कल्याण : शहराच्या पूर्वेतील चिकणीपाडा परिसरातील धोकादायक झालेल्या सप्तशृंगी इमारतीचा दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब कोसळल्याची घटना मंगळवारी दि. 20 मे रोजी दुपारी घडली. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहे. त्यात महिला आणि मुलांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दल, पोलिस आणि केडीएमसी अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
सप्तशृंगी ही चिकणीपाडा परिसरात तळ अधिक चार मजली इमारत आहे. इमारत धोकादायक झाल्याने महापालिकेने रहिवाश्यांना नोटीस बजावली होती. महापालिकेने नोटीस दिल्यानंतर ही रहिवाश्यांनी इमारत धोकादायक असताना ही खाली केली नव्हती. या इमारतीत दुरूस्तीचे काम सुरू होते. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब मंगळवारी दुपारी 1.45 वाजता कोसळल्याचा जोरदार आवाज आला. आवाज होताच नागरिकांनी इमारतीतून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्नीशमन दल यांनी घटनास्थळी पोहोचत बचावकार्य सुरू केले. या इमारतीमधून आतापर्यत सहा मृतदेह बाहेर काढले आहेत. सहा जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले आहेत. तर जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या इमारतीत अडकलेल्या मुलींच्या सुटकेसाठी तिच्या आई आणि वडीलांनी एकच टाहो फोडला होता. इमारत धोकादायक असल्याची नोटीस यापूर्वीच बजावण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे यांनी दिली आहे.
इमारतीच्या आजूबाजूच्या चाळी खाली करण्याचे आवाहन
सप्तशृंगी ही इमारत अत्यंत दाट लोकवस्तीत आहे. त्यामुळे घटना घडल्यानंतर त्याठिकाणी मदत कार्य करण्यासाठी रुग्णवाहिका आणि अग्नीशमन गाडी पोहोचण्यास अडचणी येत होत्या. स्लॅब कोसळल्याची घटना घडताच पोलिसांनी आणि अग्नीशमन दलाच्या जवानांनी आजूबाजूच्या चाळीतील नागरिकांना त्यांची घरे खाली करण्याच्या सूचना दिल्या.
बचावकार्य सुरू असताना इमारतींना जात होते तडे
बचावकार्य सुरू असताना देखील इमारतीला तडे जाण्याचा आवाज येत होता. इमारतीच्या एका बाजूला मोठी चीर पडली असल्याचे ही निर्दशनास आले. घटनेनंतर या परिसरातील वीजपुरवठा खंडीत केला होता.
प्रत्यदर्शीच्या प्रतिक्रिया
1. या इमारतीत दुसऱ्या मजल्यावरील रहिवाशी जयश्री शिरसागर यांनी सांगितले, मंगळवारी दुपारी एक मोठा आवाज आला. आवाज ऐकू येताच मी आणि माझी मुलगी आम्ही दोघे ही घराबाहेर पडलो. पण इमारतीच्या सिमेंटचा काही भाग माझ्या मुलाच्या छातीवर पडल्याने तो जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
2. सप्तशृंगी इमारतींच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी सांगितले, ही इमारत दुरुस्त करताना अनेक वेळा इमारतीचा काही भाग पडल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत.
घटनास्थळी यांनी घेतली धाव
घटनास्थळी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल, पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, शिवसेना शहरप्रमुख निलेश शिंदे, कॉग्रेसचे जिल्हाअध्यक्ष सचिन पोटे आदींनी नागरिकांच्या मदतीसाठी धाव घेतली.