महाराष्ट्रात ‘चेस्टनट विंग्ड कुक्कू’चे दुर्मीळ दर्शन; राज्यातील तिसरीच नोंद

कर्नाळ्यात प्रथमच दिसला ‘चेस्टनट विंग्ड कुक्कू’

    30-Dec-2022   
Total Views | 198

 
 
chestnut cuckoo



मुंबई (समृद्धी ढमाले) :
राज्यात ‘चेस्टनट विंग्ड कुक्कू’चे दुर्मीळ दर्शन घडले आहे. पनवेलजवळील कर्नाळा पक्षी अभयारण्यात हा पक्षी गुरुवारी पक्षीनिरीक्षकांना आढळून आला. कोकिळेच्या या दुर्मीळ प्रजातीची ही महाराष्ट्रातील तिसरीच नोंद असून कर्नाळ्यात हा पक्षी प्रथमच नोंदवण्यात आला आहे.

हिवाळी हंगामात राज्यात अनेक पक्ष्यांचे स्थलांतर होते. यामध्ये पाणपक्ष्यांबरोबरच जंगलात अधिवास करणाऱ्या पक्ष्यांचा देखील समावेश असतो. जंगलात अधिवास करणाऱ्या अशा एका दुर्मीळ पक्ष्याची नोंद राज्यातून करण्यात आली आहे. पक्षीनिरीक्षक प्रशांत श्रीवास्तव गुरुवारी सकाळी कर्नाळा अभयारण्यात पक्षी निरीक्षणासाठी गेले होते. “अभयारण्यातील एका तलावाच्या नजीक सकाळी ११:३० च्या दरम्यान एका काळ्या पक्ष्याची हालचाल आढळून आली. त्या पक्ष्याचे फोटो काढून त्याचे निरीक्षण केले असता तो 'चेस्टनट विंग्ड कुक्कू' असल्याचे समजले”, असे श्रीवास्तव यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना सांगितले. कर्नाळ्यात या पक्ष्याचे प्रथमच दर्शन झाल्याची माहिती स्थानिक पक्षीनिरीक्षक सागर म्हात्रे यांनी दिली.

'चेस्टनट विंग्ड कुक्कू' हा प्रामुख्याने आग्नेय आशिया आणि हिमालयाच्या पायथ्याच्या प्रदेशात आढळून येतो. या प्रदेशात हा पक्षी आपली विण करत असल्याची माहिती पक्षी अभ्यासक आदेश शिवकर यांनी दिली. श्रीलंकेमध्ये त्याचे हिवाळी स्थलांतर होते. हे स्थलांतर तो प्रामुख्याने पूर्व घाटाच्या प्रदेशामधून करतो. त्यामुळे त्याचे दर्शन दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळ या राज्यांमध्ये होत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, महाराष्ट्रातून या पक्ष्याची नोंदी असून कर्नाळ्यातील ही नोंद राज्यातील तिसरीच नोंद असल्याचे त्यांनी नमूद केले. हा पक्षी भरकटलेल्या अवस्थेत कर्नाळ्यात आल्याचा अंदाज सागर म्हात्रे यांनी व्यक्त केला.

'चेस्टनट विंग्ड कुक्कू'च्या नोंदी

'चेस्टनट विंग्ड कुक्कू'ची महाराष्ट्रातील पहिली नोंद १९९९ साली सायन येथे अभ्यासक आदेश शिवकर यांनी स्वतः केली होती. यावेळी हा पक्षी त्यांना जखमी अवस्थेत सापडला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने शिवकर यांनी या पक्ष्याचे मृत शरीर 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'ला सुपूर्द केले होते. तर, दुसरी नोंद अमरावतीतील मेळघाट मध्ये २०१३ साली झाली होती. ‘चेस्टनट विंग्ड कुक्कू’ हा वटवट्या प्रजातींमधील पक्ष्याच्या घरट्यात अंडी घालतो. या पक्ष्याचा वरील भाग चकचकीत गडद , काळे डोके, लांब काळी शेपटी आणि लालसर तपकिरी मान असते.


 

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड. 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121