अमरावती : "हनुमान चालीसा म्हटली म्हणून तुरुंगात डांबणारे सरकार आत गेले आहे आणि हे सरकार हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांचा सत्कार करणारे सरकार आहे" असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारवर प्रहार केला. हनुमंताचा जयजयकार करणे महाराष्ट्रात जेव्हा पाप झाले होते तेव्हा तुरुंगात टाकले तरी चालेल पण हनुमान चालीसा म्हणणारच असे म्हणत ज्यांनी वेळप्रसंगी १४ दिवस तुरुंगात राहून हाल सहन केले त्या राणा दाम्पत्याचा मला अभिमान आहे असे म्हणत राणा दाम्पत्याची पाठराखण देखील केली. राणा दाम्पत्याकडू आयोजित दहीहंडी कार्यक्रमाला उपमुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमाला भाजपनेते चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते.
आधीचे सरकारला फक्त लोकांना घरात डांबून ठेवण्यातच रस होता, पण आता आपले सरकार आले आहे, तेव्हा कसे मोकळे वाटत आहे असे म्हणून फडणवीसांनी महाविकास आघाडीचा समाचार घेतला. आता आपले सर्व सण उत्साहातच साजरे होणारच असेही सांगितले. दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने आत सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे जे आता आपल्याला टिकवायचे आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्या प्रमाणे देशातील शेवटच्या माणसापर्यंत आपल्याला विकास पोहोचवायचा आहे, तेच स्वप्न नवनीत राणा आणि रवी राणा यांनी बघितले आहे. ते स्वप्न पूर्ण कारण्यासाठी आम्ही सर्वच तुमच्या पाठीशी आहोत असेही फडणवीसांनी सांगितले. आता मागे वळून पाहायचे नाही, आत विकासाच्या मार्गावरपुढेच जायचे आहे, आज आपण सर्वजण विकासाची दहीहंडी फोडू असा दावा देखील उपमुख्यमंत्र्यांनी केला.