‘न्यू नॉर्मल’ आणि बालविश्व

    07-Jun-2022
Total Views | 42

health
 
 
काही सामाजिक जीवनात लाजाळू असणारी मुलं घरी तशी सुखासमाधानातच होती. त्यांना पुन्हा शालेय जीवनात गुंतून राहताना मोठा संघर्ष करावा लागणार आहे. ज्या मुलांना महामारीच्या आधी मानसिक आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागला होता, ज्यांच्या पालकांना सतत समस्यांचा विशेषकरुन आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. लांबलचक ‘लॉकडाऊन’मुळे ज्या मुलांना त्यांच्या जीवनात खूप व्यत्यय सोसायला लागला, अशा मुलांच्या मानसिक समस्या वाढण्याची जोखीम आज अधिक आहे.
 
 
कोविड-१९’च्या रुग्णांची संख्या आपल्या देशात पुन्हा हळूहळू वाढू लागली आहे. अमेरिकेसारख्या देशात तर कोरोना आजही फोफावताना दिसत आहे. जसजसे आपल्याला या विषाणूची माहिती होत राहील, तसतसे एकूणच या विषाणूचे वेगळेपण आपल्याला अधिकाधिक भासत राहील. हे सर्व न आवडणारे बदल आणि अनिश्चित परिस्थिती प्रौढांसाठी अधिक गैरसोयीची असली, तरी मुलंबाळ या साथीच्या काळात आणि ‘न्यू नॉर्मल’च्या जुळवणुकीत सुरक्षित राहिली आहेत, असे म्हणता येत नाही. किंबहुना, या आघाताचा आणि दुर्दैवी शोकांतिकेचा फटका त्यांनाही चांगलाच बसलेला आहे. व्यापकपणे पाहता ‘कोविड-१९’च्या महामारीने आरोग्य आणि शिक्षण प्रणालीस वेठीस धरले. गरिबीत जन्माला आलेले जगातले लाखो लोक त्यांच्या मूलभूत आरोग्यसेवा,शिक्षण आणि संरक्षणापासून वंचित झाले. आज असमानतेची दरी अधिक रुंदावली आहे. महामारीचे आरोग्यावरील परिणाम पुढील अनेक वर्षं पुनरावृत्त होत राहणार आहेत. बालहक्कांचे त्यामुळे उल्लंघनही होत राहणार आहे. आपण प्रौढ म्हणून ‘न्यू नॉर्मल’ समजू तरी शकत आहोत. त्यामुळे ‘स्विच’ केव्हा ‘ऑन’-‘ऑफ’ करायचा याचा अंदाज आपणास येत असतो. परंतु, मुलांसाठी बदलत जाणारे दैनंदिन जीवन व नवीन सामान्य आधिक क्लिष्ट असू शकते. भावनिकदृष्ट्या जोखमीचे असू शकते.
 
 
जागतिक स्तरावर १६८ दशलक्ष मुलांनी जवळजवळ कमीत कमी एक वर्षाचे वर्ग चुकवले आणि दूरस्थ शिक्षण चालू असताना तीनपैकी दोन मुले तरी त्याचा लाभ गरिबी व इतर अडचणींमुळे घेऊ शकली नाहीत. तरुण मुलींचे आरोग्य आणि बालपण धोक्यात आले. बालविवाहांमध्ये वाढ होण्याचा धोका वाढलाच आहे. भारतातही तो दिसून येत आहे. जगभरात दहा दशलक्ष मुलींचे वयवर्षे १६ पूर्वीच लग्न होण्याचा धोका वाढलेला आहे. शारीरिक-मानसिक आरोग्याच्या समस्या मुलांमध्ये वाढत आहेतच. जर एखाद्याला चिंता वाटण्याची सवय असेल, तर ती अधिक चिंताग्रस्त होतात. मनात एखाद्याच्या भीतीची जाणीव असेल तर त्यांची भीती अधिक वाढत जाते. एकंदरीत मुलांना सर्वसामान्य संघर्ष सोडवण्यासाठी लागणारी क्षमता कमीच दिसून येते. त्यांच्या डोळ्यांत अधिक अश्रू दिसतात, त्यांची मनं अधिक अस्वस्थ होतात. आपल्यापैकी अनेक जणांनी अशी गरीब मुलं गेल्या दोन वर्षांत आपल्या अवतिभवती पाहिली असतील.
 
 
आतापर्यंत शाळा जरी सुरु झाल्या, तरी शहरातली परिस्थिती वगळता ग्रामीण भागात अनेक अडचणींचा त्रास मुलांना सहन करावा लागला. त्यांचे आखडलेले पंख पसरवणे व त्यांच्यासाठी सोईस्कर संधी उपलब्ध करुन देणे आज निकडीचे आहे. यात महामारीची विघातक ताकद आणि मुलांची लवचिकता यामधील झुंज महत्त्वाची आहे. वास्तविक जीवनात पुन्हा चयन करण्यासाठी आपल्या समवयस्क सवंगड्यांबरोबर जुळवून घेण्यासाठी त्यांना काही अनुभव आणि काही त्रुटींमधून जावे लागणार आहे. त्यांच्या भावनिक क्षमतेची खरंतर परीक्षा चालू झाली आहे. काही सामाजिक जीवनात लाजाळू असणारी मुलं घरी तशी सुखासमाधानातच होती. त्यांना पुन्हा शालेय जीवनात गुंतून राहताना मोठा संघर्ष करावा लागणार आहे. ज्या मुलांना महामारीच्या आधी मानसिक आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागला होता, ज्यांच्या पालकांना सतत समस्यांचा विशेषकरुन आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. लांबलचक ‘लॉकडाऊन’मुळे ज्या मुलांना त्यांच्या जीवनात खूप व्यत्यय सोसायला लागला, अशा मुलांच्या मानसिक समस्या वाढण्याची जोखीम आज अधिक आहे.
 
 
पालकांसाठी आपण मागे हटून मुलांना त्यांचा संघर्ष करू दे, असा पवित्रा घेणे सहज सोपे नसते. खेळताना तुमचा मुलगा पडला, त्याचा गुडघा फाटला तर तुम्ही त्याला गोंजाराल, जखमेवर फुंकर घालाल, लागलं तर एखाददुसरी मलमपट्टी कराल, पण त्याला पुन्हा खेळायला जायलाही प्रवृत्त कराल, मुलं पुन्हा खेळायला जातील, कदाचित पुन्हा त्यांना खरचटेल, पुन्हा तुम्ही त्यांना आश्चस्त कराल आणि तुमची काळजीवाहू भूमिका पार पाडाल. तुम्हालाही आश्वस्त वाटेल. तथापि, सामाजिक इजा आपण अशी मलमपट्टी करुन त्यांचे त्वरित निराकरण होत नाही. विशेषकरुन महामारीसारख्या जवळजवळ विखारी झालेल्या अस्थिर आणि अनिश्चित परिस्थितीमध्ये आपली मुले जी सामाजिक, भावनिक आणि शैक्षणिक अडचणींना सामोरे जायचा प्रयत्न करतात, तेव्हा घायाळ होतात. त्याचे त्वरित निराकरण आपण कसे करणार, या मुलांच्या जीवनातील अननुभवी परीक्षा आहेत. त्यासाठी भावना सुरक्षित आणि समृद्ध करण्याचा अनुभव याही परिस्थितीत त्यांना मिळावा, अशा योजना करायला हव्यात.
 
 
-डॉ. शुभांगी पारकर
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121