भारत करणार आपल्या उपग्रहांचे रक्षण

‘इस्रो’ने स्थापन केले स्वत:चे केंद्र

    13-Jul-2022
Total Views | 41

Isro
 
 
नवी दिल्ली: ‘आत्मनिर्भरते’च्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था’ अर्थात ‘इस्रो’ने ‘आयएस-४-ओएम’ या नावाचे स्वत:चे अत्याधुनिक केंद्र स्थापन केले आहे. यामुळे अंतराळातील आपल्या उपग्रहांचे रक्षण करणे भारताला शक्य होणार आहे. ‘इस्रो सिस्टीम फॉर सेफ अ‍ॅण्ड सस्टेनेबल स्पेस ऑपरेशन’ असे या प्रणालीचे नाव आहे. संरक्षण मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली. ‘इस्रो’ने ही यंत्रणा ‘स्पेस ऑपरेशन मॅनेजमेंट सेंटर’कडे सुपूर्द केली आहे. यावेळी अंतराळ खात्याचे राज्यमंत्री जितेंद्रसिंह उपस्थित होते. हे केंद्र ‘इस्रो’च्या ‘आयएसटीआरसी’ येथील इमारतीत स्थापन करण्यात आले आहे. मानवी कल्याणासाठी तयार केल्या जाणार्‍या वेगवेगळ्या मोहिमा अंतराळात सोडल्या जातात. त्यामुळे अंतराळात कचरा वाढत आहे. या कचर्‍यापासून उपग्रहांना धोका निर्माण होऊ शकतो. अशा संभाव्य धोक्यांपासून ही प्रणाली उपग्रहांचे रक्षण करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
 
 
 
‘इस्रो’ची ही अत्याधुनिक प्रणाली भविष्यात अंतराळातील कचर्‍यापासून कोणत्याही मोहिमेला धोका होणार नाही, याची खात्री करेल. ‘आयएस-४-ओएम’ या प्रणालीत ‘मल्टिऑब्जेक्ट ट्रॅकिंग रडार’, ‘ऑब्झर्वेशन नेटवर्क’, ‘कंट्रोल सेंटर’ आणि ‘ऑप्टिकल ऑब्झर्व्हेशन नेटवर्क’चा समावेश आहे. कोणताही लघुग्रह किंवा धुमकेतू शोधणे आणि तो नष्ट करण्याची क्षमता यात आहे. अशा धोक्यांना शोधून ते वेळेआधीच नष्ट करण्यासाठी या केंद्रात अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे. पृथ्वीभोवती फिरणारे उपग्रह एकमेकांवर आदळतात किंवा त्यांचा ढिगारा पृथ्वीवर पडतो. त्यामुळे पृथ्वीवरील धोका वाढतो तसेच अंतराळातील प्रदूषणही वाढते. सध्या तीन हजारांपेक्षा जास्त उपग्रह अंतराळात फिरत आहेत. त्यापैकी ५३ उपग्रह भारतीय आहेत. याशिवाय हजारो निष्किय उपग्रह, रॉकेट आणि इतर उपकरणांचा कचराही ताशी २७ हजार किमी वेगाने तुकड्यांमध्ये तरंगत आहे. या ढिगार्‍यांचा वेग इतका आहे की, ते कोणत्याही उपग्रहाला नष्ट करू शकतात.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121