धारणीय वेग (भाग-1)

    29-Jul-2025
Total Views |

मागील लेखांच्या श्रृंखलेतून अधारणीय वेगांबद्दल आपण वाचले. अधारणीय म्हणजेच ज्यांचे धारण केले, रोखले (काही काळापुरते, वारंवार, सतत) तर त्यामुळे काही व्याधी उत्पन्न होतात. या ’Non suppressive physical urges’मुळे जर व्याधी निर्माण झाली, तर त्या रोगाच्या लक्षणांची फक्त चिकित्सा करून भागत नाही. लक्षणे जरी बरी झाली आणि विविध शारीरिक आवेगांचे धारण करणे तसेच सुरू राहिले, तर त्या व्याधी संपूर्ण बर्‍या होत नाहीत. त्या त्या रोगांची लक्षणे अधून-मधून उत्पन्न होत राहतात. रोगाचे समूळ उच्चाटन होण्यासाठी त्याचे रोगकारक हेतू समजून त्यावर चिकित्सा करणे गरजेचे आहे. अधारणीय वेग मुख्यत्वे करून शारीरिक आवेग आहेत.

स्वास्थ्यची व्याख्या करताना केवळ शारीरिक स्वास्थ्य अपेक्षित नाही. त्याचबरोबर मानसिक व भावनिक स्वास्थ्यदेखील गरजेचे आहे. (A fit body and sound mind) आयुर्वेदामध्ये स्वास्थ्य याची व्याख्या करताना काही शारीरिक भाव, इन्द्रिये (Motor organs and sense organs) व प्रसन्न मन यांचाही समावेश केला आहे. शरीरातील दोष-धातू-मल यांची साम्यावस्था, शरीरातील अग्नि (पाचकाग्नि) साम्यावस्थेत असणे व याचबरोबर आत्मा व मन प्रसन्न असणे व इंद्रियेपण प्रसन्न असणे (इथे ‘प्रसन्न’ या शब्दाचा अर्थ Balanced, समाधानी, तृप्त असा घ्यावा.) जेथे मन कुठल्याही विषयात (Subject /गोष्ट/incidents) अडकून राहात नाही. जेथे सर्व इन्द्रिये आपआपली ठरलेली कर्मे आपल्या संपूर्ण क्षमतेने उत्तमरित्या पार पाडतात, या स्थितीला प्रसन्न मन व प्रसन्न इन्द्रिये असे म्हटले आहे. स्वास्थ्यरक्षणासाठी स्वस्थ्य व्यक्तीने फक्त ’Physically Fit’ असून पुरेसे नाही, त्याचबरोबर Emotionally and mentally strong असणेपण गरजेचे आहे.
रोजच्या दिनचर्येत शरीरामध्ये बदल होतात, झीज होते. तसेच मनावरही अनेक आघात होत असतात. इन्द्रियांनादेखील विविध कार्ये सतत, एकत्रित (बहुतांशी वेळेस सुसूत्रित म्हणजे सुगठित आणि क्वचित अव्यवस्थित पद्धतीने करावी लागतात. शरीर-मन-इन्द्रिय यांमधील साम्यावस्था (A state of equipoise) निर्माण करून ती राखणे म्हणजेच स्वास्थ्य होय.

स्वास्थ्याच्या रक्षणासाठी, स्वास्थ्य टिकविण्यासाठी दैनंदिन जीवनात शिस्त येणे, ती अनुकरणे आणि तसे वागणे, अत्यंत महत्त्वाचे आणि गरजेचे आहे. दिनचर्या, रात्रीचर्या यांचे पालन, अनुकरण याबरोबरच सद्वृत्ताचे पालन व अवलंबन हेदेखील गरजेचे आहे. सद्वृत्त म्हणजे थोडक्यात चांगले आचरण, येाग्य वर्तणूक या सर्व गोष्टींवर आरोग्य आणि दीर्घायुष्य अवलंबून आहे.

आयुर्वेदशास्त्र केवळ व्याधींच्या चिकित्सेपुरते मर्यादित नाही, ते जीवनाचे विज्ञान आहे. यात ’WELLNESS’ आणि ’ILLNESS’ या दोन्हींवरील उपाय सांगितले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार, 12.2-48.6 टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात मानसिक विकार सध्या जगात आढळून येत आहेत. त्यांना रोखण्यासाठी, आवर घालण्यासाठी धारणीय वेगांचे धारण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शारीरिक आवेग निर्माण झाल्यावर ते रोखू नयेत, कारण ते अडविल्यास विविध व्याधी उत्पन्न होतात (म्हणजेच, अधारणीय वेगांचे धारण ठरू नये.) पण, मानसभाव वेगांबद्दल याच्या विपरीत सांगितले आहे. जेव्हा एखादा मानस वेगाची मनात उत्पत्ती होऊ लागलेली असते, त्याचवेळेस त्या नकारात्मक भावनांवर आवर घालणे गरजेचे आहे. (NIP IN THE BUD) म्हणजे, कळी असते. वेळीच काढून टाकल्यास विविध नकारात्मक विचारांची श्रृंखला निर्माण होत नाही, कळीचे फुलात रूपांतर होत नाही. हल्ली प्रत्येक व्यक्तीला मानसिक ताण आहे. वैयक्तिक किंवा कामाशी निगडित, व्यवसायाच्या ठिकाणांचा इ. नकारात्मक विचारांच्या सतत चिंतनाने मानसिक ताण ओढावला जातो. सततचा ताण पुढे जाऊन विविध मानसिक आजार उत्पन्न करू शकतो, अतिचिंता व नकारात्मक चिंतनाचे खूप मोठे दुष्परिणाम मनाबरोबरच शरीरालाही भोगावे लागतात. मानसिक ताणामुळे (सतत, कायम, तीव्र) विविध भावनिक व मानसिक व्याधी उत्पन्न होऊ शकतात. त्याचबरोबर मनोकायिक आजारदेखील उत्पन्न होऊ शकतात. झोपेच्या तक्रारी, चिंता, निराशा कामात लक्ष न लागणे, आकलन क्षमता कमी होणे इ. सर्व लक्षणे उत्पन्न होऊ शकतात. आयुर्वेद धारणीय वेगांमध्ये एकूण नऊ मानस भावांचा समावेश केला आहे. लोभ, शोक, भय, क्रोध, मान, निर्लज्ज, ईर्ष्या, अतिराग, अभिद्य. प्रत्येक मानस भावाच्या सकारात्मक व नकारात्मक रंग छटा आहेत. थोड्या प्रमाणात चांगल्या गोष्टींसाठी असे भाव उपयोगी, उपकारक ठरतात. उदाहरणार्थ-एखादी चुकीची गोष्ट असल्यास (व्यसने, कुकर्म इ.) मन आधी समजावते, अशा गोष्टींपासून लांब राहण्यासाठी प्रयत्न करते. पण, त्याने जर फायदा झाला नाही, तर त्या कृतीमुळे काय भोगावे लागू शकते, अशा पद्धतीचे भय उत्पन्न करणारे विचार आपल्या मनात उत्पन्न होतात. या विचारांच्या प्रखरतेवर ती व्यक्ती चुकीचे काम करण्यास प्रवृत्त होईल की अप्रवृत्त होईल, ते ठरते. म्हणजेच, एखादी चुकीची गोष्ट चुकीच्या मार्गावर जाण्यापूर्वी मन सांगत असते, घाबरते आणि लांब राहण्यास समजावते. पण, मनाचीच तारतम्यता नाहीशी झाली, सदसद्विवेकबुद्धीचा वापर होणे बंद झाले की मन सैरावैरा धावते व नको त्या गोष्टीमध्ये गुंतू लागते. नकारात्मक भावनांमध्ये अडकून मनाबरोबर शरीरालाही त्याचे परिणाम भोगावे लागतात. यावर आयुर्वेदशास्त्रात विविध उपाय सांगितले आहेत.

प्रत्येक धारणीय वेगाच्या विविध आयामांबद्दल सविस्तरपणे आपण बघू व त्यावरील उपाय यांबद्दलही पुढील लेख श्रृंखलेतून जाणून घेऊ. यातील उपाय म्हणजे जीवनशैलीत सुयोग्य बदल. यामध्ये केवळ खानपानच अपेक्षित नाही, तर त्याचबरोबर झोपेच्या वेळा, भूक, व्यायाम, व्यसने यांबद्दलही जाणून घेणे आणि जे व्याधिकारक हेतू आहेत, त्यांमध्ये बदल करणे, हे सर्व अपेक्षित आहे. काही विशिष्ट अन्नपदार्थांनी, कृतींनी शरीरातील रज व तम भाव (राजसिक गुण व तामसिक गुण) वाढतो. रज आणि तम हे मनाचे दोष आहेत, ज्यांनी विविध मानस विकृती उत्पन्न होऊ शकतात. यासाठी सात्विक आहार अन्न-पान दिनचर्येत अवलंबणे गरजेचे आहे. विविध चिकित्सा पद्धती (शिरोधारा, शिरोऽभ्यंग, पादाभ्यंग, सर्वांग अभ्यंग, नस्य, श्वसनाचे प्रकार, विविध औषधोपचार, समुपदेशन व गरज असल्यास मनोकायिक व्याधींची चिकित्सा हे सर्व) यासाठी अवलंबिल्या जातात. पंचकर्म व अन्य चिकित्सादेखील अशा धारणीय वेगांचे धारण न केल्यामुळे झालेल्या त्रासांवर, रोगांवर उपयोगी असतात. पुढील लेखातून या विविध मानस भाषांच्या धारणीय वेगांबद्दल सखोल जाणून घेऊया.

वैद्य कीर्ती देव
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मॅटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
9820286429