लंडन : विसाव्या शतकात साम्राज्य विस्तारासोबतच धर्मप्रसार करुन जगात ‘ग्रेट’ बनलेल्या ब्रिटनमध्येच आजघडीला ख्रिस्ती बांधवांच्या संख्येत कमालीची घट होत आहे.
जनगणनेच्या ताज्या आकडेवारीत हे निष्पन्न झाले आहे. इंग्लंडच्या लोकसंख्येत ४४ टक्के मुस्लिमांची वाढ झाली आहे, तर ख्रिस्त्यांचा आलेख घटत असल्याने इंग्लंडमध्ये येत्या काळात ख्रिस्ती अल्पसंख्य होण्याची भीती व्यक्त होत आहे. इंग्लंडच्या जनगणनेची आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यानुसार इंग्लंडमध्ये ख्रिस्त्यांची संख्या झपाट्याने कमी होत असून मुस्लिमांच्या लोकसंख्येत प्रचंड वाढ होत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
इंग्लंडच्या राष्ट्रीय संख्याशास्त्र विभागाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्यात गेल्या दशकभरात मुस्लिमांच्या लोकसंख्येत ४४ टक्के वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तेथील एकूण लोकसंख्येपैकी ६.९ टक्के म्हणजेच ३९लाख लोक मुस्लीम धर्माला मानणारे आहेत. यात आणखी एक धक्कादायक बाब म्हणजेच, निधर्मी लोकांची संख्या दुसर्या क्रमांकावर असल्यामुळे ख्रिस्त्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
अहवालानुसार इंग्लंडमध्ये ख्रिश्चनांच्या संख्येत १३.९ टक्के घट झाली आहे. मुस्लिमांची संख्या ४.९ टक्क्यांवरुन ६.५ टक्के झाली आहे. एकंदरीत इंग्लंडमध्ये एकूण लोकसंख्येच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी ख्रिस्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे. सद्य:स्थितीत इंग्लंड आणि वेल्समध्ये ख्रिश्चनांची संख्या केवळ ४६.२ टक्के आहे. या आकडेवारीमुळे इंग्लंडमधील धार्मिक आस्थापनांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
इंग्लंडमध्ये प्रत्येक दहा टक्के समुदायात विभिन्न जाती, आणि धर्माचे लोक आढळून येतात. याचे प्रमाण ८.७ टक्के वाढले आहे. यात पंजाबी आणि उर्दू बोलणार्यांची संख्या २ लाख, ९१ हजार आणि २ लाख, ७० हजार क्रमश: असल्याची नोंद झाली आहे. या दोन भाषा बोलणार्यांची क्रमवारी इंग्लंडमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे.
इंग्लंडची आर्थिक आणि राजकीय राजधानी असलेल्या लंडनच्या उत्तर विभागावरील हैरो या शहरात हिंदूंचे प्रमाण २५.३ टक्क्यांवरुन २५.८ टक्के झाले आहे. ९४ टक्के जणांनी धार्मिक आधारावर जनगणनेत सहभाग घेतला आहे.
युरोपातील संघर्ष, अन्न आणि निवार्याची समस्या वाढल्याने लोकांना धार्मिक मदतीची गरज आहे. त्याची पूर्तता करत आहोत.
- स्टीफन कोट्रेल,
आर्क बिशप, यॉर्क