सिब्ब्लांचा ‘सायकल’ला ‘हात’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-May-2022   
Total Views |

kapil sibbal

जुने काँग्रेसी आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला रामराम करत चक्क समाजवादी पार्टीच्या समर्थनाने राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर २०२४ साली मोदी सरकारला पराभूत करण्यासाठी वातावरण निर्मिती करण्याच्या बाष्कळ गप्पाही त्यांनी मारल्या. सिब्बल यांनी सपाचे नेते आझम खान यांचा खटला न्यायालयात लढवला आणि त्यांना जामीनही मिळवून दिला. सपाला मदत करण्याची सिब्बल यांची ही पहिलीच वेळ नाही. याआधी निवडणूक आयोगातही पक्षचिन्हाच्या बाबतीत सिब्बल यांनी अखिलेश यादव यांच्या बाजूने ‘लॉबिंग’ करून त्यांना विजय मिळवून दिला होता. तसेच, सिब्बल यांनी मुलायमसिंह यादव यांच्यासह सपाच्या अनेक नेत्यांसाठी इतर काही प्रकरणांमध्ये बाजू मांडली आहेत. त्यामुळे सिब्बल यांना मिळालेली ही संधी आझम खान यांना जामीन मिळवून दिल्याची बक्षिसी तर नाही ना, असे म्हणण्यास नक्की वाव आहे. दरम्यान, आझम खान २७ महिन्यांनंतर सीतापूर कारागृहातून बाहेर आले. सिब्बल यांनीच न्यायालयात त्यांची बाजू मांडली. आझम खान आणि अखिलेश यादव यांच्यातील सुप्त संघर्ष लपून राहिलेला नाही. त्यामुळे अखिलेश राज्यसभा निवडणुकीच्या माध्यमातून पक्षातील अंतर्गत राजकारण शमवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत, अशा स्थितीत सिब्बल यांना सपातर्फे आझम यांचे मन वळवण्याची जबाबदारी दिली, तर नवल वाटू नये. नाराज आझम यांना सिब्बल यांच्यामार्फत खूश करण्याचा प्रयत्न अखिलेश यांच्याकडून होताना दिसून येत आहे. त्याचवेळी नाराज आझम यांना सिब्बल यांच्या माध्यमातून सहज हाताळता येऊ शकते. आझम यांनीही सिब्बल यांना राज्यसभेवर पाठवल्याचे स्वागत केले आहे. सिब्बल यांची फी भरण्याची आमची क्षमता नसल्याचे आझम यांनी सांगितले होते आणि आता सिब्बल यांनी राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे न्यायालयात बाजू मांडणारे सिब्बल केवळ एका खासदारकीसाठी लाचार झाले. वकिली पेशाही आता स्वतःचे राजकारण चमकवण्यासाठी उपयोगात आणला जात असेल, तर एकंदरीत अवघड आहे. काँग्रेससाठी न्यायालयाचे दरवाजे अर्ध्या रात्री ठोठावणारे सिब्बल सपात गेल्याने काँग्रेसच्या गोटात मातम पसरणार हे मात्र, नक्की....

‘आप’चा दुतोंडी चेहरा उघड
पंजाब पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नुकतीच पंजाबचे आरोग्यमंत्री विजय सिंगला यांना अटक केली. सिंगला यांच्यावर राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने काढलेल्या निविदांमध्ये एक टक्के कमिशन घेतल्याचा आरोप आहे. भ्रष्टाचाराने घेरलेल्या मंत्र्याची मुख्यमंत्री भगवंत मान यांनी चहूबाजूंनी टिकेची झोड उठल्यानंतर पदावरून हकालपट्टी केली. पंजाबच्या मानसा विधानसभा मतदारसंघातून सिंगला यांनी काँग्रेसचे उमेदवार गायक सिद्धू मूसवाला यांचा पराभव केला होता. पंजाब विधानसभा निवडणुकीत त्यांना सर्वाधिक मते मिळाली. गेल्या तीन दशकात प्रथमच मानसा मतदारसंघाच्या आमदाराला मंत्रिपदाची संधी मिळाली होती. त्यामुळे आता सुसंस्कृत राजकारणाच्या गप्पा मारत मतांचा जोगवा मागणार्‍या ‘आप’वर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. आरोग्यमंत्री भ्रष्टाचारात गुंतले असल्याचे भक्कम पुरावे पोलीस आणि प्रशासनाकडे असल्याची कबुलीही मान यांनी दिली आहे. मान यांनी सिंगला यांनी चूक मान्य केल्याचे सांगत ‘आप’ हा प्रामाणिक पक्ष असल्याचा आवही आणला. मात्र, पंजाबमध्ये सरकार येण्याआधी केजरीवालांनी छातीठोकपणे भ्रष्टाचार संपवण्याच्या गोष्टी केल्या. आश्चर्याची बाब म्हणजे, अरविंद बाबूंनी हा भ्रष्टाचार केवळ दहा दिवसांत संपवण्याचे दिवास्वप्न पंजाबच्या जनतेला दाखवले होते. मात्र, पंजाबच्या जनतेचा अवघ्या दोन महिन्यांतच भ्रमनिरास झाला. सिंगला यांना अटक झाली खरी मात्र अजूनही किती मंत्री कमिशन घेतात, हा प्रश्नच आहे. कळसूत्री बाहुले म्हणून वावरणारे भगवंत मान यांना दिल्लीतील अरविंद बाबूंकडून नक्कीच दिशानिर्देश मिळाले असतील. ‘आप’ने उमेदवार निवडताना आणि मंत्रिपद देताना याचा विचार आधी केला का नाही, असा प्रश्न उभा राहतो. दरम्यान, स्वतःला ‘आम’ म्हणवून घेणार्‍या ‘आप’चा दुतोंडी चेहरा पहिल्यांदाच उघडकीस आला असे नाही. केजरीवालांनी २०१५ साली भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर लाईव्ह टीव्हीवर अन्न आणि नागरी पुरवठामंत्री वसीम अहमद खान यांना हटवण्याची घोषणा केली होती. ‘आप’चे राज्यसभा खा. राघव चढ्ढा यांनीही त्यांच्या पक्षाच्या ‘अखंडता, धैर्य आणि न्याय’ या निर्णयाबद्दल पंजाब सरकारला फटकारले होते. त्यामुळे आम्ही साधेभोळे असल्याचा आव आणून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणार्‍या ‘आप’चा दुतोंडी चेहरा आता सर्वांसमोर उघडा होत चालला आहे.





@@AUTHORINFO_V1@@