‘सही रे सही’

    15-Jul-2022
Total Views | 113

manasa
 
 
 
 
वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी जडलेला स्वाक्षरी मिळवण्याचा छंद आज ५० वर्षांनंतर तब्बल ८,५०० स्वाक्षर्‍यांच्या घरात पोहोचवलेल्या सतीश चाफेकर या ‘सही’ माणसाविषयी...
 
 
 
 
 
 
वयाच्या अकराव्या वर्षी संधी मिळते भारताच्या पहिल्या मार्शल फिल्ड मार्शल करिअप्पा यांना भेटायची, त्यांची स्वाक्षरी मिळवण्याची. परंतु, ती स्वाक्षरी दुर्दैवाने हरवते आणि त्यामुळे त्या बालवयात-अजाण वयात आपले मित्र आपल्यावर विश्वासच ठेवत नाहीत, त्यामुळे खट्टू न होता आपण आता ज्या ज्या व्यक्तिमत्त्वांना भेटणार, त्या प्रत्येकाची स्वाक्षरी संग्रही ठेवायची हा पण त्या बालवयात घेतला जातो आणि आज ही व्यक्ती भारतातील दुसरी मोठी ‘ऑटोग्राफ कलेक्टर’ बनते. ही व्यक्ती म्हणजे सतीश चाफेकर.
 
 
 
 
 
आपण अनेकदा आपल्या आवडत्या खेळाडूंना-कलाकारांना भेटतो, त्यांच्याबरोबर फोटो काढतो-स्वाक्षरी घेतो. पण, त्याचे पुढे काय होते? फोनच्या फोटो गॅलरीत किंवा कागदांच्या गठ्ठ्यात ते सगळे कुठे तरी हरवून जाते. परंतु,वयाच्या अकराव्या वर्षी सतीश चाफेकर यांनी एक वेगळेच स्वप्न पाहिले. स्वप्न नामवंत व्यक्तींच्या स्वाक्षर्‍यांचा संग्रह करण्याचे. सहसा हे स्वाक्षर्‍या मिळवणे-संग्रही ठेवणे म्हणजे ’वेळेचा अपव्यय’ अशी काही लोकांची धारणा. परंतु, सतीश चाफेकर यांनी या विचारांना वेगळे परिमाण दिले आणि लोकांचा दृष्टिकोन बदलला. सतीश चाफेकर यांच्या या छंदाचे ध्यासात रुपांतर झाले आणि भ्रमंती करून जास्तीत जास्त दिग्गजांची भेट घेत त्यांनी स्वाक्षर्‍या संग्रही ठेवण्यास सुरुवात केली.
 
 
 
 
 
 
 
पेशाने शिक्षक असलेल्या चाफेकर यांचा हा छंद जरी असला तरी त्यांनी त्याला एक शिस्तीचे रूप दिले. त्यांनी क्रिकेटर्सपासून जगातल्या अनेक नामांकित व्यक्तीपर्यंत पोहोचून त्यांच्या स्वाक्षर्‍या घेतल्या. ‘मी कसे यांच्यापर्यंत पोहोचेन, मला स्वाक्षरी मिळेल का?’ असे किंतु-परंतु मनात न आणता त्यांनी बेधडक आपले स्वप्न पूर्ण केले. आपण ज्यांना आज फक्त छायाचित्रांतच पाहू शकतो अशा व्यक्तिमत्त्वांना भेटण्याचा योग चाफेकर यांनी ’जुळवून’ आणला. चंद्रावर पहिले पाऊल ठेवणार्‍या नील आर्मस्ट्राँगची, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांची जॅकी चॅन, गॅरी सोबर्स, पंडित जवाहरलाल नेहरू, ‘नोबेल पिस पुरस्कार’ विजेते दलाई लामा या सर्वांपासून सुरू झालेल्या या संग्रहाचा सिलसिला आज तब्बल ८,५०० स्वाक्षर्‍यांच्या घरात आहे.
 
 
 
 
 
 
 
सतीश चाफेकर यांनी जेव्हा क्रिकेटपटूंच्या स्वाक्षर्‍या घेण्यास सुरुवात केली, तेव्हा एक वेगळी कल्पकता त्यात समाविष्ट केली. या सह्या एखाद्या कागदावर वगैरे न घेता, त्या थेट बॅटवर, बॉलवर, एवढेच नाही, तर ग्लोव्ह्जवर घेण्यास सुरुवात केली. सुनील गावस्कर यांच्यापासून जवळपास सर्व क्रिकेटपटूंच्या स्वाक्षर्‍यांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. त्यातही ज्याला चाहते ‘क्रिकेटचा देव’ मानतात, अशा सचिन तेंडुलकरच्या तब्बल १८० एवढ्या स्वाक्षर्‍या चाफेकर यांच्याकडे आहेत. यात त्याच्या बदलत गेलेल्या सह्या आहेत. जवळपास ५० वर्षांत इतक्या व्यक्तिमत्त्वांच्या स्वाक्षर्‍या घेताना नकळत त्यांचा माणसांच्या स्वभावाचाही अभ्यास होत गेला. माणसाच्या अक्षरावरून, लेखनावरून त्याचा स्वभाव समजतो. ते म्हणतात, “हिटलरची त्याच्या सुरुवातीच्या काळातील स्वाक्षरी आणि त्याचा शेवट जवळ आल्यानंतरची त्याची स्वाक्षरी यात केवढी तफावत आहे.”
जसजसा त्यांचा सह्यांचा साठा विस्तारत गेला, नवनवीन कल्पना जन्म घेऊ लागल्या, तसे आपले डोंबिवलीचे घर हे त्यांनी खास स्वाक्षर्‍यांचे केले. म्हणजे आपण साधारणतः आपल्या घराला रंगरंगोटी करू, भिंतीवर सजावट करू. परंतु, यांनी घराच्या भिंती या खास स्वाक्षर्‍यांच्या केल्या. म्हणजे या स्वाक्षर्‍यांच्या संग्रहाला त्याचे ‘आलय’मिळून खर्‍या अर्थाने त्याचे ’संग्रहालय’ झाले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांपासून अनेक व्यक्तिमत्त्वांनी या भिंतीवर आपली स्वाक्षरी करून घर सजवले.
 
 
 
 
 
 
 
आपण जरी आपल्या कामाचा गवगवा केला नाही तरी समर्पण भावनेने- मनापासून केलेले कामच आपल्याला स्वतःहून प्रसिद्धीच्या घरात नेते, याचे सतीश चाफेकर हे उत्तम उदाहरण. प्रसिद्ध माणसांच्या भेटी घेता घेता आता लोक त्यांची भेट घेऊ लागले होते. ’लिम्का बुक रेकॉर्ड्स’ मध्ये त्यांचे नाव नोंदवले गेले. एका व्यक्तीने त्यांना सवाल केला, “हे सर्व कशासाठी? सह्या गोळा करून तुम्हाला काय मिळणार आहे?” (हा प्रश्न आपल्यालाही कदाचित पडला असेल) यावर सतीश चाफेकर यांनी जे उत्तर दिले, त्यावरून आपल्याही शंकेचे निरसन होईल. ते म्हणाले, ’‘आपण जगतो कशासाठी? याचे काही कारण आहे का? फक्त खाण्यापिण्यासाठी नाही ना. मनुष्याला छंद असणे आवश्यक आहे आणि माझा हा छंद फक्त माझ्यापुरता मर्यादित नाही. तो उद्याच्या पिढीसाठी आहे. मला ५० वर्षांपूर्वी ज्यांनी स्वाक्षरी दिली आहे, ते कदाचित आज जीवंत नसतीलही. परंतु, त्या स्वाक्षरीवर त्यांचा स्पर्श आजही जीवंत आहे. मी केलेले संग्रहालय आहेच परंतु, याचे छोटेखानी संग्रहालय व्हावे व या सर्व स्वाक्षर्‍यांची जोपासना व्हावी, ही माझी इच्छा आहे.”
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121