मुंबई : मुंबई महापालिकेचे प्रशासक इक्बालसिंग चहल यांच्या अध्यक्षतेखाली चार समित्या स्थापना करण्यात येणार आहेत. स्थायी समिती, सुधार समिती, महापालिका आणि या व्यतिरिक्त असलेल्या समित्यांपैकी इतर एक समिती, अशा एकूण चार समित्या असण्याची शक्यता आहे. महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाल हा ७ मार्चपर्यंत होता. तो कार्यकाळ संपल्यामुळे पालिकेवर प्रशासकाची नियुक्ती झाली आहे. मार्च अखेरपर्यंत प्रशासकांनी एकही समिती गठीत केली नसल्यामुळे महत्वाच्या समित्यांचे कामकाज सुरु झाले नव्हते. अखेर आता पालिकेची कामे पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासकांच्या अध्यक्षतेखाली चार समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. महापालिकेचे आयुक्त व प्रशासक असलेल्या इक्बालसिंग चहल यांच्या नेतृत्वाखाली या समित्या स्थापन करण्यात येण्याची शक्यता आहे.
मुंबई पालिकेची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली असून त्यामुळे महापालिकेवर गेल्या ८ मार्च पासून चहल यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली. शेवटच्या स्थायी समितीमध्ये राखून ठेवलेल्या महत्वाच्या प्रस्तावांवर प्रशासकांनी अद्यापही निर्णय घेतले नसल्याचे समजते. मात्र आता प्रशासकांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन केल्या जाणार असून स्थायी, सुधार यांच्यासह अन्य तीन समित्या स्थापन केल्या जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. शिक्षण, बेस्ट, आरोग्य, स्थापत्य शहर, स्थापत्य उपनगरे, विधी व महसूल, महिला व बाल कल्याण यासर्व समित्यांच्या मिळून स्वतंत्र एक समिती स्थापन केली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये सर्व समित्यांमध्ये सर्व अतिरिक्त आयुक्त, सह आयुक्त व उपायुक्त यांचा समावेश असेल.