गावखेड्यातील इंग्रजीचे ‘गिरी’शिखर

    19-Jun-2022   
Total Views |

mansa 222
 
 
 
  
 
शेणामातीच्या घरातले बालपण, आई-वडिलांचा विड्या वळण्याचा व्यवसाय आणि परिस्थितीचे चटके. सर्व सहन करून गावखेड्यातील मुलांमध्ये इंग्रजीची बीजे रोवणार्‍या सोमनाथ जहालम गिरी यांच्याविषयी...
 
 
 
अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील हिवरगाव आंब्रे गावचा सोमनाथ जहालम गिरी यांचा जन्म. आई-वडील विड्या वळत, तर मातीशेणाचे घर. जि. प. शाळेत सातवीपर्यंतचे शिक्षण घेतले. मित्रांची पुस्तके वाचायची, जुन्या वह्यांची शिल्लक पाने शिवून त्या वह्या वापरायच्या, शुल्कासाठी घरी रडायचे, असे करत करत ते सातवीत केंद्रस्तरावर पहिले आले. गणोरेतील रयत संस्थेच्या शाळेत त्यांनी आठवीला प्रवेश घेतला खरा, पण इंग्रजीअभावी सहामाहीत नापास झाले. शाळेत जाताना इंग्रजी शब्दांचे पाठांतर आणि उजळणीमुळे इंग्रजीची भीती इंग्रजीच्या गोडीत रूपांतरित झाली. घरून शिक्षणाला पैसे मिळणे अशक्यच, मग कुठे मजुरी, विहीर खोदणे व बिगारी काम करायचे. दहावीला त्यांनी इंग्रजीत ६३ गुण मिळवले. अकरावीला विज्ञान शाखेसाठी श्रीरामपुरातील ‘आरबीएनबी कॉलेज’ला प्रवेश घेतला. पुढे दिवाळीत गावी जाण्यासाठी भाड्याला पैसे नसल्याने गिरी परिचितांकडे गेले. मात्र, त्यांनी वडिलांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाल्याचे सांगितले. संपर्क साधनांचा अभाव व आई अशिक्षित, त्यामुळे त्यांना वडिलांच्या निधनाची बातमीच कळविली गेली नाही. वडील गेल्यानंतर अभ्यासाची उमेद संपली अन् ते बारावी अनुत्तीर्ण झाले. त्यानंतर ते बहिणीकडे राहत व त्यांची पिठाची गिरणी चालवू लागले. मात्र, सोमनाथने शिकावं, अशी बहिणीची इच्छा आणि मित्र विनायक बिटके यांनी त्यांना बारावीत कलाशाखेत प्रवेश घेण्याचा सल्ला दिला व अखेर त्यांनी नगरच्या ‘पेमराज सारडा कॉलेज’ला प्रवेश घेतला. राहण्याची सोय नसल्याने ते सुरुवातीचे १५ दिवस रात्री नगरच्या बस स्टॅण्डवरील चहाच्या टपरीत झोपत आणि सकाळी तिथेच अंघोळ करून कॉलेजला जात. नंतर ते आणि मित्रांनी एकत्र येत भाड्याची खोली घेतली. एका लॉजमध्ये त्यांना दुपारी ३ ते रात्री ११ पर्यंत ‘रूमबॉय’ची नोकरी मिळाली. २०० रूपये पगार, ग्राहकांकडून मिळालेली टीप आणि एक वेळचे जेवण, त्यामुळे दिवसातून एकदाच जेवायचं. पुढे त्यांनी भाडेस्तरावर पानटपरी चालवली. बारावीचे पेपर जवळ आल्याने अभ्यासासाठी गावी आले आणि त्यातच बहिणीचे निधन झाले. इंग्रजीच्या पेपरआधीच ते तापाने फणफणले. बसमध्ये शेजारी बसलेल्या गणपत रेवगडे यांनी त्यांना त्याची जाणीव करून दिली. सोबत आणलेल्या १५० पैकी १०० रूपये दवाखान्यात खर्च झाले. उर्वरित १५ दिवस केवळ वडापाव खाऊन त्यांनी बारावीचे पेपर दिले.
 
 
 
पानटपरीही बंद केल्याने त्यांनी चार महिने लिंबू सरबताच्या गाडीवर दहा रुपये रोजंदारीने काम केले. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याच कॉलेजला पदवीसाठी प्रवेश घेतला. त्यानंतर वडापावच्या गाडीवरही काम केले. मित्र अशोक रेवगडे यांच्या सल्ल्यानंतर त्यांनी अकोले कॉलेजला पदवीच्या दुसर्‍या वर्षाला प्रवेश घेतला. अकोलेत कामाला असणार्‍या अशोक ठुबे किंवा बसद्वारे आई गिरी यांना रोज जेवण पाठवत. इंग्रजी स्पेशल घेऊन त्यांनी झोकून अभ्यास केला. सोबत शिष्यवृत्तीत उर्वरित खर्च भागवायचा. पदवीनंतर नाशिकच्या ‘एचपीटी’त एमए इंग्रजीसाठी प्रवेश घेतला खरा, पण नोकरीची गरज लक्षात घेता ‘केटीएचएम कॉलेज’मधून बीएडचे शिक्षण पूर्ण केले. नंतर जुलै १९९१मध्ये कोपरगाव येथील एका विनाअनुदानित शाळेत रूजू झाले. त्यांच्या प्रयत्नाने शाळेचा इंग्रजी विषयाचा निकाल १७ टक्क्यांवरून ७६ टक्के लागला. १९९२ साली फेब्रुवारीत ते रयत संस्थेकडून सिन्नरच्या दापूर येथे रूजू झाले व गावकर्‍यांच्या आग्रहाखातर त्यांना तेव्हाच कायम करण्यात आले. गावकर्‍यांनी त्यांची इंग्रजी शिकवण्याची पद्धत पाहिली होती. यानंतर शाळेचा निकाल १७ वरून ४३ टक्के लागला. जो नंतर वाढतच गेला. लग्नानंतर त्यांनी गावी घर बांधले. १९९५ साली करंजी येथे बदली झाल्यानंतर एकदा सोमनाथ यांचा मुलगा आजारी पडला. गावात ना डॉक्टर, ना वाहनाची सुविधा. तेव्हा मोठी धावपळ करत त्यांनी दवाखाना गाठला. या गावात कुणी आजारी पडल्यास, साप चावल्यास त्याला मंदिरात आणून ठेवत. हे सगळं पाहून गिरी यांनी गावातून किमान एकाला तरी डॉक्टर बनविण्याचा निश्चय केला अन् गिरी यांची विद्यार्थिनी अपर्णा ही त्या गावातील पहिली डॉक्टर ठरली. या दरम्यान, सकाळी आणि सायंकाळी ते जादा तासिका घेत. २००४ ला मानोरी आणि नंतर दापूरच्या शाळेचा निकाल घसरल्याने ते २००७ साली पुन्हा दापूरला रूजू झाले. सगळ्यात ‘ढ’ समजली जाणारी ‘ब’ तुकडी त्यांच्याकडे देण्यात आली. यानंतर पहिल्याच वर्षी ९७ टक्के निकाल लागला. सध्या याच तुकडीतील ४७ विद्यार्थी चांगल्या पदांवर कार्यरत आहेत. गणोरेतील ग्रामस्थांच्या आग्रहाखातर ते २०११ला याठिकाणी रुजू झाले. पुन्हा २०२१ला दापूरला ग्रामस्थांच्या आग्रहाखातर ते पर्यवेक्षक म्हणून रुजू झाले. शाळेत विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज हॉल बांधावा अशी गावकर्‍यांची इच्छा असल्याने त्यांनी मुख्याध्यापकपदही नाकारले. अभ्यास केल्याने नोकरीसाठी पळापळ करावी लागली नाही. माझा प्रत्येक विद्यार्थी गुणवत्तेनुसार नोकरीला लागावा, असा माझा उद्देश असतो. मी पत्नीलाही बीएड शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले अन् आता ती शिक्षिका आहे. मी इंग्रजीमुळे नापास झालो. त्यामुळे मला इंग्रजीचे महत्त्व कळल्याचे गिरी सांगतात. ग्रामीण भागातील विद्यार्थी इंग्रजीअभावी प्रवाहाच्या बाहेर फेकला जातो. मात्र, गिरी यांच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे त्यांचा प्रत्येक विद्यार्थी इंग्रजी बोलतो. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडे ते वैयक्तिकरित्या लक्ष देतात. खेड्यात इंग्रजी शिकण्यासाठी शिक्षक सोडून दुसरा पर्याय नसतो. शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी ते ग्रामस्थांशी उत्तम समन्वय साधतात. इंग्रजी शिकण्यासाठी मोठा शब्दसंग्रह, वाचन आणि श्रवण महत्त्वपूर्ण आहे. इंग्रजीची भीती दूर करून, रोज दहा शब्द पाठ करून घेणे, इंग्रजीत बातमी लिहिणे, पाहणे या गोष्टी मी करवून घेतो. शिक्षक हा समाजाचा इंजिनिअर असून ती एक नोकरी नाही, तर व्रत आहे, असे गिरी सांगतात. गेल्या ३२ वर्षांत एकदाही ते वर्गात शिकवताना खुर्चीवर बसलेले नाही. प्रत्येक मुलाला इंग्रजी आलेच पाहिजे हा उद्देश, शिकविण्याआधी स्वतः अभ्यास करणे, जुन्या नोट्स स्वतःकडे न ठेवणे त्यांचे नियम आहेत. शिक्षकी पेशाला केवळ नोकरी न मानता व्रत समजणार्‍या सोमनाथ गिरी यांना दै. ‘मुंबई तरूण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा...
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.