नवी दिल्ली: उत्तर-पश्चिम दिल्लीतील जहांगीरपुरी येथे गेल्या महिन्यात हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत जातीय हिंसाचार करणार्या आणखी तीन आरोपींना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तीन अल्पवयीन मुलांसह ३६ जणांना अटक केली आहे. झहीर खान उर्फ जलील (४८) आणि अनाबुल उर्फ शेख (३२) यांना शुक्रवारी जहांगीरपुरी येथून अटक करण्यात आली, तर तिसरा आरोपी तबरेज (४०) याला शनिवारी त्याच भागातून अटक करण्यात आली, असे अधिकार्यांनी सांगितले. जहीर खान आणि अनाबुल हिंसाचाराच्या दिवसापासून फरार होते. ‘सीसीटीव्ही’ फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाच्या आधारे त्यांची ओळख पटवण्यात आली. अधिकार्याने सांगितले की, जलील ‘सीसीटीव्ही’ फुटेजमध्ये पिस्तूल दाखवताना दिसला होता. त्याने त्यातून गोळीबार केला की, नाही याचा तपास केला जाईल. अनाबुल हा चकमकींमध्ये सामील होता. या हिंसाचारात तबरेझचाही सहभाग असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तांत्रिक पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाच्या आधारे ही अटक करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.