मुंबई - सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये मंगळवारी सकाळी एक बिबट्या लोखंडी सापळ्यात अडकला होता. वन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याची सुटका केली. मात्र, त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून वाघांच्या शिकारीसाठी वापरण्यात येणारा 'बहेली ट्रॅप' याठिकाणी वापरण्यात आला आहे.
कराड तालुक्यातील खोदशी गावात मंगळवारी सकाळी एक बिबट्या लोखंडी सापळ्यात अडकल्याचे गावकऱ्यांना आढळून आले. हा बिबट्या साधारण एक वर्षाचा नर बिबट्या आहे. यासंदर्भातील माहिती पोलीस पाटील यांनी वनक्षेत्रपाल तुषार नवले व मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना दिली. घटनास्थळी वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे आणि वनविभागातील सर्व कर्मचारी वनपाल बाबुराव कदम, सावखंडे ,वनरक्षक रमेश जाधव हे पोहचले. सापळ्यात अडकलेल्या बिबट्यास जाळी टाकून पकडण्यात आले. त्यानंतर पिंजऱ्यात घालून त्याला सुरक्षित स्थळी हलविले.
लोखंडी सापळ्यात अडकल्याने बिबट्याच्या पायाचा पंजा तुटला असून त्याला गंभीर जखम झाली आहे. वनविभागाचे पशुवैद्यक डॉ. चंदन सवणे यांनी बिबट्यास भुलीचे इंजेक्शन देऊन पायावर उपचार सुरू केले. सध्या हा बिबट्या पशुवैद्यकांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहे. हा बिबट्या ज्या लोखंडी सापळ्यात अडकला होता त्याला 'बहेली ट्रॅप' असे म्हणतात. मध्यप्रदेश येथील बहेली जमत ही संपूर्ण भारतात वाघ शिकारीसाठी खूप प्रसिद्ध आहेत. त्यांची शिकार करण्याची पद्धत वेगळी आहे. तसेच ते शिकारीसाठी जो सापळा वापरतात त्याला बहेली ट्रॅप असे म्हणतात. या घटनेत बहेली ट्रॅपचा वापर आढळून आल्याने सर्व लोकांना आवाहन करण्यात आले आहे की, जर कोणी संशयास्पद बहेली शिकारी फिरत असल्यास वन विभागास सूचित करावे.