शब्दांतून उगवलेलं अरण्य

    23-Jun-2025
Total Views | 39

माणसाला तुम्ही अरण्यापासून दूर नेऊ शकता, पण जर अरण्य त्याच्या मनात भिनले असेल, तर ते शब्दांतून पुन्हा उगवतंच, मारुती चितमपल्ली यांचे हे शब्द अनेकांसाठी खरे ठरले. चितमपल्लींच्या लेखनाच्या प्रभावामुळे निसर्गप्रेमाचे बीज कसे रोवले गेले, याविषयी ऊहापोह करणारा लेख.

शहराच्या बंद खिडक्यांमधून जेव्हा निसर्ग फक्त दृश्य ठरतो, तेव्हा एखादे पुस्तक आपल्याला त्या खिडकीच्या पलीकडे घेऊन जाते. खोल अरण्यात किंवा सावलीच्या भाषेत. माझ्यासाठी ते पुस्तक होते ‘केशरांचा पाऊस’आणि त्या पावसाचे शब्दकार म्हणजे मारुती चितमपल्ली. चितमपल्ली यांचे लेखन ही फक्त माहिती नव्हती, ते निसर्गाचे अंतरंग होते. त्यांनी वाचकाला जंगलात केवळ फिरवले नाही, तर मनात जंगल निर्माण केले. त्यांच्या लिखाणातून मला मिळालेली ‘दृष्टी’ ही केवळ वन्यजीव छायाचित्रकार म्हणून नाही, तर एक निसर्गशिक्षक, संशोधक, पक्षीनिरीक्षक आणि संवेदनशील माणूस म्हणून घडवणारी ठरली.

चितमपल्लींच्या लेखनात जंगलाचे भान आहे. त्यांनी लिहिले की, प्रत्येक वाघ पायाखाली एक भान ठेवून चालतो. झाडाच्या सावलीत थांबतो, पण त्या सावलीची रचना त्याला आधीच माहीत असते. अशा ओळी वाचून जंगलात चालणे, थांबणे, ऐकणे आणि समजणे या सगळ्यांचा अर्थच बदलतो. मी आधी फक्त प्राणी बघायचो, चितमपल्लींनी शिकवले की प्राणी काय सांगतात, ते ऐकावे. निसर्ग संवादक म्हणून ही फार मौल्यवान गोष्ट होती. विदर्भाच्या जंगलात मी शेकडो वेळा गेलो होतो. पण त्यांची पुस्तके वाचल्यावर जाणवले की, मी तो भूगोल पाहिला होता, पण अनुभवला नव्हता.

आदिवासी बाई बाभळीला नमस्कार करते, ही त्यांची एक ओळ मनात खोल रुजली. निसर्ग केवळ उपभोग नाही, तो सहजीवन आहे, ही समज मला त्यांच्यामुळे मिळाली. चितमपल्लींनी आदिवासींच्या ज्ञानाला मान दिला. ‘चकवाचांदणं’ या आत्मचरित्रात त्यांनी गोंड, कोरकू, धीवर समाजाच्या संस्कृतीचे जे चित्र उभे केले आहे, ते आदराने वाचावे लागते. त्यांनी जंगलात भटकताना या लोकांकडून शिकलेली निसर्गभाषा आपल्या लेखनातून आपल्यापर्यंत पोहोचवली.

प्राणीविज्ञान, पक्षीनिरीक्षण, मत्स्यशास्त्र, वृक्षशास्त्र या सगळ्यांचे चितमपल्लींनी मराठीत विलक्षण भाषांतर केले. त्यांनी ‘प्राणीसंवाद’, ‘सर्पांची दुनिया’, ‘मृगपक्षीशास्त्र’ अशा पुस्तकांतून वैज्ञानिक विषयांना सौंदर्याची झळाळी दिली. उदाहरणार्थ, त्यांनी लिहिले, सांबर घाबरते, तेव्हा त्याच्या डोळ्यांमध्ये आरशासारखी जंगलाची प्रतिमा उमटते. हे केवळ निरीक्षण नाही, तर अनुभवाचे साहित्यशास्त्र आहे. हे लेखन एका शिक्षकासाठी शास्त्र शिकवण्याचा आणि श्रोत्याच्या हृदयाशी नाते जोडण्याचा दुवा ठरते. चितमपल्लींच्या शब्दांनी मला सावलीचाही अर्थ समजावला. त्यामुळे माझ्यातल्या फोटोग्राफरच्या नजरेला संवेदनांचे भिंग मिळाले. त्यांची निरीक्षणशक्ती आणि ती मांडण्याची शैली ही प्रत्येक फोटोग्राफर, निसर्गप्रेमी आणि संशोधकांसाठी एक शाळा आहे. त्यांच्या लेखनामुळे मी आवाज रेकॉर्ड करण्याऐवजी ऐकणे शिकलो. चितमपल्ली हे नुसते लेखक नव्हते, ते निसर्गाचे अनुवादक होते. त्यांनी रानात वावरून जे अनुभवले, ते पुस्तकात उतरवले. त्या शब्दांत फक्त माहिती नव्हती, तर गंध होता, स्पर्श होता आणि आत्म्याचा आवाज होता. आज त्यांच्या पुस्तकांची प्रत्येक ओळ म्हणजे निसर्गाची एक ध्वनिफीत आहे. फक्त ती ऐकण्यासाठी आपल्याला थांबावे लागते. शब्दांच्या रूपात त्यांनी शहरी माणसाच्या अंतरंगात एक जंगल रोवले, जिथे आजही प्रत्येक वाचक झाडांशी निजतो आणि त्या झाडांतूनच पुन्हा उगवत राहतो. मेळघाट, नवेगावबांध, नागझिरा अशा फारशा माहीत नसलेल्या जंगलांत चितमपल्लींची पुस्तके मला घेऊन गेली. चकचकीत आणि इंग्रजी बोलणार्‍या इतर पार्कमधल्या निसर्ग मार्गदर्शकांपेक्षा मेळघाटचा आदिवासी असलेल्या भोलाचे अंदाज, त्याचा अभ्यास हा अचंबित करू लागला. दरवर्षी आता मेळघाट आणि नागझिरा वारी नक्की करणार, असा मनाशी निर्धार केला आहे. पण मनात तीच एक ओढ आहे की, हेमंतातून शिशिराकडे जाताना कधीतरी सिपनाच्या काठावर केशरांचा पाऊस दिसू दे.

प्रा. लोकेश तारदाळकर
(लेखक निसर्गनिरीक्षक आहेत)
9820990389

'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
ऐतिहासिक वसई किल्ला जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याबाबत शासनदरबारी मागणी : खानिवडे

ऐतिहासिक वसई किल्ला जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याबाबत शासनदरबारी मागणी : खानिवडे

११ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ ऐतिहासिक किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाला आहे. अवघ्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा हा मोठा गौरव आहे. मात्र याचबरोबर पोर्तुगीजांच्या जुलमी जोखडातून वसई प्रांताला मुक्त करणाऱ्या नरवीर  चिमणाजी अप्पा यांच्या साहसी शौर्याची परिसीमा असलेल्या मुंब‌ईपासून अगदी हाकेच्या अंतरावरील वसईच्या ऐतिहासिक किल्लाचा देखील जागतिक वारसा यादीमध्ये समावेश व्हावा यासाठी वसईतील सामाजिक कार्यकर्ते तसेच शिवप्रेमीनितीन म्हात्रे यांनी ..

भाजपा महिला विभागाचे महिला बचत गटांना मार्गदर्शन :खानिवडे

भाजपा महिला विभागाचे महिला बचत गटांना मार्गदर्शन :खानिवडे

नायगांव पूर्व विभागातील जुचंद्र गावात (छत्रपती शिवाजी महाराज चौक) येथील भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कार्यालयात जुचंद्र परिसरातील नव्याने तयार केलेल्या महिला बचत गटासाठी पहिल्यांदाच मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. वसई विधानसभा आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या मार्गदर्शनात तसेच जिल्हाध्यक्षा प्रज्ञाताई पाटील यांच्या नेतृत्वात महिला मोर्चाच्याहर्षलाप्रविण गावडे यांनी आयोजन केले होते. ह्या महिला बचत गटाच्या मार्गदर्शन शिबिराला वसई पूर्व दक्षिण मंडळाचे अध्यक्ष उदय शेट्टी, अल्पसंख्यांक महिला मोर्चाच्..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121