जगातील सर्व पक्षी प्रजातींपैकी ३.५ टक्के प्रजाती या समुद्री पक्षी गटातील आहेत. भारताभोवतीच्या समुद्रामध्ये या पक्ष्यांच्या एकूण ५० प्रजाती आढळतात (world seabird day). यात शिअरवॉटर, स्टॉर्मपेट्रल, नॉडी, स्कूआ, जॅगर, फ्रीगेटबर्ड, ट्रॉपिकबर्ड यांसारख्या अत्यल्प आढळणार्या, तर गल आणि टर्न यांसारख्या किनारी प्रदेशात सर्रास आढळणार्या प्रजातींचा समावेश होतो. पडदेवाली बोटे असलेले लवचिक पंजे, जलरोधक पिसांचा थर आणि शरीरातील जास्तीचे मीठ बाहेर टाकण्यासाठी डोळ्यांमधील विशिष्ट क्षारग्रंथी अशा अनुकूलतेमुळे हे पक्षी सागरी अन्नसाखळीतील सर्वोच्च शिकारी ठरतात. त्यामुळेच विस्तृत सागरी परिसंस्थेच्या आरोग्याचे महत्त्वाचे दर्शकही मानले जातात. १८७१ साली फिलिप अश्मोल हे ब्रिटिश पक्षीतज्ज्ञ आणि पर्यावरणतज्ज्ञ होते. त्यांनी समुद्री पक्ष्यांच्या अन्न मिळवण्याच्या पद्धतींवर आधारित वर्गीकरण केले आहे. या पद्धतीमध्ये खालील प्रकारांचा समावेश होतो:
1. Pursuit diving (पाठलाग करत पाण्यात बुडून शिकार करणे)
2. Surface-seizing (पाण्याच्या पृष्ठभागावरून अन्न पकडणे)
3. Dipping (उडत असताना पाण्यात चोच बुडवून अन्न घेणे)
4. Plunging (उंचीवरून थेट पाण्यात झेप घेऊन अन्न पकडणे)
5. Piracy (इतर पक्ष्यांकडून अन्न हिसकावणे – लुटालूट करणे)
ही वर्गीकरण पद्धत समुद्री पक्ष्यांच्या अन्नसाखळीतील भूमिकेचे आणि त्यांचे पर्यावरणीय सवयींचे विश्लेषण करण्यासाठी उपयुक्त ठरते. ही माहिती, समुद्री पक्षी महासागर आणि त्याच्या आरोग्यावर किती अवलंबून आहेत हे दर्शवते. मात्र, आता या पक्ष्यांचे अस्तित्व वाढते समुद्री प्रदूषण, हवामान बदल, शिकार, अंड्यांची चोरी, अधिवासाचा नाश, तेल गळती, प्रजनन परिसंस्था व स्थलांतर याविषयीच्या माहितीचा अभाव आणि इतर अनोळखी संकटांमुळे धोक्यात आले आहे. प्रत्येक वर्षी पावसाळ्यातील वादळे आणि बदलते वारे यांमुळे भारताच्या दोन्ही किनारपट्ट्यांवर अनेक समुद्री पक्षी किनार्यावर मृत किंवा थकलेले अवस्थेत आढळतात. अशा पक्ष्यांकडे वेळीच लक्ष न दिल्यास ते भटके कुत्रे किंवा इतर प्राण्यांचे शिकार बनतात. महाराष्ट्रात कांदळवन कक्ष (महाराष्ट्र वन विभाग) समुद्री पक्ष्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी विविध उपक्रम राबवतो. वादळामुळे किनार्यावर वाहून आलेल्या समुद्री पक्ष्यांमध्ये मास्क्ड बूबी, ब्राऊन नॉडी इत्यादींचा समावेश होतो. त्यांच्यावर उपचार करून त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येते.
समुद्री पक्षी दिन का साजरा करतात ?
जगभरात ‘समुद्री पक्षी दिन’ म्हणून ३ जुलै हा दिवस साजरा केला जातो. जगातील अनेक पक्षी प्रजाती मानवी हस्तक्षेपामुळे किंवा पर्यावरण बदलामुळे नामशेष होत आहेत. ज्यात अनेक समुद्री पक्ष्यांचाही समावेश आहे. त्यातीलच एक समुद्री पक्षी म्हणजे ग्रेट ऑक पेंग्विन . दि. ३ जुलै, १८८४ रोजी या पक्ष्याच्या शेवटच्या विणीयोग्य जोडप्याची आईसलॅण्डमधील ‘एल्डी’ बेटावर स्थानिक मच्छीमारांनी मांस आणि पिसांसाठी शिकार केली. समुद्री पक्ष्यांची अशी अवैध शिकार आणि त्यांचे नामशेष होणे टाळण्यासाठी जनजागृती करणे अत्यंत आवश्यक होते. त्यासाठीच पक्षी प्रेमी आणि पक्षी अभ्यासकांनी हा दिवस ‘समुद्री पक्षी दिन’ म्हणून घोषित केला. समुद्री पक्ष्यांचे संरक्षण आणि त्यांच्या प्रजाती नष्ट होण्यास आळा बसणे हा या दिवसाचा मूळ उद्देश आहे. ‘बर्ड लाईफ इंटरनॅशनल’ ही आंतरराष्ट्रीय संस्था जगातील सर्व प्राण्यांच्या अस्तित्वाचा आढावा घेत असते. त्यांच्या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या यादीनुसार, जगातील सर्व पक्षी प्रजातींपैकी ३.५ टक्के प्रजाती समुद्री पक्षी गटातील आहेत. समुद्री परिसंस्थेतील सर्वोच्च भक्षक असल्याने या पक्ष्यांचे अस्तित्व परिसंस्थेच्या उत्तम जैविक परिस्थितीचे प्रतीक मानले जातात.
- ऋषिकेश राणे
(लेखक कांदळवन प्रतिष्ठानमध्ये सहाय्यक संचालक क्षमता बांधणी म्हणून कार्यरत आहेत.)