हिंद महासागर आणि अरबी समुद्र हा आपल्या देशाच्या सागरी परिसंस्थेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. याच सागरावर अनेक समुद्रपक्ष्यांचे जीवन अवलंबून आहे. जसे की टर्न, नॉडी, शीअरवॉटर आणि पेट्रेल्स. पण, दुर्दैवाने या पक्ष्यांबद्दल आपल्याकडे अजूनही अपुरे ज्ञान आहे. दरम्यान, अरबी समुद्रात मृत झोन (Dead Zone) वाढत आहेत. मासेमारीचे प्रमाण वाढले आहे आणि तेलगळती व प्लास्टिक प्रदूषणदेखील वाढत आहे. या सर्व गोष्टी समुद्रपक्ष्यांच्या अस्तित्वासाठी गंभीर धोके ठरू शकतात. हिंद महासागर आणि अरबी समुद्रात समुद्रपक्ष्यांसंदर्भात शास्त्रीय पद्धतीने संशोधन सुरू करणे आवश्यक आहे. जसे की, संशोधन जहाजांवरून किंवा मासेमारीच्या होड्यांवरून पक्षीगणना करणे, किनारपट्टीवरील बेटांवर व खडकांवर पक्ष्यांची घरटी कुठे आहेत याचा शोध घेणे, ‘जीपीएस’ टॅग्स वापरून पक्ष्यांचे स्थलांतर व खाद्य शोधाचे मार्ग समजून घेणे, स्थानिक मच्छीमार,नागरिक आणि पक्षीनिरीक्षक यांना प्रशिक्षण देऊन डेटा गोळा करणे. या संशोधनाचा उपयोग मासेमारीचे नियोजन, सागरी संरक्षित क्षेत्र (MPA) ठरवण्यासाठी करणे. समुद्रपक्षी हा केवळ निसर्गाचा भाग नाहीत, तर ते समुद्राच्या आरोग्याचे पाहरेकरी आहेत. त्यांच्यावर संशोधन म्हणजे केवळ पक्ष्यांचे संरक्षण नाही, तर आपल्या महासागरांचे भवितव्य वाचवणे आहे.
समुद्री पक्ष्यांविषयी...
1) समुद्री पक्षी संपूर्ण जीवन समुद्रात घालवतात. फक्त विणीच्या आणि घरटे बांधण्याच्या काळात ते किनार्याचा किंवा समुद्री बेटांचा आसरा घेतात.
2) या पक्ष्यांच्या शेपटीखाली मेणासारखा पदार्थ स्रावणारी ग्रंथी असते. हा स्राव पंखांवर पसरवून ते आपले पंख जलरोधक करतात.
3) नाकाजवळील क्षार नियंत्रण ग्रंथी त्यांच्या शरीरातील अतिरिक्त क्षार शोषून घेतात आणि शिंकेवाटे किंवा अश्रूंवाटे बाहेर काढतात.
4) पोहोण्यासाठी पायाच्या बोटांमध्ये त्वचेचे पातळ पडदे असतात.
5) जगातील सर्व पक्षी प्रजातींपैकी 3.5 टक्के प्रजाती समुद्री पक्षी गटातील आहेत.
6) भारताभोवतीच्या समुद्रामध्ये या पक्ष्यांच्या एकूण 50 प्रजाती आढळतात.