वेदनेला आस्मान दाखविणारी प्रितम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-May-2022   
Total Views |
 
  
 
pritam
 
 
‘आता रडायचं नाही, तर लढायचं’ असा निश्चय त्यांनी मनी बाळगला. स्वतःचं संपलेलं आयुष्य पुन्हा नव्याने उभं केलं. जाणून घेऊया ५६ प्रकारचे लोणचे विकणार्‍या उद्योजिका प्रितम जाधव यांच्याविषयी...
 
 
तब्बल पाच पिढ्यांनंतर लातूरच्या कानडी बोरगावमध्ये पाटील कुटुंबात प्रितम यांच्या रूपाने मुलीचा जन्म झाला. वडील माऊली हे गावचे पोलीस पाटील. प्रितम बालपणापासूनच लाडात वाढल्या. विशेष म्हणजे, प्रितम यांचे जन्मगाव हे उस्मानाबाद, लातूर आणि बीड या तिन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर. प्रितम यांनी बीड जिल्ह्यातील अंबोजोगाई तालुक्यातील योगेश्वरी नूतन विद्यालयात सातवीपर्यंतचे व गोदावरीबाई कुंकूलोळ शाळेत दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्या अभ्यासात जेमतेम तर होत्याच, पण कोणत्याही कलेत निपुण नव्हत्या. केवळ शाळेत जाणे-येणे असा त्यांचा दिनक्रम असायचा. परिणामी, त्यांच्यामधील कोणताही कलागुण बाहेर आला नाही.
 
 
 
स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयातून त्यांनी वाणिज्य शाखेतून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करत दयानंद महाविद्यालयात पदवीसाठी प्रवेश घेतला. यानंतर त्या लातूर शहरात काकूंच्या घरी राहिल्या. वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर त्यांनी शिक्षण सोडण्याचा विचार केला. मात्र, वडिलांनी विरोध करत पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेण्यास प्रोत्साहित केले. याचदरम्यान, त्यांना लग्नासाठी स्थळं येण्यास सुरुवात झाली आणि २०११ साली त्या लग्नबंधनात अडकल्या. सर्व काही आनंदी वातावरण असताना त्यांच्या पतीला लग्नाच्या दुसर्‍या दिवशी चक्कर आली. हा प्रकार दररोज सुरू होता. मात्र, सासरच्या मंडळींकडून हा प्रकार सामान्य असल्याचे सांगण्यात आले. त्यातच पती व्यसनाधीन असल्याचे समजले. प्रितम यांना मारहाण सुरू झाल्याने त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला. आपली फसवणूक झाल्याचे एव्हाना त्यांच्या लक्षात आले होते. त्यावेळी प्रितम यांनी वडिलांना बोलावून घेत सगळा प्रकार सांगितला. मात्र, तरीही सगळं ठीक होईल, या आशेवर प्रितम यांनी संसार सुरूच ठेवला. सासरच्या मंडळींकडून मात्र या प्रकाराची पाठराखण सुरूच होती. दिराचे निधन झाल्यानंतर त्यांनी घरगुती कापडाचा व्यवसाय सांभाळण्यास सुरुवात केली. मात्र, काही काळानंतर ते दुकानही बंद पडले. ‘व्यसनमुक्ती’ केंद्रात नेऊनही कसलीही सुधारणा झाली नाही. शाळेत नोकरी करत असलेल्या प्रितम यांच्या शाळेतही पतीने येऊन भांडण केले. परिणामी, त्यांना ती नोकरीही सोडावी लागली. लहान मुलाला त्यांनी माहेरी शिकण्यासाठी पाठवले, तर मोठा मुलगा हॉस्टेलमध्ये. भयानक यातना सहन करत असलेल्या प्रितम यांनी एकदा विषारी पदार्थाच्या साहाय्याने आत्महत्येचा पर्याय पत्करला. मात्र, तो अयशस्वी ठरला. नंतर मुलांच्या भविष्याचा विचार करून त्यांनी निकराने लढण्याचा निश्चय केला.
 
 
 
२०१८ साली दिवाळीत एके पहाटे 3 वाजता प्रितम यांच्या पतीने त्यांना व त्यांच्या सासूलाही मारहाण केली. अखेर प्रितम यांनी भर पहाटे घर सोडले आणि त्या माहेरी आल्या. यापुढचा प्रवास कठीण होता. रडायचं की लढायचं, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. तब्बल दीड वर्ष त्या घराबाहेर पडल्याच नाहीत. निरस झालेल्या आयुष्यात प्रितम खचल्या होत्या. ना कसला आनंद ना कसलं दुःख. ‘लॉकडाऊन’च्या काळात आवड म्हणून त्यांनी बेकिंग, कुकिंग, मिठाई बनवण्यास सुरुवात केली. वाणिज्य शाखेचे शिक्षण घेतलेल्या प्रितम स्वतःच्या पायावर उभ्या राहण्यासाठी धडपडत होत्या. स्वतःचे एखादे उत्पादन असावे व स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने त्यांनी लोणच्याचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. लातूर शहरात त्या भाड्याच्या घरात राहू लागल्या. सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण करत त्यांनी ऑक्टोबर २०२० मध्ये ‘समर्थ फुड्स’ नावाची कंपनी स्थापन करून त्या अंतर्गत ‘सुगरणीचे लोणचे’ नावाने व्यवसायास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी एक महिना अभ्यास व अनेक प्रयोग करून पाहिले. उत्पादन, उत्तम आणि आरोग्यदायी असावे, या हेतूने त्यांनी घरच्या घरीच विविध प्रकारचे लोणचे बनवण्यास सुरुवात केली. घरीच पाऊचमध्ये आणि जुगाडू पद्धतीने त्या लोणचे विकू लागल्या. पॅकेजिंग आणि ब्रॅण्डिंगच्या साहाय्याने त्यांच्या लोणच्याला अल्पावधीतच मोठा प्रतिसाद मिळू लागला.
 
 
 
व्यवसायाच्या पहिल्या वर्षातच त्यांचे तब्बल सहा हजार किलो इतके लोणचे विकले गेले. कारले, लसूण, लिंबू, ओली हळद, मोड आलेली मेथी, आवळा, करवंद, ड्रायफ्रुट्स, आयुर्वेदिक अशा जवळपास ५६ हून अधिक प्रकारचे लोणचे सध्या त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. नुकतेच त्यांनी ‘सुगरणीचे लोणचे’ हे अद्ययावत दालनही सुरू केले असून, त्यांच्या या व्यवसायातून दहा ते बारा जणांना रोजगारदेखील मिळाला आहे. “कोणताही अन्याय सहन करणे, हा गुन्हा आहे. मोठ्या संघर्षानंतर एखाद्या ठिकाणी थांबल्यावर जो आनंद मिळतो तो मला ‘सुगरणीचे लोणचे’मधूनमिळाला. मी शून्यातून उभे राहिले, त्यामुळे कोणत्याही महिलेने स्वतःला कमी लेखू नये,” असे प्रितम सांगतात.
 
 
 
संपलेल्या आयुष्याला आपल्या जिद्दीच्या आणि संघर्षाच्या बळावर पुन्हा नवसंजीवनी प्रितम यांनी दिली. आज त्या दोन मुलांची जबाबदारी स्वतः एकटीच्या बळावर सांभाळत हजारो महिलांसाठी प्रेरणा ठरल्या आहेत. मरणयातना सहन करून स्वतःची यशोगाथा लिहिणार्‍या प्रितम यांना आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@