वॉशिंग्टन : (Iran-Israel War) गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्त्रायल यांच्यात सुरु असलेल्या सशस्त्र संघर्षात अमेरिकेने उडी घेतली आहे. रविवारी २२ जूनला अमेरिकेने इराणच्या फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या तीन आण्विक तळांवर हल्ला केला. या हल्ल्यांनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सोमवारी २३ जूनला इराणमधील सत्तांतराबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर एक पोस्ट केली. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, "सत्ता परिवर्तन म्हणणं राजकीय दृष्ट्या योग्य मानलं जात नाही. पण जर विद्यमान इराणी राजवट इराणला पुन्हा महान बनवण्यात असमर्थ ठरत असेल, तर मग सत्ता परिवर्तन का होऊ नये? मेक इराण ग्रेट अगेन."
दरम्यान, रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी, इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ले सत्ता परिवर्तनासाठी नव्हते, असे स्पष्ट केले. त्याचबरोबर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स रविवारी बोलताना म्हणाले होते की, "सर्वात पहिली बाब म्हणजे, आम्हाला सत्ता परिवर्तन नको आहे. आम्हाला इराणचा अणुकार्यक्रम संपुष्टात आणायचा आहे." त्यानंतर इराणच्या अधिकाऱ्यांनीही या अणुकेंद्रांवर हल्ले झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. पण त्यामुळे फार काही नुकसान झाले नसल्याचे त्यांनी सांगितले होते.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\