अमरावती :देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातले मुख्यमंत्री आहेत, असं वक्तव्य खासदार नवनीत राणा यांनी अमरावती येथील सभेत केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्तृत्वाचा डंका महाराष्ट्रात तर वाजतोच आहे, पण इतर राज्यातही त्यांच्या कामाचं कौतुक होतं. समाजातील घटकांना न्याय देण्याची त्यांची भूमिका आणि धडाकेबाज कामासाठी फडणवीस नेहमी आपले वाटतात. सगळ्यांसाठी ते उपमुख्यमंत्री असतील पण आमच्या मनातील मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच आहेत, असे वक्तव्य नवनीत राणा यांनी केले आहे.
विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. अमरावतीसाठी पदवीधर मतदार संघातून डॉ. रणजीत पाटील यांना भाजपने निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यांच्या प्रचारार्थ अमरावतीच्या दसरा मैदानावर भाजप नेत्यांची सभा पार पडली. यावेळी राणा म्हणाल्या,"देवेंद्र फडणवीस यांचं जिथे जिथे पाऊल पडलं मग गुजरात असो वा गोवा तिथे भारतीय जनता पक्षाला नेत्रदीपक यश मिळालं. फडणवीस यांचं काम बोलतं. त्यांच्या कामाची स्टाईल धडाकेबाज आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा डंका महाराष्ट्रात तर वाजतोच आहे, पण इतर राज्यातही त्यांच्या कामाची चर्चा होते. तसेच त्यांच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे, असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत.
दरम्यान, नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना भाजपमध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न असेल. खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, असं म्हणत बावनकुळेंनी राणा दाम्पत्याला ऑफर दिली.या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ. अनिल बोंडे,शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव, आमदार प्रवीण पोटे ही उपस्थित होते.