भ्रमाचा भोपळा फुटणार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-May-2022   
Total Views |

prashant
 
 
 
 
तथाकथित राजकीय चाणक्य प्रशांत किशोर हे नवा पक्ष स्थापन करण्याच्या पेरलेल्या चर्चांना गेल्या अनेक दिवसांपासून उत आला होता. आता स्वतः किशोर यांनी या सर्व चर्चांवर पडदा टाकला आहे. नव्या पक्षस्थापनेच्या चर्चा त्यांनी फेटाळून लावत बिहारमध्ये यापुढे ते लक्ष केंद्रित करण्यावर भर देणार आहे. दि. २ ऑक्टोबरपासून ते बिहारच्या पश्चिम चंपारणपासून तब्बल तीन हजार किलोमीटरची पदयात्रा काढणार आहे. पुढील तीन ते चार वर्षांत प्रशांत किशोर जवळपास १७ हजार, ५०० लोकांशी संवाद साधणार आहेत. देशभरात अनेक पक्षांसाठी किशोर यांनी राजकीय रणनितीकाराची भूमिका पार पाडली. भाजपसोबत त्यांनी तृणमूल, काँग्रेस, जेडीयू या पक्षांसोबतही काम केले. यावेळी पक्षाच्या विजयाचे श्रेय केवळ आपल्या माथी कसे ठसवायचे यात किशोर चांगलेच पारंगत होते. त्यामुळे ‘माझ्यामुळेच तुमचा पक्ष विजयी होतो,’ अशा आविर्भावात ते वावरू लागले. मात्र, नंतर किशोर यांचीच फसवणुकीची रणनिती समोर येत गेली. नंतर त्यांनी काँग्रेसला चुचकारण्याचा प्रयत्न केला खरा, पण काँग्रेसमध्ये गुलामी हुजरेगिरी करावी लागेल, याचा अंदाज आल्यानंतर त्यांनी तिथूनही काढता पाय घेतला. आता किशोर यांनी केवळ आणि केवळ बिहारवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठीच त्यांनी आता पदयात्रेची घोषणा केली असून, त्यामागे त्यांचा सुशासनाच्या नावाखाली सत्ता मिळवण्याचा प्रयत्न स्पष्टपणे दिसून येतो. किशोर यांनी बिहारची निवड करण्यामागे अनेक कारणे आहेत. सर्वप्रथम किशोर यांनी नितीशकुमार यांच्यासाठी रणनितीकार म्हणून काम केले आहे. एवढेच नाही तर त्यांनी नितीशकुमार यांच्या कामापासून प्रभावित होऊन जेडीयूतदेखील प्रवेश केला होता. मात्र, त्यांनी काही काळातच पक्ष सोडला. बिहारच्या राजकारणात सध्या नेतृत्वाची सध्या मोकळी निर्माण झाली आहे. नितीशकुमार यापुढे निवडणूक लढविणार नाहीत. लालूपुत्रांचे भवितव्यही तसे अधांतरीच. चिराग पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष तर फुटला. त्याचप्रमाणे बिहार काँग्रेसमध्येही सक्षम नेतृत्व नाही. त्यामुळे प्रशांत किशोर यांना बिहारमध्ये आपली डाळ शिजेल, असा अंदाज आहे. त्यामुळे आता पक्षाची अधिकृत घोषणा करण्याचा मोह किशोर यांनी टाळला असली तरी भविष्यात काय होणार आहे, याचे ट्रेलर आज दिसून आले.
 
 
अधीर मनो‘रंजन’ झाले!
 
 
 
काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांना नुकताच एक अनोखा साक्षात्कार झाला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानामध्ये स्विमिंग पूल असून त्यात अंघोळ करत ते परदेशात जातात, अशी मुक्ताफळे उधळली. नुकताच काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचा नेपाळमधील ‘पब’मधील एक व्हिडिओ ‘व्हायरल’ झाला होता. त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर टीकेची झोड उठली. राहुल गांधी यांनी काय करावं, हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. मात्र, राजस्थान, केरळ आणि बंगालमध्ये हिंदूंवरील वाढत चाललेले जीवघेणे हल्ले आणि काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष शोधण्यासाठी करावी लागणारी धावपळ, या सगळ्या विषयांना बगल देऊन लग्नाच्या नावाखाली नेपाळमध्ये ‘पब’मध्ये जाऊन आनंदात न्हाऊन निघणे, हे काही रूचत नाही आणि नंतर निवडणुकीत पराभव पदरात पडला की मग इव्हीएम मशीनच्या नावाने बोंबाबोंब करायची. इकडे ‘पब’मधील व्हिडिओमुळे राहुल यांच्यावर टीका सुरू झाल्यानंतर अधीर रंजन यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली. मात्र, मुद्द्यांच्या आधारे टीका करायची सोडून काहीतरी बाष्कळ बडबड करून त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेचे जाहीर प्रदर्शन केले. पंतप्रधान मोदी यांच्या दौर्‍यावर टीका करण्याआधी त्यांच्या दौर्‍यामुळे नेमकं भारताच्या पारड्यात काय पडलं, हेही काँग्रेसने एकदा समजून घेणे आवश्यक आहे. डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसन या स्वतः विमानतळावर पंतप्रधान मोदींच्या स्वागताला हजर होत्या. तसेच, भारतीय मूळ असलेल्या नागरिकांना मोदी संबोधित करतानाही त्या आपल्या व्यस्त वेळापत्रकातून उपस्थित होत्या. जर्मनी आणि फ्रान्समध्येही मोदींचे जोरदार स्वागत झाले. या युरोप दौर्‍यादरम्यान महत्त्वपूर्ण करारदेखील झाले. मात्र, काँग्रेसला या दौर्‍यात त्यांच्या विमानात स्विमिंग पूल असल्याचा साक्षात्कार झाला. पण, असे चित्रविचित्र शोध लावून काँग्रेस नेमके काय साध्य करू पाहत आहे, हा न समजणारा प्रश्न आहे. नुकत्याच पार पडलेल्या गुवाहाटी महानगरपालिकेमध्येही काँग्रेसचा सुपडा साफ झाला आणि भाजपने प्रचंड बहुमत मिळवले. मात्र, काँग्रेसला त्याची काहीही पडलेली नाही. एक एक राज्य आणि महापालिका हातातून निसटत असताना काँग्रेसच्या लोकसभेतील एका महत्त्वपूर्ण नेत्याने अशी बेताल वक्तव्ये करणे, ही खुद्द काँग्रेससाठी चिंतेची बाब म्हणावी लागेल.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@