद्यानात आगमन होणार होते. केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव आणि उपपंतप्रधान आणि नामिबियाचे परराष्ट्र मंत्री नेतुम्बो नंदी-नदैतवाह यांनी नवी दिल्लीत या करारावर स्वाक्षरी केली होती. या सामंजस्य करारात वन्यजीव संरक्षण आणि जैवविविधतेच्या शाश्वत वापरावर भर देण्यात आला आहे.
आशियाई चित्ता भारतातून १९५२मध्ये नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले होते. आता तब्बल ७० वर्षांनी भारतात आफ्रिकन चित्ता आणण्याची योजना करण्यात आली आहे. १९४७मध्ये, भारतात आशयाई चित्ताच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले होते, परंतु छत्तीसगडच्या सुरगुजा राज्यातील महाराजा रामानुज प्रताप सिंग देव यांनी उरलेल्या तीन चित्त्यांना ठार मारल्याची नोंद आहे. सध्या आशियाई चित्ते फक्त इराणमध्येच अस्तित्वात आहेत. सावनाह प्रदेश परिसंस्थेत प्रमुख प्रजाती म्हणून चित्ता ही प्रजाती परत आणून व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. तसेच कालांतराने पर्यटनातून स्थानिक समुदायाची उपजीविका मोठ्या प्रमाणात वाढेल असा विश्वास भूपेंद्र यादव यांनी व्यक्त केला आहे.