रशिया आणि इराणचे बदलते संबंध

    16-Aug-2022   
Total Views |
 
rs
 
 
 
युक्रेनमध्ये रशियाने केलेल्या लष्करी आक्रमणानंतर पहिल्याच दौर्‍यात व्लादिमीर पुतिन यांनी नुकतीच इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांची भेट घेतली. पुतिन यांचा हा दौरा मध्य आशियाई क्षेत्रांच्या बाहेरचा दौरा होता. या दौर्‍यादरम्यान प्रवासादरम्यान पुतिन यांनी तेहरानमध्ये तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप अर्देगान यांचीही भेट घेतली.
 
 
युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर ‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’ म्हणजेच ‘नाटो’च्या नेत्याशी पुतिन यांची पहिलीच वैयक्तिक भेट झाली. तुर्कस्तान हा ‘नाटो’ संघटनेचा सदस्य देश आहे. रशिया आणि इराण या दोघांचेही अमेरिकेसोबत काही काळासाठी शत्रुत्वाचे संबंध असले तरी या दोन्ही देशांनी एकमेकांशी संबंध फारसे सलोख्याचे करण्याचा प्रयत्न केला नव्हता. मात्र, आता आंतरराष्ट्रीय स्तरावर रशिया काहीसा एकटा पडला आहे. त्यातच रशियावर अनेक निर्बंध घातले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर पुतिन यांच्या इराण भेटीकडे रशियाला बहिष्कृत करून शिक्षा देण्याच्या पाश्चात्य देशांच्या प्रयत्नांना विरोध म्हणून पाहिले जाऊ शकते.
 
 
महत्त्वाचे म्हणजे, इराणने युक्रेनमधल्या युद्धाला पाठिंबा दिला आहे. इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांनीच स्पष्ट शब्दांत रशियाच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. खामेनी यांनी युद्धात अडकलेल्या लोकांच्या दुरवस्थेबद्दल असंतोष व्यक्त केला. मात्र, युक्रेनच्या बाबतीत रशियाने पावले उचलली नसती तर पाश्चिमात्य देशांनीच रशियासोबत संघर्ष उकरून काढला असता, असेही त्यांनी म्हटले आहे. इराण आणि रशिया हे जागतिक ऊर्जा बाजारपेठेत एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत. अरब देश आणि इस्रायलशी संबंध वाढवण्याच्या प्रयत्नात पुतिन हे याआधीही इराणशी पूर्ण युती करण्यापासून दूर राहिले होते.
 
 
इराण आणि रशिया या दोन्ही देशांनी, ‘पाश्चिमात्य कमोडिटी विक्री’तून होणारे नुकसान कमी करण्यासाठी नेहमीच आशियाई बाजारपेठांकडे पाहिले आहे. असे असले तरी आशियामधल्या बाजारपेठेतला आपला हिस्सा बळकावण्यासाठी रशिया आणि इराण एकमेकांशी लढत आहेत. पाश्चिमात्य देशांसोबतचे संबंध ताणले गेल्याने रशियाने युक्रेनवर आक्रमण करण्याआधीच इराणशी जुळवून घ्यायला सुरुवात केली होती. यावर्षी तर पुतिन आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्यात झालेली ही तिसरी भेट होती. पाश्चिमात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांमुळे रशियाने इराणकडे आर्थिक भागीदार म्हणून पाहायला सुरुवात केली आहे, हेच या परस्पर संवादातून सूचित होते.
 
 
दोन्ही देशांना त्यांच्यावर लादलेल्या निर्बंधांमुळे त्यांची अर्थव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. इराणलादेखील आपली अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी आपल्या धोरणांमध्ये बदल करावे लागत आहेत. दोन्ही देशांमधील संबंध हे आर्थिक, सुरक्षा आणि प्रादेशिक बाबींबाबत गतीने विकसित होत आहेत आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष रायसी यांनी ऊर्जा, उद्योग आणि वाहतूक क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी सहमती दर्शवली आहे, असे पुतिन यांनी तेहरानमधल्या बैठकीत सांगितले. जागतिक व्यापारातून टप्प्याटप्प्याने अमेरिकी डॉलर काढून टाकण्याचीच गरज आहे, यावर रशिया आणि इराण यांनी सहमती दर्शवली आहे. असे असले, तरी या सर्व योजनांबद्दल बोलणे सोपे असले, तरीदेखील प्रत्यक्ष कृती सोपी नाही. त्यामुळे कठोर निर्बंध असलेल्या इराणसारख्या देशात गुंतवणूक करण्यामुळे रशियासमोर आणखी आव्हाने उभी राहिली आहेत.
 
 
 
सीरियामध्ये तुर्कीवर दबाव आणण्यासाठीही रशियाच्या पाठिंब्याचा इराणला फायदा होऊ शकतो. इराणने असाद यांच्या विरोधातल्या बंडखोरांना पाठिंबा दिला आहे. काही विश्लेषकांच्या मते, पुतिन यांच्या भेटीदरम्यान अर्देगान यांनी इराणला दिलेल्या भेटीवर काटेकोर नजर ठेवण्यात आली होती. या भेटीत युक्रेन नव्हे तर सीरिया हा मुद्दा होता, असेही काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. उत्तर सीरियामध्ये तुर्कीने घेतलेली भूमिका पाहता रशिया आणि इराणने युक्रेनच्या संघर्षाचे निमित्त करून ही भेट घडवून आणली होती. अशा प्रकारच्या संवादांमध्ये तुर्कीचा सहभाग फार पुढे जाऊ शकणार नाही. तुर्की हा ‘नाटो’चा सदस्य आहे. तुर्कीचे शेजारच्या देशांबद्दलचे धोरण आणि ‘नाटो’ संघटनेची उद्दिष्ट यामध्ये बराच फरक आहे. त्यामुळेच सीरियाच्या बाबतीत तुर्कीचा भर संतुलित मुत्सद्देगिरीवर आहे. त्यामुळे आगामी काळात रशिया आणि इराणचे संबंध महत्त्वाचे ठरतील.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.