अमरावती: एकीकडे मूलभूत मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांवर संपाची वेळ आलेली आहे. सरळसेवा परीक्षेतून रीतसर परीक्षा देऊन पास झालेल्या तरुणांना अजूनही नियुक्ती न मिळाल्याने हवालदिल होण्याची पाळी आली आहे. ३ वर्षांपासून त्यांची नियुक्ती रखडलेली आहे. परंतु दरम्यानच्या काळात विभागात कंत्राटी कामगारांची भरती मात्र करण्यात आलेली आहे. यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी अमरावती परिवहन विभागात धडक आंदोलन केले आहे. ३ वर्षांपासून नियुक्ती रखडल्याने आमच्यावर आत्महत्येचीच वेळ आली आहे अशी संतप्त प्रतिक्रिया कर्मचारी देत आहेत .
या संपूर्ण प्रकारावर प्रतिक्रिया देताना विभागीय परिवहन अधिकारी श्रीकांत गभणे यांनी सांगितले की सर्व कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव मध्यवर्ती कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत पण तिथून अजून मंजुरी आलेली नाही. कंत्राटी कामगारांच्या प्रक्रियेची जाहिरात निघालेली होती आणि तसे नियुक्तीपत्रक त्यांना देण्यात आलेले आहे. जर या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे मंजुरी मिळाल्यास त्यांनाही सेवेत सामावून घेऊ असे श्रीकांत गभणे यांनी सांगितले.