शिल्पकलेतील ‘ओंकार’ साधना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jun-2022   
Total Views |
 
mans
 
 
 
गावखेड्यातून मुंबईत येऊन चित्रकलेचे आणि शिल्पकलेचे धडे घेत त्याने आपल्या स्वप्नांना पंख दिले. जाणून घेऊया आपल्या कलाकारीने वेगळा ठसा उमटविणार्‍या ओंकार जंगम यांच्याविषयी...
 
 
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मांडवे गावचा ओंकार ज्ञानेश्वर जंगमचा जन्म. वडील ज्ञानेश्वर आणि आई सविता शेतकरी. ओंकारने दहावीपर्यंतचे शिक्षण त्याच्या आजोळी म्हणजेच चिपळूणमधील वसंत शंकर देसाई माध्यमिक विद्यालयात पूर्ण केले. इयत्ता चौथीत असताना १९ फेब्रुवारी अर्थात शिवजयंतीला एक शिवरायांची प्रतिकृती पाहून त्याने वहीवर चित्र रेखाटले आणि पुढे त्याला चित्रकलेमध्येच आवड निर्माण झाली. विशेष म्हणजे, चित्रकलेविषयीच्या नकारात्मक वातावरणाने तो लपूनछपून चित्रे रेखाटत. कोकण म्हटलं म्हणजे निसर्गाची मुक्त उधळण. त्यामुळे ओंकारचा निसर्गचित्रांकडे विशेष कल होता. इयत्ता सहावीत त्याने चित्रकला स्पर्धेत पहिले पारितोषिक पटकावले. मात्र, त्याने ही बाब कुणालाही सांगितली नाही. त्यानंतर पुन्हा एकदा चित्रकला स्पर्धेतआणि पुढे ‘इंटरमिडिएट’ व ‘एलिमेन्ट्री’ परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याची बातमी वृत्तपत्रात छापून आली. ही गोष्ट मामाला समजल्यानंतर ओंकारला त्यांनी चित्रकलेसह अभ्यासावरदेखील लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. शाळेतील मल्लाप्पा शिंगे गुरूजींना ओंकारच्या कलेविषयी माहिती असल्याने ते त्यांच्या चित्रकलाविषयक कामामध्ये नेहमीच ओंकारला सामील करून घेत. त्यांनीच ओंकारला सर ज. जी. कलामहाविद्यालयाविषयी माहिती दिली.
 
 
दरम्यान, मामा बँकेत नोकरीला असल्याने ओंकारने पुढे क्रांती महाविद्यालयात वाणिज्य शाखेसाठी प्रवेश घेतला. यादरम्यान, ओंकार जेजेमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक बाबींचीदेखील माहिती घेत होता. बारावीनंतर ओंकार घरी गेला. ओंकारने नोकरी करावी अशी त्याच्या कुटुंबीयांची इच्छा होती. त्यामुळे त्याने पोलीस भरतीसाठीही प्रयत्न सुरू केले खरे, मात्र त्यातही तो अपयशी ठरला. अखेर २०१३ साली ओंकारने मुंबई गाठत एका प्रिंटींग प्रेसमध्ये नोकरी सुरू केली. त्यातून मिळणार्‍या नऊ हजार रुपयांच्या पगारातून तो शिक्षणासाठी काही पैसे वाचवून काही घरीदेखील पाठवत. ओंकारला जेजेमध्ये प्रवेश घेण्याची तीव्र इच्छा होती. त्यामुळे प्रवेश परीक्षेच्या सरावासाठी त्याने सातोस्कर सरांकडे धडे गिरवले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार ओंकारने नोकरी सोडून ‘एटीडी’साठी प्रवेश घेतला. ‘एटीडी’च्या दोन वर्षांतही ओंकारने प्रवेश परीक्षेसाठी प्रयत्न केला. मात्र, त्यातही अपयश आले. रणजित पाटील यांच्याशी ओळख झाल्याने त्यांच्यामार्फत अनेक कामे ओंकारला मिळू लागली. चित्रकलेच्या क्लासेसच्या माध्यमातून मिळणार्‍या पैशांतून ओंकारचा दैनंदिन खर्च भागत होता. ओंकारला आधी चित्रकला आणि नंतर शिल्पकलेकडे वळायचे होते. मात्र, चित्रकलेमध्ये निसर्गचित्र हा प्रकार नसल्याने त्याने शिल्पकलेचा पर्याय निवडला. दरम्यान, जेजेमधील कुणाल लोंढे यानेही शिल्पकलेविषयीची माहिती ओंकारला दिली. प्रवेश प्रक्रियेत सततच्या अपयशामुळे ओंकारने एक वर्षाचा फाऊंडेशन कोर्स करून नंतर शिल्पकलेच्या पदविकेसाठी २०१६ साली प्रवेश घेतला आणि सुरू झाला नवा प्रवास.
 
 
शिल्पकला म्हणजे केवळ गणेशमूर्ती बनविणे नव्हे, तर हे एक स्वतंत्र जग असल्याचा अनुभव ओंकारला आला. माणसांची चित्रे रेखाटणे आवडत नाही. मात्र, माणसांची मातीची शिल्पे आपण उत्तम बनवू शकतो, याची जाणीव त्याला झाली. ओंकार प्रत्येक शिल्प बनविताना त्यामागे एखादी कथा किंवा त्यातून एखादा संदेश मिळेल, याचा विचार करतो. ओंकारला दगड, माती, लाकूड या प्रकाराची शिल्पे बनविण्यात रस असून, विषयानुरूप तो शिल्प कोणत्या प्रकारात घडवायचे याचा निर्णय घेतो. ओंकारचे वडील तब्बल सात वर्षांनंतर महाविद्यालयात त्याचे प्रदर्शन पाहण्यासाठी आले व मुलाचे यश डोळेभरून त्यांनी पाहिले. कुटुंबीयांना ओंकार मुंबईत काय करतो, याची तसूभरही कल्पना नव्हती. एकदा गणेशोत्सावात ओंकारने केलेल्या सजावटीने कुटुंबीय प्रभावित झाले होते. तेव्हापासून कुटुंबीय चित्रकलेविषयी सकारात्मक झाले.
 
 
मोठी गोष्ट मिळवण्यासाठी संघर्षही मोठा असतो, हे सांगणारे मामा जयवंत जंगम यांसह वर्ग शिक्षक नितीन मेस्त्री यांनीही ओंकारला मोलाची साथ दिली. वनवासी भागात जाऊन त्यांची चित्रे रेखाटून त्याचे प्रदर्शन वनवासींच्याच घरात भरविण्याचा ओंकारचा मानस आहे. कला क्षेत्रात उतरायचे असले,तर आत्मविश्वास आणि निश्चय हवा. शिल्प ही तत्काळ घडणारी गोष्ट नाही. त्यासाठी उत्तम शरीरयष्टी, निरीक्षण शक्ती, स्पष्ट विचार आणि कलाकाराला शिस्त असणे आवश्यक असल्याचे ओंकार सांगतो.
 
 
दरम्यान, जंगमकुटुंबात कलाकार होणारा ओंकार हा पहिलाच आहे. त्यामुळे त्याच्या आईवडिलांना त्याचे विशेष कौतुक आहे. त्याच्या प्रत्येक निर्णयात त्यांनी त्याला नेहमीच साथ दिली. तसेच, त्याला त्याच्या मित्रपरिवाराचेदेखील तितकेच सहकार्य मिळाले. बारावीपर्यंत त्याने मामाच्या घरी राहून आपले शिक्षण पूर्ण केले आणि नंतर मुंबईत राहून. त्यामुळे त्याला घरी जाणे क्वचितच शक्य होत. या परिस्थितीतही त्याने आपले ध्येय गाठलेच. शिक्षण आणि कामासाठी घराबाहेर जायचेच असेल, तर झाडू मारायचे काम मिळाले तरी कर, पण सगळं सोडून परत न येण्याचा सल्ला वडिलांनी ओंकारला दिला होता आणि तो त्याने पाळलासुद्धा. अगदी कोकणातील एका छोट्याशा खेड्यातून येऊन स्वप्ननगरी मुंबईमध्ये आधी चित्रकला आणि नंतर शिल्पकलेचे धडे घेऊन ओंकारने आपला वेगळा ठसा उमटवला. ओंकारला त्याच्या आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा...
 
 
@@AUTHORINFO_V1@@