सर्पविष
सापाच्या विषामध्ये प्रथिने, उत्प्रेरके, छोटे रेणू आदी ५० ते १२५ घटक असतात. या घटकांच्या विषारी परिणामानुसार त्यांचे पेशी स्तरावर परिणाम करणारे विषद्रव्य (सायटोटॉक्सिक), मज्जासंस्थेवर परिणाम करणारे विषद्रव्य-तंत्रिकाविषाक्त (न्यूरोटॉक्सिक) आणि रक्ताभिसरण संस्थेवर परिणाम करणारे विषद्रव्य-रक्तविषाक्त (हिमोटॉक्सिक) असे तीन प्रकार आहेत. या घटकांचे विषातील प्रमाण हे सापांची प्रजाती, अधिवास, हवामान, ऋतुमान, खाद्य यांनुसार बदलते. साहजिकच विषबाधा झालेल्या रुग्णाची लक्षणेही वेगवेगळी असतात. रक्तदाब कमी होणे, चक्कर, उलट्या, शुद्ध हरपणे, श्वसनक्रियेमध्ये अडथळा, सर्पदंशाच्या जागी सूज, जळजळ, बधिरता अशी एक किंवा अनेक लक्षणे दिसतात. काही लक्षणे ही विशेषत्वाने एखाद्या प्रजातीमध्येच दिसतात, उदाहरणार्थ मण्यारच्या दंशामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होतो, तर नागदंशामुळे शुद्ध हरपते. कधी विविध अवयव निकामी होतात, कधी अर्धांगवायूचा झटका येतो, कधी सर्पदंशाच्या जागेवर जखम होऊन तो भाग सडल्यामुळे कापून टाकावा लागतो, तर बर्याचदा हात, पाय कापावा लागल्याने कायमस्वरूपी अपंगत्व येते.
सर्पविषविरोधी लस
सापाच्या विषबाधेवर एकमेव रामबाण उपाय म्हणजे सर्पदंशावरील लस! सर्पदंशानंतर रुग्णाला तातडीने लस आणि अन्य वैद्यकीय उपचार मिळणे गरजेचे आहे. उपचारासाठी नेण्यापूर्वी रुग्णाला धीर देऊन शांत ठेवणे आणि सर्पदंश झालेला भाग फळीच्या आधाराने स्थिर करणे आवश्यक आहे. यामुळे शरीरात वेगाने विष पसरत नाही. भारतामध्ये ही लस तयार करण्यासाठी ‘बलाढ्य चार’ सापांचे विष अल्प प्रमाणात घोड्यांना टोचून, त्यांच्या रक्तामध्ये तयार झालेली विषविरोधी प्रतिपिंडे (अॅण्टीबॉडी) अन्य रक्तघटकांपासून वेगळी करतात. एकापेक्षा जास्त प्रकारच्या विषांच्या विरोधी प्रतिपिंडे असल्यामुळे या लसीला बहुआयामी (पॉलिव्हॅलंट) लस म्हणतात. एकाच प्रकारच्या विषाच्या विरोधी लसीला एकआयामी (मोनोव्हॅलंट) लस म्हणतात. ती लस वापरण्यापूर्वी नेमक्या कोणत्या सापाने दंश केला, हे कळणे गरजेचे असते. यासाठीच्या निदानचाचण्या भारतात उपलब्ध नसल्याने ही लस आपण वापरू शकत नाही.
आव्हाने
आपल्या देशात एकाच प्रजातीच्या विविध ठिकाणच्या सापांच्या विषातही प्रचंड वैविध्य दिसते. त्यामुळे एका ठिकाणच्या सापाचे विष घेऊन तयार केलेली लस सर्व ठिकाणी सारख्याच प्रभावीपणे काम करत नाही. विषबाधा ‘बलाढ्य चार’ व्यतिरिक्त अन्य सापांमुळे झाली असली, तर ही लस पूर्णपणे प्रभावीरित्या काम करत नाही. पूर्ण परिणामकारकतेसाठी प्रत्येक विषबाधित रुग्णाला लसीच्या सरासरी २५ मात्रा द्याव्या लागतात. सर्वांत मोठे आव्हान म्हणजे रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी, लसीची पहिली मात्रा सर्पदंश झाल्यापासून एक तासाच्या आत द्यावी लागते. सर्पदंशानंतर सर्वसाधारणपणे पाच दिवस रुग्णालयात उपचारही करावे लागतात. सर्पदंशाच्या जखमेवर तर अजूनही ठोस उपाय नाही.
सर्पदंशावरील प्रथमोपचार
- सापाला मारायचा किंवा पकडायचा प्रयत्न न करता त्यापासून दूर व्हावे.
- जर स्वतःला दंश झाला असेल, तर सापापासून दूर होऊन न घाबरता मदतीसाठी हाक मारावी.
- सर्पदंश झालेल्या व्यक्तीस धीर द्यावा. बरेच सर्प हे बिनविषारी असतात आणि जरी विषारी साप चावला, तरी तो बर्याच वेळा आपले विष व्यक्तीच्या शरीरामध्ये सोडत नाही. त्यामुळे विषबाधेची शक्यता खूप कमी असते. अशा वेळेस त्याला धीर देऊन विषावर उपचार उपलब्ध असल्याचा विश्वास द्यावा.
- दंश झालेल्या ठिकाणी आवळपट्टी किंवा दोरी बांधू नये.
- दंश झालेल्या जागेवर कापण्याचा, पाण्याने धुण्याचा अथवा तोंडाने विष काढण्याचा प्रयत्न करू नये.
- सर्पदंश झालेल्या व्यक्तीस तोंडाने काहीही खाण्यास किंवा पिण्यास देऊ नये.
- वेळ वाया न घालवता त्वरित जवळच्या आरोग्यकेंद्रात जावे.
- सर्पदंशाने झालेल्या विषबाधेवर, प्रतिसर्पविष (अॅण्टी व्हेनम) हा एकच उपाय आहे.
जैविक साखळीतील अतिशय महत्त्वाचा घटक असलेल्या सापांचे धान्य खाणारे, शेतजमिनीत बीळ करून पिकाची हानी करणारे उंदीर, घुशी, पाली अशा प्रकारचे छोटे प्राणी, कीटक हे खाद्य आहे. सर्पदंशावर उताराही सर्पविषच आहे. त्यामुळे सर्प-मानव संघर्ष नव्हे सहजीवनाचा संकल्प ‘जागतिक सर्प दिनी’ करायला हवा.
- डॉ. निशिगंधा नाईक
(लेखिका ‘हाफकिन इन्स्टिट्यूट’च्या माजी संचालक आहेत.)
9820236692