मानसिक आजार आणि होमियोपॅथीची व्याप्ती भाग- ६

    01-Feb-2022
Total Views | 169

homeopathy
माणसाच्या मनात तयार झालेला भयगंड हा पूर्णत: माणसाच्या मनातील कल्पना व संवेदना म्हणजेच ‘फीलिंग्स’वर अवलंबून असतो. जर या भयगंडापासून मुक्ती पाहिजे असेल, तर आपल्याला सकारात्मक विचार करणे व त्याप्रमाणे वागणे हे फार महत्त्वाचे असते. असे म्हटले जाते की,
 
 
Every day, two bulls fight in every person's mind :
Positivity and Negativity.
Do you know which one wins?
The one which you feed the most!
 
होमियोपॅथीची औषधे अशा मानसिक आजारांवर अतिशय परिणामकारकरीत्या कार्य करतात. याचे मुख्य कारण असे की, होमियोपॅथीची औषधे ही अतिशय सूक्ष्म मात्रेमध्ये निरोगी माणसांवर सिद्ध केलेली असतात. ही औषधे कुठल्याही प्राण्यांवर सिद्ध केलेली नसतात. निरोगी माणसांवर औषधे सिद्ध केली गेली असल्यामुळे औषध सिद्धतेच्या सिद्धांतानुसार निरोगी माणसे औषधांमुळे जे मानसिक बदल होतात, ते व्यवस्थित सांगू शकतात. औषध सिद्धतेला नियमांनुसार मानसिक लक्षणे ही भावनिक पातळीवर (इमोशनल लेव्हल), बौद्धिक पातळीवर (इंटेलेक्च्युअल लेव्हल), इच्छाशक्ती (विल) आणि सदसद्विवेकबुद्धी (अंडरस्टॅडिंग) या पातळ्यांवर नोंदवली जातात. इतर औषध प्रणालींमध्ये औषधांची सिद्धता ही प्राण्यांवर केली जाते व प्राणी बोलू शकत नाहीत.
 
त्यामुळे औषधांचा तंतोतंत परिणाम आपल्याला कळू शकत नाही. आता यावर एक शंका उपस्थित होऊ शकते व ती म्हणजे औषधांची सिद्धता ही जर निरोगी माणसांवर केली गेली, तर त्या माणसांचे आरोग्य धोक्यात येते का? तर याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. कारण असे की, होमियोपॅथीची औषधे ही जेव्हा सिद्ध केली जातात, त्यावेळी ती अतिशय ‘डायल्युटेड कॉन्सन्ट्रेशन’मध्ये लोकांना दिली जातात. त्याचबरोबर त्या औषधांमधला घातक घटक विघटित करून काढून टाकलेला असतो. त्यामुळे निरोगी माणसांच्या आरोग्यावर त्याचा काहीही विपरित परिणाम दिसून येत नाही.
 
यापुढे जाऊनसुद्धा खास काळजी घेतली जाते. औषध सिद्धता करताना तज्ज्ञ होमियोपॅथीक डॉक्टरांच्या देखरेखीखालीच या औषधांची सिद्धता केली जाते. ज्यावेळी रुग्णांमध्ये काही शारीरिक व काही मानसिक लक्षणे दिसू लागतात, अशा वेळी जर तज्ज्ञ डॉक्टरांच्या असे लक्षात आले की, एखाद्या माणसावर त्या औषधाचे थोडे जरी दुष्परिणाम दिसत आहेत, तर ताबडतोब त्या औषधाचा ‘अ‍ॅण्टिडोट’ (Antidote) हा त्या माणसाला दिला जातो. म्हणूनच होमियोपॅथीक औषधे शुद्ध, सुरक्षित व गुणकारीही असतात.
 
मी स्वतःसुद्धा आतापर्यंत अनेक प्रकारच्या औषध सिद्धतेत भाग घेतला आहे. मला असे लक्षात आले की, आपण जेवढी औषध सिद्धता करतो तेवढे आपल्यातील वाईट लक्षणे, वाईट गुण कमी होण्यास मदत होते. होमियोपॅथीक औषधांचा गाभा या मुख्य औषध सिद्धतेतच आहे. मानसिक आजारांशी सकारात्मक विचार व होमियोपॅथीने कसा लढा द्यायचा, ते आपण पुढील भागात पाहू.
 
- डॉ. मंदार पाटकर
(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121