दिव्यांग आणि विशेष बालकांसाठी आरोग्य विमा योजना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2022   
Total Views |

handicafe
 
 
 
 
 
 
पालकांच्या दुर्दैवाने किंवा त्या बालकांच्या दुर्दैवाने काही पालकांना जन्मत:च दोष असलेली काही ‘खास’ मुले त्यांच्या पदरी जन्माला येतात. या बालकांची विशेष काळजी घ्यावी लागते. यांच्या पालनपोषणासाठी सामान्य मुलांपेक्षा जास्त खर्च होतो. परिणामी, अशा मुलांना आरोग्य विम्याचे काय संरक्षण आहे, याविषयी आजच्या लेखात माहिती करुन घेऊया.
 
 
 
एका उपलब्ध आकडेवारीनुसार, दिव्यांग बालकांवर वर्षाला साधारणपणे दोन ते चार लाख रुपये खर्च येतो. अशा मुलांना रुग्णालयात भरती व्हावे लागले, तर सर्व पॉलिसी, खर्चाची भरपाई दिली जात नाही. पण, काही विमा कंपन्यांच्या अशा मुलांसाठी खास आरोग्य विमा पॉलिसी आहेत. ‘मॉम्स बिलीफ’ या ‘मेंटल हेल्थकेअर’ व ‘वेलनेस प्रोव्हायडर कंपनी’ने अशा मुलांसाठी सर्वसमावेशक विमा पॉलिसी कार्यरत केली आहे. ही पॉलिसी म्हणजे ‘आद्विक चाईल्ड कॉम्प्रिहेन्सिव्ह केअर प्रोग्राम.’ विशिष्ट मुलांना आरोग्य विम्याचे संरक्षण देणारी ही पॉलिसी या कंपनीने ‘केअर हेल्थ इन्शुरन्स’ या कंपनीच्या सहकार्याने बाजारात आणली आहे. ‘केअर हेल्थ इन्शुरन्स’ ही कंपनी या पॉलिसीची ‘अंडररायटर’ आहे.
 
 
 
ही पॉलिसी ‘आयपीडी’ (‘इन पेशंट डिपार्टमेंट’म्हणजे रुग्णालयात भरती होऊन उपचार घेणे व ‘ओपीडी’ (आऊट पेशंट डिपार्टमेंट-बाह्यरुग्ण) अशा दोन्ही पद्धतीने उपचार घेणार्‍यांना विमा संरक्षण देते. या पॉलिसीचे चार पर्याय आहेत. पहिला पर्याय म्हणजे ‘आयपीडी’ व ‘ओपीडी’ दोन्हीचे संरक्षण देणारी पॉलिसी. समजा, ही पॉलिसी दीड लाख रुपयांची घेतली, तर ‘जीएसटी’सह रुपये २२ हजार, ९५५ रुपये ‘प्रीमियम’ भरावा लागेल, जर चार लाख रुपयांची पॉलिसी उतरविली, तर ४४ हजार, ८८६ रुपये ‘जीएसटी’सह ‘प्रीमियम’ भरावा लागेल. ही पॉलिसी फेब्रुवारी २०२२ पासून कार्यरत झाली. पहिल्या टप्प्यात या २०० पॉलिसी विकल्या गेल्या, तर दुसर्‍या टप्प्यात ५०० पॉलिसी विकल्या गेल्या. सध्या या कंपनीकडे ४०० जणांचे अर्ज छाननी अवस्थेत आहेत. या पॉलिसीत ‘ओपीडी’चे संरक्षण पॉलिसी उतरविल्यापासून म्हणजे पहिल्या दिवसापासूनच मिळते.
 
 
 
‘कॅशलेस क्लेम’ संमत होण्याची सुविधाही या पॉलिसीत आहे. ‘आयपीडी’च्या बाबतीत पॉलिसी काढताना बालकाला काही दीर्घ कालावधीचा आजार असेल, तर या आजाराच्या खर्चाचा दावा पॉलिसी उतरविल्यापासून पहिली दोन वर्षे संमत केला जात नाही, म्हणजे पहिली दोन वर्षेे ‘वेटिंग पीरिएड’असतो. ही पॉलिसी ‘फ्लोटर’ घेण्याचाही पर्याय उपलब्ध आहे. ‘फॅमिली फ्लोटर’ पॉलिसीमध्ये बालकाबरोबर एका पालकालाही समाविष्ट करण्यात येते. एखादे मूल जर आत्मकेंद्रित असेल, तर अशा मुलाच्या पालकांचे कौन्सिलिंग करणेही बर्‍याच वेळा गरजेचे असते. जर ‘फॅमिली फ्लोटर’ पॉलिसी उतरविली असेल, तर पालकांच्या कौन्सिलिंगच्या खर्चाची भरपाईही मिळू शकते. ‘ओपीडी’चे संरक्षण तत्काळ मिळते. पण, शारीरिक चाचण्या व ‘फूड सप्लिमेंट्स’ व झालेला खर्च पूर्ण मिळत नाही काही प्रमाणात मिळतो, तर काही प्रमाणात खर्च पॉलिसीधारकाला त्याच्या खिशातून करावा लागतो. या पॉलिसीत मुलांच्यासाठी केलेल्या खर्चाचा काही भाग पालकांना सहन करावा लागतो. ‘आयपीडी’ उपचार हे ‘हेल्थ केअर इन्शुरन्स’च्या नेटवर्क हॉस्पिटलमध्येच द्यावे लागतात. हॉस्पिटलच्या खोलीचे भाडे पूर्ण संमत केले जात नाही. हे मंजूर करण्यासाठी बर्‍याच शर्ती आहेत. बालकात जर ‘ब्युरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर’ (नसांशी संबंधित आजार) असेल, तर याचे संरक्षण मिळण्याचा पर्याय या पॉलिसीत उपलब्ध आहे.
 
 
 
अन्य पर्याय
 
 
 
भारत सरकारच्या ‘नॅशनल ट्रस्ट कायदा १९९९’नुसार अशा बालकांसाठी तसेच दिव्यांगांसाठी ‘निर्मया हेल्थ इन्शुअरन्स पॉलिसी’ अस्तित्वात आहे. सध्या या पॉलिसीची ‘अंडररायटर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी’ असून ‘टीपीए’ (थर्ड पार्टी अ‍ॅडमिनिस्ट्रेटर) कंपनी ही ‘रक्षा हेल्थ इन्शुरन्स’ आहे. या पॉलिसीत ‘आयपीडी’ उपचाराचा खर्च रुग्णाला किंवा त्याच्या नातलगांना करावा लागतो व नंतर विम्याचा दावा करता येतो. ‘ओपीडी’मध्ये शारीरिक चाचण्यांचा खर्च संमत होऊ शकतो. ही पॉलिसी एक लाख रुपयांचीच उतरविता येते. यापैकी उपचारासाठी मिळणारा कमाल खर्च पुढीलप्रमाणे - ‘आयपीडी’ उपचार रुपये ५५ हजार, ‘ओपीडी’ उपचार रुपये १९ हजार, थेरपी उपचार रुपये २० हजार, अन्य पर्यायी औषधे रुपये चार हजार व रुग्णाचा प्रवासखर्च रुपये दोन हजार.एक लाख रुपयांच्या विम्याला प्रत्येक व्यक्तीमागे रुपये २५० प्रीमियम आकारला जातो व ज्या व्यक्ती दारिद्यरेषेच्या खाली आहेत, अशांना एक लाख रुपयांच्या विमा संरक्षणासाठी फक्त ५० रु. प्रीमियम भरावा लागतो. पॉलिसीचा कालावधी एप्रिल ते मार्च असतो.
 
 
 
स्टार हेल्थ इन्शुरन्स 
 
 
 
‘स्टार हेल्थ इन्शुरन्स’ कंपनीकडे ही अशा प्रकारच्या पॉलिसी आहेत. ‘स्टार स्पेशियल केअर पॉलिसी’ तीन वर्षांच्या मुलांपासून ते २५ वर्षांच्या तरुणांना अशा प्रकारच्या उपचारांसाठी संरक्षण देते. ही पॉलिसी दोन लाख रुपयांची उतरावी लागते. ‘ओपीडी’ उपचाराचा खर्च फार कमी रकमेचा संमत केला जातो. आलेल्या खर्चापैकी ८० टक्के रक्कम दावा म्हणून संमत होऊ शकते. उरलेल्या २० टक्के रकमेचा भार पॉलिसीधारकाला सोसावा लागतो. या पॉलिसीत या विशेष बालकांच्या उपचार पद्धतीवर होणार्‍या खर्चाचा दावा संमत होतोच, याशिवाय अशा बालकाची जर ‘टॉन्सिल’ची शस्त्रक्रिया झाली किंवा हाड ‘फ्रॅक्चर’ होऊन त्याची शस्त्रक्रिया झाली किंवा अन्य काही शस्त्रक्रिया झाली किंवा अन्य आजारांवर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात भरती व्हावे लागले, तर हे दावेही संमत होतात. या पॉलिसीचे बरेच स्वरुप हे सर्वसाधारण आरोग्य विमा पॉलिसी सारखेच आहे. या तीन लाख रुपयांच्या पॉलिसीला रुपये ७ हजार, १६९ इतका ‘प्रीमियम’ भरावा लागतो. कित्येक ट्रस्ट किंवा सामाजिक संस्थादेखील अशा पालकांना आर्थिक मदत करतात. कारण, विमा संरक्षण घेतले, तरी सर्व खर्च परत मिळत नाही, अशा बालकांवर उपचारासाठी बराच खर्च होतो.
 
 
 
करसवलत
 
 
 
प्राप्तिकर कायद्याच्या ‘कलम ८०डी’अन्वये भरलेल्या आरोग्य विमा प्रीमियमवर करसवलत मिळते. अशा मुलांच्या पालकांसाठी प्राप्तिकर कायद्यात आणखीन काही सवलती उपलब्ध आहेत. प्राप्तिकर कायद्याच्या ‘कलम ८० डीडी’अन्वये अशा बालकांच्या वैद्यकीय उपचारांवर केलेला खर्च करसवलतीस पात्र आहे. जर दिव्यांग ४० टक्क्यांपर्यंत असेल, तर ७५ हजार रुपयांपर्यंतची करसवलत आहे. जर दिव्यांग ८० टक्क्यांहून अधिक असेल, तर १ लाख, २५ हजार रुपयांपर्यंत कर सवलत आहे. कोणतीही पॉलिसी विकत घेण्यापूर्वी त्याचे फायदे अभ्यासा, नियम अभ्यासा. कमी उत्पन्न असणार्‍यांनी सरकार पुरस्कृत ‘निर्मया हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी’ घ्यावी.दुर्दैवाने अशा बालकांसाठी सरकारची पॉलिसी असूनही, ही पॉलिसी विशेष कोणाला माहिती नाही. परिणामी, अशा पालकांसाठी या पॉलिसीची सरकारतर्फे जोरदार जाहिरात व्हायला हवी. ‘आद्विक चाईल्ड कॉम्प्रिहेन्सिव्ह केअर पॉलिसी’ सर्वात महाग आहे, पण या पॉलिसीचे फायदेही चांगले आहेत. मध्यमवर्गीय पालक ‘स्टार स्पेशियल केअर’चा ‘प्रीमियम’ सहज भरू शकतील. पण, पॉलिसी घेताना, तिन्ही पॉलिसींचा अभ्यास करून आपल्या पाल्यासाठी कोणती पॉलिसी योग्य आहे, याचा योग्य निर्णय घेऊन पॉलिसी उतरवावी.
 
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@