चहावाल्याच्या मुलाची रुपेरी भरारी

    26-Aug-2022   
Total Views |

mans 
 
 
आर्थिक पाठबळ नसतानाही तो डगमगला नाही. दुखापत झाली तरीही थांबला नाही. अखेर चहावाल्याच्या मुलाने, संकेत सरगरने जागतिक पातळीवर रूपेरी यश मिळवलेच. त्याच्याविषयी...
 
 
नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंडच्या बर्मिंगहॅम येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये महाराष्ट्राच्या संकेत महादेव सरगरने ‘वेटलिफ्टिंग’मध्ये 55 किलो वजनी गटात रौप्यपदकाला गवसणी घातली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक पटकावणारा संकेत हा भारताचा पहिला खेळाडू ठरला. त्याच्या पदकानेच स्पर्धेतील भारताच्या पदकांचे खात उघडले गेले. दुर्दैवाची बाब म्हणजे, अवघे एक किलो वजन उचलण्यात तो कमी पडल्याने त्याचे सुवर्णपदक हुकले. अंतिम फेरीमध्ये असताना तो जखमी झाला. तरीही संकेतने हार मानता आपला तिसरा प्रयत्न पूर्ण केला. त्यामुळे तो आणखी गंभीर जखमी झाला. परंतु, तिसर्‍या प्रयत्न यशस्वी ठरल्याने त्याचे रौप्यपदक निश्चित झाले.
 
 
दि. 16 ऑक्टोबर, 2000 साली सांगली शहरात जन्मलेल्या संकेतने अवघ्या 21व्या वर्षी रूपेरी कामगिरी करत देशाची मान उंचावली. दरम्यान, ‘क्लीन एंड जर्क’मध्ये केवळ एक किलो वजन उचलण्यात कमी पडले, अन्यथा संकेत सुवर्णपदकाचा मानकरी ठरला असता. संकेत सरगर हा तब्बल तीन वेळा राष्ट्रीय चॅम्पियन राहिला असून गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या राष्ट्रमंडल चॅपियनशिपमध्येदेखील त्याने रौप्यपदक पटकावले होते. यंदाच फेब्रुवारी महिन्यात ‘सिंगापूर वेटलिफ्टिंग इंटरनॅशनल’ स्पर्धेत 256 किलो (स्नैचमध्ये 113 किलो आणि ‘क्लीन एंड जर्क’मध्ये 143 किलो) वजन उचलून राष्ट्रकुल आणि राष्ट्रीय विक्रम त्याने मोडित काढला होता.
 
 
संकेतचा हा प्रवास इतका सोपा मुळीच नव्हता. त्यासाठी त्याने आणि त्याच्या कुटुंबीयांनीदेखील मोठा संघर्ष केला. वयाच्या 13व्या वर्षीच संकेतने ‘वेटलिफ्टिंग’ क्षेत्रात पहिले पाऊल टाकले. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठातून शिक्षण घेत असताना त्याने अनेक स्पर्धांमध्ये यशस्वी कामगिरी केली. सांगली शहरातील संजय नगर परिसरात वास्तव्यास असलेले संकेतचे वडील महादेव सरगर हे एक छोटे व्यावसायिक. लव्हली पार्क येथे ते चहा आणि भजी विक्रीची व्यवसाय करतात. शेजारीच त्यांची एक पानटपरीसुद्धा आहे. मुलाने रूपेरी यश मिळवले तेव्हा ते चहाच्या गाड्यावरच काम करत होते. या गाड्यावरच सरगर कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो.
 
 
महादेव यांना तीन मुले असून त्यामध्ये संकेत हा मोठा मुलगा. मूळचे आटपाडी तालुक्यातील असलेले सरगर हे व्यवसाय करण्याच्या उद्देशाने सांगली शहरामध्ये स्थायिक झाले. संकेतच्या वडिलांनी अतिशय कष्टातून संसार उभा केला. हलाखीची परिस्थिती सावरण्यासाठी त्यांना भजी आणि चहाच्या गाड्याचाच आधार आहे. या व्यवसायात महादेव यांना त्यांच्या पत्नीचेही मोलाचे सहकार्य मिळते. तसेच, वेळ मिळेल तसा संकेतही त्यांना मदत करतो.
 
 
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही महादेव यांनी संकेतला पाठबळ आणि प्रोत्साहन दिले. गरिबीचे चटके सहन करत असताना संकेतने मागे वळून पाहिले नाही. प्रशिक्षक मयूर सिंहासने यांचेही त्याला मोलाचे मार्गदर्शन मिळाले. त्याने ‘दिग्विजयल वेटलिफ्टिंग स्कूल’मध्ये सराव केला. दुखापतींनी घेरले गेले असतानाही त्याची जिद्द आणि आत्मविश्वास कायम होता. आपला सराव त्याने सातत्याने सुरूच ठेवला आणि त्याचबरोबरीने आपल्या कामगिरीला त्याने दिवसेंदिवस उंचावत नेले. त्याच्या आई-वडिलांनीही त्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. सरगर कुटुंबीयांनाही ‘लॉकडाऊन’चा फटका बसला, तरीही संकेतचा सराव काही थांबला नाही.
 
 
परिस्थिती विपरित असतानाही संकेतने मलेशिया आणि श्रीलंकेच्या खेळाडूंना नमवून रौप्यपदकावर नाव कोरले. तब्बल 50 वर्षांनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूने ‘वेटलिफ्टिंग’मध्ये रौप्यपदक पटकावले, ही नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे. दरम्यान, त्याची बहीण काजल सरगर हीनेसुद्धा हरियाणात पार पडलेल्या ‘खेलो इंडिया युथ गेम्स’ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. त्यावेळी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये तिचे विशेष कौतुक केले.
 
 
इतक्या कमी वयात संकेतने इतका मोठा यशस्वी टप्पा पार केला आहे. परिस्थितीसमोर गुडघे न टेकवता त्याने आपली मेहनत थांबवली नाही. अनेक अडथळ्यांचा सामना करत त्याने सांगलीला जागतिक पातळीवर एक नवी ओळख मिळवून दिली.
‘वेटलिफ्टिंगमध्ये 61 किलो वजनी गटातून खेळणे आणि आगामी 2024 साली पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे त्याचे लक्ष्य आहे. महाराष्ट्राची आणि देशाची मान अभिमानाने जागतिक पटलावर उंचावणार्‍या या महाराष्ट्राच्या मराठी मातीतील सुपुत्राला त्याच्या आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.