साधारण ३० ते ३५ वर्षांपूर्वी काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे, त्यांच्यावरील नृशंस नरसंहाराचे हृदयद्रावक वास्तव विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित आणि पल्लवी जोशी निर्मित 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. हा चित्रपट दि. ११ मार्च रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार असून, त्यानिमित्ताने या चित्रपटाची निर्माती आणि कलाकार पल्लवी जोशी यांच्याशी ‘दै. मुंबई तरुण भारत’ने केलेली ही खास बातचित...
काश्मीरसारख्या एका संवेदनशील विषयावर चित्रपटनिर्मिती करावी, ही कल्पना नेमकी कशी सुचली?
ही संपूर्ण कल्पना दिग्दर्शक विवेकची अग्निहोत्रीची. अमेरिकेमध्ये एका समारंभात असताना डॉ. सुरेंदर हे विवेकला भेटले आणि त्यांनी विवेकने या विषयावर चित्रपट काढावा, अशी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर विवेकने यावर थोडं संशोधन करण्यास सुरुवात केली आणि जेव्हा हा विषय त्याच्या डोक्यात पक्का झाला, तेव्हा त्याने मला येऊन सांगितलं की, आपण आपला पुढील चित्रपट या विषयावर करणार आहोत. तेव्हा खरंतर या विषयामध्ये काही दम नाही असं मला सुरुवातीला वाटलं होतं. कारण, यापूर्वी विदू विनोद चोपडा, विशाल भारद्वाज यांनी अशा धाटणीचे चित्रपट केले होते. पण, जेव्हा सत्य परिस्थिती मला समजली, तेव्हा मात्र मी ठरवलं की, नाही आपण हा चित्रपट नक्की करायचा. खरं सांगायचं, तर काश्मीरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर नरसंहार झाला आहे, याची मलासुद्धा फारशी कल्पना नव्हती. काश्मीरमध्ये सतत दहशतवादी हल्ले होत असतात, म्हणून काश्मिरी पंडितांनी काश्मीर सोडलं असाच माझा समज होता. पण, जेव्हा आम्ही यासंबंधी संशोधन करायला सुरुवात केली, तेव्हा जे एक एक सत्य समोर येत गेलं, तेव्हा आम्हाला या नरसंहाराविषयीचे सर्व सत्य समजत गेले. पण, त्यावेळी शासनाकडून, माध्यमांकडून याविषयी कुठेच फारशी वाच्यता करण्यात आली नाही. सोयीस्कररित्या ही गोष्ट त्यावेळी दाबण्यात आली. पण, जेव्हा हे संपूर्ण सत्य मी काश्मिरी पंडितांच्या कुटुंबीयांकडून ऐकलं, तेव्हा मला असं जाणवलं की, कुठेतरी माझी चूक झाली. कारण, या गोष्टी माझ्याकडे पोहोचल्या तर नाहीच; पण मी याविषयी जाणून घेण्याचाही प्रयत्न केला नाही आणि जर विवेक हे धाडस करत असेल, तर मीदेखील यात त्याला साथ द्यायला हवी, असं मला वाटलं. तसंच हे संपूर्ण संशोधन करताना काश्मिरी पंडितांच्या सर्व कुटुंबीयांसोबत मी भावनिकदृष्ट्या आपसुकच जोडली गेले. त्यामुळे जर इतर कोणत्या निर्मात्याने या चित्रपटाची निर्मिती केली असती, तर काही कमी-जास्त होण्याची शक्यता मला वाटत होती. म्हणून मी ठरवलं की, या चित्रपटाची निर्मिती करण्याचा विडा आम्ही उचलला.
आताच तुम्ही चित्रपटासाठीच्या संशोधनाचा उल्लेख केलात. तेव्हा, या चित्रपटासाठी संशोधन करतानाचा तुमचा एकंदरीत अनुभव कसा होता?
आमचे मागील चार वर्षांपासून या चित्रपटावर काम सुरू आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण आम्ही २०२०च्या डिसेंबरमध्ये पूर्ण केले आणि तोपर्यंत आम्ही याविषयावर संशोधन करतच होतो. यानिमित्ताने अनेक इतिहासकारांशी आम्ही चर्चा केली, पुस्तकांचं वाचन करुन संदर्भ पडताळून पाहिले. पंडित समाजातील तज्ज्ञ लोकांशीही संवाद साधला. माध्यम प्रतिनिधींचीही भेट घेऊन हा विषय, त्याचे विविध कंगोरे समजून घेतले. त्यानंतर या संपूर्ण नरसंहाराला ज्यांना सामोरं जावं लागलं, आम्ही त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली. त्यासाठी आम्ही अमेरिका, लंडन आणि युरोपमधील आणखीन काही शहरं, जम्मू, पुणे, सिंगापूर, बंगळुरु, थायलंड अशा ज्या ज्या ठिकाणी काश्मिरी पंडितांचे कुटुंबीय आता वास्तव्यास आहे, तिथे जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. प्रत्येक दिवशी आम्ही तीन ते चार मुलाखती करायचो. तुमचा विश्वास बसणार नाही, पण एका मुलाखतीमध्ये एका काश्मिरी पंडित समाजातील महिलेने सांगितले की, तिच्या वडिलांच्या शरीराचे १०० तुकडे करण्यात आले होते आणि ते एका गोणीमध्ये भरून झेलम नदीत फेकून देण्यात आले. त्यांच्याजवळ मिळालेल्या, एका ओळखपत्रावरून तिच्या वडिलांची ओळख पटली. अशा मन विषण्ण करणार्या रोज तीन ते चार घटना आमच्यासमोर उलगडत होत्या. हे सर्व ऐकल्यावर रात्रीची झोपही लागायची नाही. त्यामुळे आमचे या विषयावर जे संशोधन होते, ते अक्षरशः अंगावर काटा आणणारे होते. खरंतर आम्हाला वाचनाची खूप आवड असल्यामुळे संशोधनावर आधारित चित्रपट करायला खूप आवडलं.

चित्रपटाच्या निर्मितीबरोबरच तुम्ही या चित्रपटात एक भूमिकाशी निभावली आहे. त्याविषयी काय सांगाल?
होय, ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात मी एका प्राध्यापकाची भूमिका साकारली आहे. खरंतर आपण जेव्हा अशा संवेदनशील विषयावर चित्रपटनिर्मिती करतो, तेव्हा आपल्याला त्यासंबंधी संपूर्ण सत्य सांगणं तितकचं गरजेचं असतं. कारण, १९४७ साली जेव्हा भारताची फाळणी झाली, त्यावेळी अनेकांना आपला जीव गमवावा लागला. मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली. पण, स्वातंत्र्योत्तर काळातही काश्मीरमध्ये मात्र हे सातत्याने होत राहिलं. त्यामुळे काश्मीर हे एक वादग्रस्त ठिकाण आहे, असाच आपला समज झाला. साधारण सातवेळा काश्मिरी पंडितांचं निर्गमन काश्मीरमधून झालं आहे. त्यापैकी सहा वेळा त्यांनी काश्मीरमध्ये पुन्हा आपलं वास्तव्य करण्याचा प्रयत्न केला. पण, हे जे ३२ वर्षांपूर्वी सातव्यांदा त्यांचं निर्गमन झालं, त्यानंतर त्यांना पुन्हा आपल्या घरी काश्मीरमध्ये परतताच आलं नाही. कारण, जर ते पुन्हा काश्मीरमध्ये दाखल झाले असते, तर त्यांच्या जीवाला धोका होता. दि. ५ ऑगस्ट, २०१९ रोजी ‘कलम ३७०’ हटविण्यात आले आणि त्यामुळे आता आपण खर्या अर्थाने एक अखंड भारत आहे, असं म्हणू शकतो. पण, दुसरीकडे ’तुम्ही जे ‘कलम ३७०’ रद्द केले, ते चुकीचे आहे. काश्मीर हा स्वतंत्र झालाच पाहिजे, आझाद काश्मीर’ अशी विचारधारा मानणार्या लोकांचाही एक गट आहे, तर अशा लोकांचं प्रतिनिधित्व करणार्या एका महाविद्यालयातील प्राध्यापकाची भूमिका मी साकारली आहे.
या चित्रपटाच्या माध्यमातून काश्मिरी पंडितांविषयीचे वास्तवदर्शन करण्याचा प्रयत्न तुम्ही केला आहे. पण, तरीही या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच तुम्हाला काही धमक्याही आल्या. तेव्हा, काही गटांकडून चित्रपटाला होणार्या विरोधाकडे तुम्ही कसं बघता?
खरंतर लोकं पूर्ण चित्रपट न पाहताच आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. काश्मीरमध्ये फक्त काश्मिरी पंडितांच्याच समस्या नाहीत, तर तेथील मुलांच्यादेखील अनेक समस्या मांडल्या आहेत. तिथे कोणत्याही प्रकारच्या कलेचा विकास होऊ शकत नाही. त्यामुळे आज तिथे जी काश्मिरी मुसलमान मुलं आहेत, त्यांच्याही भविष्याचा प्रश्न आहेच आणि हे सर्व आम्ही आमच्या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पण जसं की, आपल्याला माहिती आहे की, काश्मीर खोर्यात जो काही दहशतवाद फोफावला होता, त्यात पाकिस्तानी अतिरेक्यांचाही हात होता. याच पाकिस्तानी अतिरेक्यांनी काश्मिरी मुसलमानांचं ‘ब्रेन वॉश’ केलं आणि म्हणूनच काश्मिरी पंडितांना काश्मीर खोर्यातून पलायनसाठी प्रवृत्त करण्यात आलं. त्यामुळे कुठेतरी एक धार्मिक भाग इथे जोडला गेला आहे. पण, आम्ही हा चित्रपट संपूर्णपणे दहशतवाद आणि त्याला बळी पडलेल्या लोकांवरच आधारित ठेवला आहे. पण, तरीही कुठेतरी धार्मिक राजकारण सुरू झाल्यामुळे काही गटांना असं वाटतं की, आम्ही मुसलमानांच्या विरोधात चित्रपटामध्ये काही दाखवलं आहे आणि म्हणून आम्हाला या अशा धमक्या येत असाव्यात.
’द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाच्या ट्रेलरला मिळालेल्या प्रतिसादाविषयी काय सांगाल?
प्रेक्षकांकडून या चित्रपटाच्या ट्रेलरला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी ट्रेलरला सात दशलक्षाहून अधिक ‘व्ह्यूज’ मिळाले आणि दिवसागणिक ते अधिकाधिक वाढत आहेत. त्यामुळे मी म्हणेन की, आपण केलेलं काम जेव्हा लोकांपर्यंत पोहोचतं, तेव्हा एक वेगळंच समाधान आपल्याला मिळतं.
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सध्या आपल्याला जे कलाकार दिसतात, त्यांनाच तुमची प्रथम पसंती होती का? की या निवड प्रक्रियेमध्ये काही बदल होत गेले?
कलाकारांच्या निवडीबाबत फार नाही, पण काही बदल मात्र नक्की करण्यात आले. कारण, दर्शन कुमारचं आणि चिन्मय मांडलेकरचं ‘कास्टिंग’ आम्ही आधी वेगळं केलं होतं. आधी आम्ही या दोघांच्याही भूमिकांसाठी काश्मिरी मुलांचंच ‘कास्टिंग’ केलं होतं. पण, नंतर आम्हाला असं वाटलं की, नाही थोडा बदल करायला हवा. म्हणून विवेकने दर्शनला बोलवलं आणि मी चिन्मयला. विवेकला हे माहिती होतं की,चिन्मय लेखक आहे. पण, तो अभिनयसुद्धा करतो, हे त्याला माहिती नव्हतं. पण, जेव्हा विवेकने चिन्मयचा अभिनय पाहिला तेव्हा ठरवलं की, चिन्मयचं खलनायकाची भूमिका साकारणार.
‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट प्रेक्षकांनी पाहावा, म्हणून प्रेक्षकवर्गाला काय आवाहन कराल?
मी एवढचं सांगीन की, काश्मिरी पंडित या संपूर्ण समाजासोबत काय झालं होतं, हे अद्याप बर्याच भारतीयांना माहिती नाही. काश्मीरमध्ये झालेल्या नरसंहाराची सत्य गोष्ट आम्ही या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पण, फक्त काश्मिरी पंडितांसाठीच नाही, तर प्रत्येक भारतीय प्रेक्षकाने हा चित्रपट पाहावा. कारण, ‘काश्मिरी पंडित’ असं म्हटलं की, आपण कुठेतरी त्यांना आपल्यापासून दूर करतो. पण, जेव्हा आपण ‘भारतीय’ असा उल्लेख करतो, तेव्हा ते आपलेच बांधव असल्याची आपल्याला जाणीव होते. त्यामुळे एका भारतीयाने दुसर्या भारतीयांसाठी निर्मिती केलेला हा चित्रपट आहे. माणसाने माणसावर प्रेम करायला शिकलं पाहिजे. मग तो कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा असो. जाती- धर्मांमुळे आपण आपल्यात दुरावा निर्माण होता कामा नये. कारण, शेवटी आपण सर्व भारतीय आहोत.
- मुलाखतकार : शेफाली ढवण