‘उठा’धूर्त...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-May-2022   
Total Views |

uddhav 
 
 
 
 
 
इतके दिवस त्यांचे राहणीमान, त्यांचे ते सामान्य अशक्त माणसासारखे दिसणे-बोलणे यावर जाऊ नका बरं! कारण, त्यांनी आता स्वत:च कबूल केले की, ते बाळासाहेबांसारखे भोळे नाहीत, तर धूर्त आहेत आणि फसणार नाहीत. याचा अर्थ सामान्य माणसाने काय समाजावे? ‘उठा’ जेव्हा म्हणतात की, “मी धूर्त आहे, मी फसणार नाही,” त्यावेळी भोळ्या असणार्‍या बाळासाहेबांच्या भोळेपणाचा फायदा कुणी घेतला, हे ‘उठां’ना सांगायला हवे. बाळासाहेब भोळे होते, म्हणून त्यांना कुणी फसवत होते का? कोण होते फसवणारे? असे तर नाही ना की, कुणीतरी त्यांच्यासमोर अतिशय साधेभोळे रूप घेतले असेल आणि बाळासाहेबांकडून सत्तेचा मार्ग मोकळा करून घेतला असेल? कोण असेल असे? दुसरे असे की, ज्या बाळासाहेबांसाठी उद्धव ठाकरे यांना लाखो सैनिकांनी सहन केले, त्याच बाळासाहेबांबरोबर उद्धव ठाकरे स्वत:शी तुलना कशी करू शकतात? बाळासाहेब भोळे आणि हे अतिशय चतुर- हुशार का? अर्थात, स्वत:ला ‘धूर्त’ म्हणवून घेतले, हेही नसे थोडके! असो.
 
 
माणसाला सहज काहीही मिळाले की, त्याची किंमत नसते. तसेच तोंडात सोन्याचा चमचा आणि सत्ता भोगायचे नशीब घेऊन आले की, कसले तारतम्यही नसतेच वाटते. माझे हे असे मत होण्यास, दोन महापुरुषांची कर्तृत्वे कारणीभूत आहेत. एक आहेत दिल्लीचे राजकुमार राहुल गांधी आणि दुसरे आपले महाराष्ट्राचे ‘उठा.’ आता ‘उठां’चा विषय निघालाच आहे, तर त्यांची मराठी आठवल्याशिवाय राहणार आहे का! वा! काय ती अतिशय वेगळ्या धाटणीची मराठी. ती मराठी ऐकणार्‍यांची हसून-हसून मुरकंडी वळते. आठवा ‘ते’ ‘फेसबुक लाईव्ह.’ खरे सांगते, महाराष्ट्र कोरोनातून बाहेर गेला तो केवळ आणि केवळ ‘उठा’ यांच्या ‘फेसबुक लाईव्ह’मुळे. असे ‘उठा’ खरेच फसणारे नाहीत. काय म्हणता, मग ते फसवणारे आहेत का? नाही...नाही. ‘उठा’ फसत नाहीत. मग, फसवतात का? याचे उत्तर मी देऊ शकत नाही. याचे उत्तर भाजपला स्पष्ट बहुमत देऊनही महाविकास आघाडी डोक्यावर बसलेल्या महाराष्ट्राची जनताच देऊ शकते. कोरोना काळात मोठ्या आशेने जगायची संधी शोधणार्‍या, पण हातात काहीच न आलेली महाराष्ट्राचे त्रासलेले गोरगरीब नागरिकच याचे उत्तर देऊ शकतील. तसेही साहेब धूर्त आहेत. साधीभोळी मराठी जनता ऐकतेय ना...!
 
 
आता आणखी किती तुटायचे?
 
 
तुटून पडा... तुटून पडा... सांगतात उठा,
सांगतात उठा, तुटून पडा...
 
 
 
साहेबांनी ‘तुटून पडा’ सांगितलंय, पण ‘तुटून पडा’ म्हणजे काय करायचं? दररोजच्या गरजेच्या कामांना स्थगिती देईन म्हणतो. नको... नको, त्यापेक्षा सगळ्यात ‘बेस्ट’ म्हणजेच ‘फेसबुक लाईव्ह’ करतो आणि तुटून पडतो. हं! तेच ‘बेस्ट ऑप्शन.’ कारण, सकाळी ९च्या आत आम्ही काय बोलतो, ते ऐकायला ‘न्यूज चॅनेल’ कशाला येतील. शिवीगाळ करू नये, असे संस्कार असल्यामुळे आम्ही काही शिवीगाळ करत नाही. शिवीगाळ नाही. फुकाच्या मोठमोठ्या गप्पा नाहीत. ‘टाईमपास’ नाही की खोटारडेपणाचा कळस नाही. मग, कशाला कोण पत्रकार आमचे ‘बाईट’ घ्यायला येतील. तसेही ते खाते सांभाळायला आमच्याकडे एकजण आहेतच. अशी छान भिवई उडवत हिडीस शिव्या देतात! नको... नको त्यांची बरोबरी नकोच. मग मी काय म्हणतो, हे करण्यापेक्षा आपले ‘फेसबुक लाईव्ह’च ठीक! घेतला मोबाईल आणि लावली जीभ टाळ्याला. अर्थहीन बोलतो, रटाळ बोलतो, अतिशय बालिश बोलतो, विचार करण्याची गरजच नाही. कारण, माझा मोबाईल माझे तोंड. साहेब जसे कोरोना काळात ‘फेसबुक लाईव्ह’ करायचे तसे ‘फेसबुक लाईव्ह’ करतो आणि तुटून पडतो. काय म्हणता, मी तुटून पडेन.
 
त्यातून मला त्रासाशिवाय काहीच मिळणार नाही. मात्र, ‘तुटून पडा’ सांगणारे आरामात बसून राहतील? काय म्हणता, तुटून पडा सांगणार्‍यांचे सात पिढ्यांचे कोटकल्याण झाले आणि आमच्या घरी तर उद्याची भ्रांत. काय म्हणता, आम्ही तुटून पडल्यानंतर जे काही होईल, त्याला जबाबदार कोण? छे! छे! याचे उत्तर माझ्याकडे नाही. पण, सांगू का? आता तुटण्यासारखे आमच्याकडे काही नाही. ‘आवाज कुणाचा’ म्हणत आम्ही काल-परवापर्यंत स्वाभिमानाने जगायचो. पण, आता ज्यांच्या सावलीलासुद्धा उभे राहत नाही, त्यांच्यासाठी कोल्हापूरला निवडणुकीसाठी काम करावे लागले.यात आमचे मत, आमचे विचार कुठे होते? आमचा भगवा कुठे होता? जे चालले, त्यामुळे तुटून गेलो आहोत. हनुमान चालीसाला विरोध आणि दिल्लीच्या ‘मॅडम’ना मुजरा करण्याचे सुरू झाले, तेव्हाच आम्ही तुटून पडतो. आता साहेबांनी पुन्हा तुटून पडायला सांगितले. कुणी सांगेल का? आता आणखी किती तुटायचे???
 
 
@@AUTHORINFO_V1@@