आपल्या सर्वांनाच शेतीची एक सुप्त आवड असते. पण, बरेचदा ती पूर्ण होत नाही. पण, बरेचदा आपल्या शहरी जीवनशैलीमुळे आपल्याला या आवडीनिवडींना मुरड घालावी लागते. परंतु, आपल्या वेळेनुसार, आपल्या आवडीनुसार, परवडेल अशा दरात आपल्याला ही आपली आवड जोपासण्याची संधी मिळाली तर आपल्या सर्वांनाच नक्की आवडेल. अशीच संधी ‘स्टार्टअप’च्या माध्यमातून उपलब्ध करून देणार्या सूर्या पुजारी यांचा हा उद्यमप्रवास...
सूर्या यांचा लहानपणासूनच स्वतःचे आरोग्य जपण्याकडेच कल. आपली तब्येत आपणच जपली पाहिजे, त्यासाठी लागणार्या सर्व गोष्टी आपणच केल्या पाहिजेत, याकडे त्यांचा अगदी सुरुवातीपासूनच कटाक्ष असे. वयाच्या ७३व्या वर्षीही विशीतील तरुणासारखा त्यांचा उत्साह आणि त्याचे सर्व श्रेय हे त्यांच्या या सवयीलाच जाते, असे ते सांगतात.
सूर्या पुजारी यांचा मूळ व्यवसाय हा जाहिरात आणि मार्केटिंग क्षेत्रातला. मुंबईमध्ये ते याच क्षेत्रात व्यवसाय करत होते. व्यवसायाच्या निमित्ताने त्यांच्या अनेक लोकांशी गाठीभेटी व्हायच्या. मार्केटिंगचा व्यवसाय करत असताना आपण आरोग्य क्षेत्रात काहीतरी केले पाहिजे म्हणून त्यांनी स्वतःचा एक मार्केटिंग प्लॅटफॉर्म तयार केला, जेणेकरून आरोग्यासंबंधीची सर्व उत्पादनांची त्यांना विक्री करता येईल आणि त्याबद्दल माहितीचा प्रचार-प्रसार सुद्धा करता येईल. या प्लॅटफॉर्मवरून विविध आजारांवरची आयुर्वेदिक उत्पादनेही होती. या प्लॅटफॉर्मवरून या सर्व उत्पादनांचे मार्केटिंग ते करायचे. सुमारे २०-२५ वर्षे त्यांनी हा व्यवसाय केला. याच काळात त्यांच्याकडे अनेक औषध कंपन्यांबरोबरही त्यांनी काम केले. या औषध कंपन्यांबरोबर काम करताना सूर्या यांचा बर्याच शेतकर्यांशीही संपर्क आला. या शेतकर्यांशी चर्चा करत असताना, त्यांच्या शेतीच्या पद्धतींचा अभ्यास करत असताना, त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की, भारतातील शेतीमध्ये बहुतेक करून रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा वापर प्रामुख्याने होतो. या अतिवापरामुळे शेतीमधून येणारे पीकसुद्धा तसेच थोडेसे प्रदूषित असते. या प्रदूषणामुळे शेतकरी तसेच या पदार्थांचे सेवन करणार्या लोकांवरही याचा खूप वाईट परिणाम होतो. हे सर्व हळूहळू घडत जाते, ते लगेच जाणवत नाही म्हणूनच ते सर्वात जास्त धोकादायक आहे. म्हणूनच या कंपन्यांसोबत सूर्या यांनी एक संकल्पना राबवली ’विषमुक्त शेती.’ कमीत कमी प्रदूषण आणि कमीत कमी साईड इफेक्ट्स होतील, अशा पद्धतीने शेती करणे शक्य झाले पाहिजे आणि ते प्रशिक्षण देण्याचे काम या मोहिमेतून होत गेले.
हेच काम करत असताना सूर्या यांना असे आढळून आले की, असे काम करण्यासाठी शहरी भागातले लोकसुद्धा उत्सुक आहेत आणि त्यासाठी एक नवीन प्लॅटफॉर्म तयार करण्याची गरज आहे. याच गरजेवर उत्तर म्हणून ‘विकेंड फार्म्स’ ही नवीन संकल्पना त्यांनी आखली. या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागांना जोडून शहरी भागांतील लोकांनाही शेतीचा अनुभव घेण्याची संधी यातून सूर्या यांनी उपलब्ध करून दिली. ‘विकेंड फार्म्स’मध्ये मोठ्या शेतजमिनीचे छोट्या छोट्या प्लॉट्समध्ये रूपांतर करून लोकांना हव्या त्या स्वरूपात शेती करण्याची संधी इथे मिळते. कोणीही व्यक्ती आपला नोकरी-व्यवसाय सांभाळून हे काम करू शकते. ज्या व्यक्तीला इथे येऊन शेती करायची आहे, त्याने या ठिकाणी येऊन भाड्याने आपल्याला हवी तेवढी शेती घ्यावी. आपल्या शेतीसाठी लागणार्या सर्वच गोष्टी, मग ते मनुष्यबळ असेल, पाणी, वीज, खते, कुठले पीक घ्यायचे याचे मार्गदर्शन त्यांना केले जाईल. या सर्व गोष्टींचा वापर करून कोणीही शहरी व्यक्तीसुद्धा इथे शेतीचा आनंद लुटू शकते. आपल्या शेतीमध्ये कुठले उत्पादन घ्यायचे, हे आपणच ठरवायचे. या शेतीमध्ये साधा भाजीपाला, फळे यांसारखी पिके घेतली जातात. त्यासाठी लागणार्या सर्व आवश्यक बाबी या ‘विकेंड फार्मिंग’कडूनच पुरवल्या जातात. पण, इकडे मात्र फक्त सेंद्रिय शेतीच केली जाते. संपूर्णपणे विष, प्रदूषणमुक्त शेती करायची असल्याने केवळ त्याच पद्धतीने काम केले जाते. यामुळे आज या उपक्रमाला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला दिसतो. बर्याच मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम करणारे लोक या शेतीकडे वळले आहेत. तसेच ही संकल्पना दिवसेंदिवस लोकप्रिय होताना दिसते. आपले आरोग्य जपणे हा प्राधान्यक्रम असणे गरजेचे आहे आणि म्हणूनच ही संकल्पना लोकप्रिय होताना दिसते.
आजच्या काळात चहुकडे प्रदूषणाचा स्तर वाढता आहे. सर्वच गोष्टी म्हणजे माती, पाणी, हवा दिवसेंदिवस प्रदूषित होत चालल्या आहेत. अशा काळात एका पर्यायाची आपल्याला गरज आहे, जिथून आपल्याला प्रदूषणमुक्त वातावरणात राहता येईल, आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी चांगले अन्न, पाणी मिळणे शक्य होईल. याच भावनेतून हा ‘विकेंड फार्म’ तयार झाला आहे.
ही संकल्पना इतकी लोकप्रिय ठरली आहे की, बरेच आयटी इंजिनिअर्स तसेच इतर मोठ्या क्षेत्रात काम करणारे तंत्रज्ञ, व्यावसायिकसुद्धा या ‘विकेंड फार्म’कडे वळले आहेत. पुण्याजवळच्या एका छोट्याशा खेड्यातून सुरू झालेला हा प्रवास लक्षवेधी ठरला आहे.
अशा या प्रदूषणमुक्त शेती ही काळाची गरज आहे हे ओळखून या समस्येवर शाश्वत पर्याय शोधून, त्यामार्फत आपला व्यवसाय करणार्या सूर्या पुजारी यांना शुभेच्छा.