‘हिंदू वारसा हक्क’ अनुसूचित समाजाच्या सदस्यगटांना का नाहीत?

    14-Dec-2022   
Total Views |

हिंदू वारसा हक्क
 
 
 
 
‘हिंदू वारसा हक्क’ अनुसूचित समाजाच्या सदस्यगटांना का नाहीत? यावर सार्वत्रिक चर्चा होणे, आज गरजेचे आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला ‘हिंदू वारसा कायद्या’च्या ‘कलम २(२)’चे परीक्षण करून ‘हिंदू वारसा कायद्या’तील तरतुदींमध्ये सुधारणा करण्याचा विचार करण्यासंदर्भात नुकतेच मत व्यक्त केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मत खरेच महत्त्वाचे आहे. ‘हिंदू वारसा कायदा’अंतर्गत ‘कलम २(२)’तरतुदीबद्दल समाजातील विविध स्तरातील मान्यवरांचे मत पाहूया.


हिंदू वारसा कायद्या’च्या ’कलम २(२)’नुसार हिंदू कायदा अनुसूचित जमातींच्या सदस्यांना लागू होत नाही. त्यामुळे हिंदू कायद्यानुसार महिलांना पैतृक संपत्तीमध्ये जो ’वारसा हक्क अधिकार’ मिळाला आहे, तो त्यांना कायद्याने मिळू शकत नाही. यावर आदिवासी महिलेला वारसा हक्काने पुरूष आदिवासींच्या बरोबरीने समानतेचा हक्क असून केंद्राने या प्रश्नाबाबत परीक्षण करण्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले आहे. तसेच हिंदू वारसा कायद्यातील तरतुदींमध्ये सुधारणा करण्याचा विचार करावा, असेही मत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला संबोधित करून मांडले आहे. यावर न्यायमूर्ती एम. आर. शाह आणि कृष्णा मुरारी यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, बिगर आदिवासींच्या मुलीला वडिलांच्या मालमत्तेत समान वाटा मिळण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आदिवासी समाजाच्या मुलींचा असा अधिकार नाकारण्याचे कारण नाही. नुकताच सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला आहे की, बिगर आदिवासी मुली त्यांच्या वडिलांच्या संपत्तीवर हक्क सांगू शकतात, तर आदिवासी मुली त्यांच्या वडिलांच्या संपत्तीवर हक्क का सांगू शकत नाहीत?



सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केलेली सूचना आणि अनुसूचित जमातीतील महिलांच्या वारसा हक्कासंदर्भात विचारलेला प्रश्न या अनुषंगाने ‘हिंदू वारसा कायद्या’च्या ‘कलम २(२)’ यामधली तरतूद काय आहे? त्यावर सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या सूचना काय आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे. या तरतुदींनुसार पुन्हा प्रश्न ऐरणीवर आला आहे तो म्हणजे, हिंदू कोण? हिंदू कायद्याची बांधिलकी आणि अधिकार तरतुदी कुणासाठी? तर दुसरीकडे संविधानाने सर्वांना समान संधीची हमी आणि तशा कायद्यातील तरतुदीही केल्या आहेत. संविधानाने लिंग, जात, प्रांत, वंश, वर्ण हे भेद टाळून सर्वांना समान हक्क आणि अधिकाराची तरतूद केली असताना ‘हिंदू वारसा कायद्या’च्या ‘कलम २(२)’नुसार मुली महिला केवळ अनुसूचित जमातीतील आहेत, म्हणून त्यांना विशिष्ट किंवा कोणताही हक्क-अधिकार नाकारणे, हे संविधानाच्या समानतेच्या कायदेतत्त्वाविरोधात आहे.



संविधान आणि एकंदर लोकशाहीतील सर्वच व्यवस्था अत्यंजांच्या उत्थानाबाबत संबंधित आहेत. स्त्रियांचे सर्वच बाबतीत सक्षमीकरण, त्या पार्श्वभूमीवर त्यांच्यासोबतचा कोणताही भेदभाव नाकारणे आणि सर्वच स्त्रियांना माणूस म्हणून जगण्याच्या संधी देणे, हे संविधानाच्या अनेक तत्त्वातून आणि संरक्षक कायद्यातून प्रतीत होते. अशावेळी स्त्री जन्माने एका विशिष्ट समाजाची आहे, म्हणून पैतृक संपत्तीतून तिचा अधिकार नाकारणे हे कल्याणकारी तत्त्वाच्या विरोधात आहे. समरस समाजाच्या उभारणीमध्ये समाजातील प्रत्येक घटकांना सामाजिक न्याय मिळायलाच हवा. त्याअनुषंगाने ’हिंदू वारसा कायदा’ ’कलम २(२)’मधील तरतुदीबाबत सर्वोच्च न्यायालयाचे मत केंद्र सरकारने विचारात घ्यावे असे वाटते.


संशोधन करण्याची गरज


’हिंदू वारसा कायदा’ ’कलम २(२)’मधील तरतुदीमुळे अनुसूचित जमातीतील महिला या वारसा हक्कापासून वंचित राहतात. या विषयी सर्वोच्च न्यायालयाने नुकताच प्रश्न उपस्थित केला आहे. हा कायदा हिंदू अनुसूचित जमातींना लागू आहे की नाही, याबद्दल आजदेखील अनेकांच्या मनात संभ्रम आहे. तथापि सर्वोच्च न्यायालयाने सर्व तरतुदींचा विचार करता असा निर्णय दिलेला आहे की, १)जर एखादी अनुसूचित जमातीची व्यक्ती जर हिंदू चाली, रूढी, परंपरा याप्रमाणे त्यांचे जीवन जगत असतील, तर हिंदू कायद्यातील तरतुदींचा उपयोग अशा व्यक्तींसाठी न करणे अन्यायकारक ठरेल. २) अनुसूचित जमातीतील व्यक्तीने हिंदू कायद्यातील वारसा हक्क कायद्यानुसार हक्क नाकारले आणि ’हिंदू कायदा’ आम्हाला लागू होत नाही, हे सिद्ध करायचे असल्यास त्याला हिंदू धर्माच्या व्यतिरिक्त स्वतंत्र चालीरीती, रूढी, परंपरेचे पालन करतो, हे सिद्ध करावे लागेल. सर्वोच्च न्यायालयाने काही खटल्यांमध्ये हे निरीक्षण नोंदवले आहे. याचाच अर्थ असा आहे की, हिंदू चालीरीती, प्रथा-परंपरा, रूढीनुसार जीवन जगणार्‍या व्यक्तीने हा कायदा नाकारायचा ठरवला, तरीसुद्धा संबंधित कुटुंबातील ज्यांना या कायद्यातील हक्क मिळवायचे आहे, ती व्यक्ती हक्क मिळवू शकते. त्यासाठी तिला सिद्ध करावे लागेल की, ती ज्या समाजाची आहे, तो समाज हिंदू चालीरीती, रूढी, परंपरा मानतो. हिंदू चालीरीती, रूढी, परंपरेव्यतिरिक्त ते मुख्यत्वे कोणत्याही दुसर्‍या परंपरा, रूढींनुसार जीवन जगत नाहीत. मात्र, या सर्व पार्श्वभूमीवर वाटते की, अनुसूचित जमातीतील महिलांना ‘हिंदू वारसा कायद्या’चा लाभ व्हावा. यासाठी ‘हिंदू वारसा कायद्या’च्या ’कलम २ (२)’तरतुदींमध्ये संशोधन करण्याची गरज आहे.

अ‍ॅड. प्रवर्तक पाठक
विचारवंत, कार्यकर्त्यांनी विचार करावा...


‘हिंदू वारसा कायद्या’च्या ’कलम २ (२)’नुसार अनुसूचित जमातींच्या महिलांना या कायद्यातील वारसा हक्कांचे लाभ मिळत नसतील तर... समाजातील विचारवंत आणि कार्यकर्ते यांनी वारसा हक्क तरतुदीमध्ये आपल्या समाजातील महिलांनाही लाभ मिळावा, यासाठी एकत्रित येऊन विचार-कार्य करणे गरजेचे आहे. सर्व भारतीयांना संविधानाने लागू केलेले हक्क, अधिकार मिळायला हवेत. कारण, कायदा श्रेष्ठ आहेच त्याचप्रमाणे समाजशक्तीही मोठी आहे.मिलिंद थत्ते,
सामाजिक कार्यकर्ता, अध्यक्ष, वयम संस्था
संशोधन झालेच तर केंद्र सरकारने संवादी भूमिका ठेवावी


आदिवासी महिलेला वारसाहक्काने पुरुष आदिवासींच्या बरोबरीने समानतेचा हक्क असून केंद्राने या प्रश्नाबाबत परीक्षण करण्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. तसेच ‘हिंदू वारसा कायद्या’तील तरतुदींमध्ये सुधारणा करण्याचा विचार केंद्राने करावा, असेही मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले. ही बाब स्वागतार्ह आहे. कारण, समाजातील महिलांना त्यांचे हक्क अधिकार मिळायलाच हवेत. मात्र, या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचे मत विचारत घेणे, हा सर्वस्वी केंद्र सरकारच्या अधीन निर्णय आहे. मात्र, केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या मतांवर विचार करणार असेल तर ‘हिंदू वारसा कायद्या’च्या ’कलम २ (२)’ तरतुदींवर संशोधन करताना यापूर्वी संविधानकर्त्यांनी अनुसूचित जमातीच्या सदस्यांना यातून का वगळले, याचा अभ्यास संशोधक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी विस्तृत पद्धतीने करणे आवश्यक आहे. त्यावेळी समाजघटकाला का वगळले गेले आणि आज त्यासंदर्भात काही बदल कालानुरूप का करणे आवश्यक आहे, यासंदर्भात व्यवस्थित कारणमीमांसा करणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र सरकारने नेहमीप्रमाणे संवादी भूमिकेतून विचार करावा. आदिवासी समाजासाठी काम करणार्‍या व्यक्ती संस्था आणि प्रत्यक्ष समाजप्रतिनिधी यांच्याशी संवाद साधणे गरजेचे आहे. समाजात या तरतुदीविषयी काय मत आहे आणि काय करणे आवश्यक आहे, यावर व्यापक सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. ’वनवासी कल्याण आश्रम’ आज देशभर वनवासी समाजाच्या उत्थान कल्याणासाठी काम करते. तसेच या तरतुदींमध्ये संशोधन करायचे असेल, तर त्यासाठी जनजागृती, व्यापक प्रमाणात जनसमर्थन मिळवणे गरजेचे आहे. केंद्र सरकारच्या या संदर्भातील कार्यासाठी ‘वनवासी कल्याण आश्रम’ नक्कीच सहकार्य करेल.

शरद चव्हाण, केंद्रीय प्रशासनिक संपर्क प्रमुख,
वनवासी कल्याण आश्रम, दिल्ली

तरतुदींमध्ये संशोधन व्हायलाच हवे...

 
बिगर आदिवासी मुली त्यांच्या वडिलांच्या संपत्तीवर हक्क सांगू शकतात, तर आदिवासी मुली त्यांच्या वडिलांच्या संपत्तीवर हक्क का सांगू शकत नाहीत? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे. त्यासंदर्भात केंद्र सरकारने परीक्षण आणि तरतदींमध्ये बदल करण्याचा विचार करण्याचे मत सर्वोच्च न्यायालयाचे आहे. असे मत मांडल्याबद्दल सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाचे धन्यवाद. वनवासी समाजातील भगिनींनाही हक्क मिळण्यासाठी तरतुदींमध्ये संशोधन व्हायला हवे. मला खात्री आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपप्रणित केंद्र सरकार जर ‘राईट टू लिव्ह’ अंतर्गत मुस्लीम महिलांच्या कल्याणासाठी ‘तिहेरी तलाक’विरोधी कायदा पारित करू शकले, तर मग वनवासी भगिनींच्या कल्याणासाठीही वारसा हक्क कायद्यातील विशिष्ट तरतुदींमध्ये नक्कीच संशोधन होऊ शकेल. या पार्श्वभूमीवर समाजात खरेच अजून याबाबत हवी तितकी जागृती नाही. मात्र, या संदर्भात आम्ही जनजागृती करत आहोत. वारली, ठाकर, महादेव, कोळी, कोकणा हे सर्व समाजगट हिंदू चालीरिती, परंपरा, रूढी पाळतात आणि त्यानुसारच जीवन व्यतित करतात. आमच्या या सर्व समाजाची ‘हिंदू’शिवाय दुसरी ओळख असूच शकत नाही. त्यामुळे ‘हिंदू मॅरेज अ‍ॅक्ट’ची सर्व कलमे आम्हाला लागू असलीच पाहिजे. आम्ही हिंदू रितीरिवाज, प्रथा पाळतो. त्यामुळे आमच्या समाजाच्या मुलींना वारसा हक्क मिळायला हवा. तोदेखील कुणाच्यातरी इच्छेने नव्हे, तर कायद्याने. जर ‘हिंदू वारसा कायद्या’च्या ’कलम २ (२)’ आधार घेत आमच्या समाजातील मुलींचा वारसा हक्क आणि दुसरे हक्क नाकारत असू तर हे योग्य नाही. कायदेशिररीत्या आणि मानवी हक्कांच्या परिप्रेक्षातही यावर विचार होणे गरजेचे आहे. ‘आसंमत प्रतिष्ठान’तर्फे आम्ही वनवासी समाजाच्या उत्थानासाठी कार्य करतो. वनवासी भगिनींनाही इतर सर्व भगिनींप्रमाणे विनासायास वारसा हक्क उपलब्ध झालाच पाहिजे. यासाठी ‘हिंदू वारसा कायद्या’च्या ’कलम २ (२)’मध्ये संशोधन होणे गरजेचे आहे. असे संशोधन होत असेल, तर आम्ही सर्व वनवासी माता-भगिनी-कन्या नव्हे सर्वच वनवासी समाज या संशोधनाच्या समर्थनार्थ ठाम उभे राहू.

निशा सवरा,
अध्यक्ष, आसमंत प्रतिष्ठान
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.