मुंबई : 'रानबाजार'च्या तुफान यशानंतर आता ‘मी पुन्हा येईन’ही वेबसिरीजची जोरदार चर्चा सुरु आहे. सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, भारत गणेशपुरे, सिद्धार्थ जाधव अशी स्टारकास्ट असलेल्या या सिरिजमध्ये पुन्हा एकदा राजकीय वास्तव मांडण्यात आले आहे. महाराष्ट्रात घडलेला राजकीय थरार हा अजूनही ताजा असल्यामुळे 'मी पुन्हा येईन' या वेबसिरिज बघण्यासाठी आता प्रेक्षक उत्सुक आहेत. त्यामुळे यामध्ये नेमकं काय दाखवलं जाणार आहे याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनी नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये नगरविकास खाते आणि मुख्यमंत्री पदाची चर्चा होताना दिसत आहे. आणि नेमके सध्या महाराष्ट्रातही साधारण असेच काहीसे वातावरण असल्याने हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
सयाजी शिंदे आणि उपेंद्र लिमये या व्हिडीओमध्ये संवाद साधताना दिसत आहेत. 'चला गृहमंत्रीपद तुम्हाला' असं उपेंद्र सयाजी शिंदे यांना म्हणतो. यावर सयाजी म्हणतात, 'नाही मला नगरविकास मंत्रीपद पाहिजे.' यावर परत उपेंद्र म्हणतात, 'बस का… नगरविकास शिवाय मुख्यमंत्री म्हणजे बंदुकीशिवाय इन्स्पेक्टर वाटेल ना…' सध्या महाराष्ट्राची राजकीय स्थिती देखील अशीच आहे. 'मी पुन्हा येईन', 'नगरविकास खाते', 'मुख्यमंत्रीपद' असे शब्द वारंवार आपल्या कानावर पडत आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ पाहून प्रेक्षका त्याला वेगवेगळे संदर्भ जोडत आहेत. म्हणून सिरिज उत्सुकता आधीच वाढवली आहे.
अरविंद जगताप लिखित या वेबसीरिजची निर्मिती प्लॅनेट मराठी, गौतम कोळी आणि जेम क्रिएशन्सने केली आहे. ‘मी पुन्हा येईन’ या वेबसीरिजबद्दल प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, 'सध्याच्या राजकीय घडामोडींचा आणि या सीरीजचा तसा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही, पण.. चित्रपटात किंवा वेबसीरीजमध्ये तेच पाहायला मिळतं जे आपल्या आजुबाजूला घडतं. प्रेक्षकांच्या मनोरंजनाची हीच गरज ‘मी पुन्हा येईन’ ही वेबसीरीज पूर्ण करेल.'