गिरावल देवीची टाचणी

    21-Jul-2025
Total Views | 25

कोकणातील असंख्य देवरायांना आजही धार्मिकतेबरोबर जैवविविधतेची मांडणी आहे. अशाच एका देवराईविषयी माहिती देणार हा लेख...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात शुक नदीच्या किनारी सैतवडे हे गाव आहे. या गावाला लागून असलेला महाकाय सैतवडे धबधबा हा जितका सुंदर तितकाच त्यात असलेल्या मोठमोठ्या खडकांमुळे धोकादायक आहे. सैतवडे गावाच्या अनेक वाड्यांपैकी एक असलेल्या पाडागरवाडीतून एक चढण चढून वर गेल्यावर भलीमोठी चाफ्याची झाडे नजरेस पडतात. त्याच झाडांच्या सावलीत मोठ्या दीपमाळा आणि काही पुरातन स्मारके दिसतात. गावातील मूळ पुरुषाचे ते स्थान. तिथूनच एक दगडी पायवाट नदीच्या दिशेने खाली उतरते. दोन्ही बाजूंनी गच्च झाडी असलेली ही पायवाट आपल्याला गिरावल देवीच्या वैशिष्ट्यपूर्ण मंदिराकडे घेऊन येते. आपल्या डोक्यात असलेल्या मंदिरांच्या सर्व कल्पनांना छेद देणारं हे स्थान.

गिरावल देवीचे मंदिर हे कोणत्याही सभामंडप, गाभारा किंवा कळस यांशिवाय असलेले एक निसर्गमंदिर आहे. शुक नदीच्या काठावर एक दगडी चौथरा बांधून त्यावर माडाच्या झावळ्यांनी शाकारलेला माटव आणि त्याखाली देवीचे काळे पाषाण. हे पाषाण म्हणजे मनुष्यकृती मूर्ती नाही, तर एकावर एक ठेवलेले तीन विशिष्ट आकारांचे दगड. देवीला कोणताही आकार नाही, हे अगदी निराकार निर्गुण असे रूप. गावातील पुजारी रोज सकाळी येऊन देवीची यथासांग पूजा करतात. देवीचं हे गोजिरं रूप आणि मागे निरंतर वाहणारी शुक नदी. पावसाळा संपला की गिरावल देवीचे मंदिर आकार घ्यायला लागते. तोपर्यंत नदीनेही आपले पाणी चौथर्‍याच्या खाली आणलेले असते. गावकरी येऊन खांब आणतात, माटव घालतात, देवीचे पाषाण आणून त्यांची प्रतिष्ठापना केली जाते. रोज सकाळी पूजा आणि दिवाबत्ती सुरू होते. हा दिनक्रम मृगापर्यंत सुरू राहतो. पावसाळ्याची चाहूल लागली की देवीचे पाषाण काढून पुन्हा गावातील पुजार्‍याच्या घरी आणले जातात. माटव काढून सगळे साहित्य जपून ठेवले जाते. मृग नक्षत्राचा पाऊस कोसळायला लागतो आणि शुक नदी आपले गढूळ पाणी घेऊन चौथरा गिळंकृत करते. पुढे काही अंतरावर असणार्‍या सैतवडे धबधब्याचा आवाज मनात धडकी भरवू लागतो. गिरावल देवी चार महिन्यांसाठी आपले निवासस्थान सोडून गावात विराजमान होते आणि एक काळसर रंगाची अंगावर सोन्याचा मुलामा असलेली टाचणी या जागेवर अवतरते. कृष्ण मखमल अर्थात ब्लॅक गोसामरविंग (Black Gossamerwing) ही केवळ भारतात आढळणारी प्रदेशनिष्ठ टाचणी पहिला पाऊस झाला की कोकणात हळूहळू अवतरते. पिवळसर तपकिरी रंगांची झाक असलेले पंख घेऊन ही टाचणी रोरावणार्‍या नदीप्रवाहात अगदी सराईतपणे बसून असते. काही वेळेस नदीतून वर आलेल्या गवतांच्या काड्यांवर तर काही वेळेस नदीचे तुषार झेलत प्रवाहातील दगडांवर. या टाचणीला कदाचित नदीच्या वेगाचे भय नसावे. ज्या ठिकाणी काही दिवसांपूर्वी गिरावल देवी बसली होती, त्याच ठिकाणावर कृष्ण मखमल मोठ्या संख्येने उडताना दिसतात. नदीचा तांबूस प्रवाह लीलया पार करून दुसर्‍या तीरावर जातात. हवेत उडण्याच्या अनेक कसरती दाखवतात आणि लहान-मोठ्या कीटकांचे भक्षण करून अन्नसाखळी शाबूत ठेवतात.

मनुष्य नदीच्या भीतीने देवीला गावात घेऊन येतो, पण देवी जणू या टाचण्यांच्या रूपाने पुन्हा आपल्या मूळ स्थानी अवतीर्ण होते. हे चक्र गेली कित्येक वर्षे अव्याहतपणे सुरू आहे. गिरावल देवी जागृत आहे, असा ग्रामस्थांचा विश्वास असल्याने ही जागा त्यांनी अगदी जीवापाड जपलेली आहे. या जागेत अनेक झाडे, पशुपक्षी, कीटक, मासे गुण्यागोविंदाने राहात आहेत. जणू देवीचे एक छोटे अभयारण्यच.

डॉ. दत्तप्रसाद सावंत
(लेखक चतुरांवर संशोधन करतात.)

'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121