कल्याण: ( BJP Dinesh Tawde passes away ) भारतीय जनता पक्षाचे ‘सर्वात जुन्या आणि कट्टर कार्यकर्त्यांपैकी एक’ अशी ओळख असलेले दिनेश तावडे यांचे शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्यापश्चात पत्नी आणि दोन मुलगे असा परिवार आहे.
तावडे यांनी 1974 पासून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपल्या समाजकारण आणि राजकारणाला प्रारंभ केला. आपल्या कुशल नेतृत्व आणि संघटन कौशल्याच्या बळावर त्यांनी सामान्य कार्यकर्ता ते भाजपचे जिल्हाध्यक्ष अशी मोठी झेप घेतली. कल्याण-डोंबिवलीमध्ये स्वीकृत सदस्य, नगरसेवक आणि विरोधी पक्षनेता अशी पदेही त्यांनी भूषविली आहेत, तर आणीबाणीच्या काळातही त्यांनी तितक्याच आत्मीयतेने पक्षाचे काम केल्याची आठवण त्यांच्या जुन्या सहकार्यांनी करून दिली.
नेहमीप्रमाणे भगवा तलाव येथे मॉर्निंग वॉक करत असताना त्यांना शुक्रवारी सकाळी हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. अशा जुन्या फळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्याच्या निधनामुळे भाजपचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.
एक आदर्श लढवय्या नेता हरपला
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, विरोधी पक्षनेते, कल्याण जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक दिनेश तावडे यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पक्षाचा एक खंदा कार्यकर्ता, एक आदर्श लढवय्या नेता आपल्यातून निघून गेला आहे. या कठीण समयी ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
- रविंद्र चव्हाण, आमदार, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष, भाजप
संघर्षशील नेता आपल्यातून निघून गेला
पक्षातील कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणारा आणि कार्यकर्ता चुकला तर त्याला समजून घेणारा असा नेता हरपला आहे. सभागृहातील त्यांच्या भाषणातून त्यांचा संघर्ष दिसून येत असे. त्यांचे वक्तृत्व अफाट होते. त्यांच्या भाषणानंतर समोरची व्यक्ती निरुत्तर होत असे. असा संघर्षशील नेता आपल्यातून निघून गेला.
- नरेंद्र पवार, माजी आमदार भाजपचे कल्याण पश्चिम
संपूर्ण भाजप परिवार शोकाकूल
दिनेश तावडे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी जिल्हाध्यक्ष, गटनेते अशी विविध पदे त्यांनी भूषविली आहेत. त्यांचे वक्तृत्व चांगले होते. त्यांच्या जाण्याने संपूर्ण भाजप परिवार शोकाकूल आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुह्ख सहन करण्याची शक्ती मिळो.
- नंदू परब, जिल्हाध्यक्ष, कल्याण