फेक न्यूज: अफवा ते कॉन्स्पिरसी थिअरी

Total Views |
Fake News
 
 
‘फेक न्यूज’चा प्रचंड वापर सध्या केला जात आहे. इंटरनेट आणि समाजमाध्यमांमुळे तर खरी बातमी आणि खोटी बातमी वेगळी काढणं कठीण होऊन बसलं आहे. सध्या या सगळ्याचा अगदी कळस झालाय. हा प्रकार पूर्वीदेखील होताच फक्त प्रमाण कमी होतं.
 
श्रीक्षेत्र भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक तीर्थक्षेत्र. मुंबईहून भीमाशंकरला जाण्यासाठी प्रथम कर्जत रेल्वे स्थानक, तिथून एसटीने खांडस नावाचं गाव आणि मग तिथंपासून अतिशय दमछाक करणारा, पण अत्यंत निसर्गसुंदर असा घाट चढला की आलं भीमाशंकर. पहाटेच्या अंधारात आमची 25-30 जणांची ट्रेकर्सची टोळी कर्जतच्या बस थांब्यावर उभी होती. बस आली. लाल डबा एसटीचा दरवाचा किती चिंचोळा असतो, हे आपल्याला माहीतच आहे.
 
 
त्यातून पटकन आता घुसून पुढच्या जागा पटकावण्याची ‘फुल सेटिंग’आमच्या टोळीने लावली होती. तेवढ्यात स्थानिक लोकांचाही एक आठ-दहा जणांचा गट आमच्या मागून आला. त्यातला एक जण जोरात ओरडला, “अरे, ही कल्याण गाडी आहे, खांडस नव्हे.’‘ झालं... आम्ही मागे सरलो. तो गट झटकन पुढे आला आणि पटापट पुढच्या जागा धरून बसलासुद्धा, मग कंडक्टर उर्फ मास्तर म्हणाले, “चला, ही खांडस गाडीच आहे.” तेव्हा आमचे चेहरे फोटो काढण्यालायक झाले असावेत. एका साध्या ‘फेक न्यूज’ने, अफवेने स्थानिक लोकांनी आम्हाला झकास शेंडी लावली होती.
 
 
पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात सर्वप्रथम शिकवलं जातं की, ‘बातमी ही पवित्र असते.’ म्हणजे घडलेल्या घटनेचं वृत्त हे पत्रकाराने बातमीदाराने जसंच्या तसं द्यावं, त्यात आपली मतं, आपले पूर्वग्रह, आपले अभिनिवेश घुसवू नयेत. पण, हे तत्व फक्त अभ्यासक्रमातच उरलं आहे. सर्व प्रकारच्या पत्रकारितेत, मग तो प्रिंट मीडिया असो वा इलेक्ट्रॉनिक मीडिया, त्यात ‘फेक न्यूज’चा प्रचंड वापर सध्या केला जात आहे. इंटरनेट आणि समाजमाध्यमांमुळे तर खरी बातमी आणि खोटी बातमी वेगळी काढणं कठीण होऊन बसलं आहे. सध्या या सगळ्याचा अगदी कळस झालाय. हा प्रकार पूर्वीदेखील होताच फक्त प्रमाण कमी होतं.
 
 
भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्राच्या रणांगणावर एक ‘फेक न्यूज’, एक अफवा हवेत सोडून दिली की, अश्वत्थामा ठार झाला आहे. अल्पावधीत ही बातमी उभय सैन्यांमध्ये पसरली. अश्वत्थाम्याचे वडील आणि कौरवांचे सेनापती आचार्य द्रोण यांच्यापर्यंत देखील ती पोहोचली. या टप्प्यावर या ‘फेक न्यूज’ला म्हणायचं- ‘मिसइन्फर्मेशन’ चुकीची बातमी.
 
 
द्रोणाचार्यांनी धर्मराजाला विचारलं. धर्मराजाने गुळगुळीत उत्तर दिलं, “अश्वत्थामा मेला. पण, माणूस की हत्ती हे माहीत नाही.” या टप्प्यावर ‘मिसइन्फर्मेशन’चं रूपांतर ‘डिसइन्फर्मेशन’मध्ये झालं. ‘डिसइन्फर्मेशन’म्हणजे काहीतरी अहितकारक घडवून आणण्यासाठी मुद्दाम पेरलेली चुकीची बातमी. धर्मराजाकडून कळलेली बातमी म्हणजे पूर्ण सत्य. म्हणून द्रोणाचार्य रथातून उतरून शोक करू लागले. पांडव सेनापती धृष्टद्युम्न याने खड्गाच्या एका घावात द्रोणाचार्यांची मान धडावेगळी केली. भगवान श्रीकृष्णाने ‘फेक न्यूज’, ‘मिसइन्फर्मेशन’, ‘डिसइन्फर्मेशन’चंहे तंत्र अधर्मी कौरवांविरुद्ध बेलाशक वापरून पांडवांकरवी धर्मसंस्थापना घडवून आणली. ते द्वापारयुग होतं.
 
 
कलियुगात हे तंत्र अधर्मी लोकांच्याच हाती गेलं, 20व्या शतकात सोव्हिएत रशियाने खोट्या बातम्या निर्माण करण्याचा प्रचंड कारखानाच उघडला. देशोदेशींच्या साम्यवादी आणि समाजवादी पक्षांनी त्यांचं अनुकरण केलं. पण, लोकशाहीवादी ब्रिटन आणि अमेरिका त्यात मागे होते, असं नाही. जर्मन संशोधक फ्रेडरिक मॅक्समुल्लर याला ब्रिटनने शिष्यवृत्ती देऊन संस्कृत ग्रंथांची चुकीची भाषांतरं करण्याच्या कामावर नेमला. थोडक्यात, त्याची बुद्धी भाड्याने घेतली. आर्य नावाचा वंश असून, त्यांनी भारतावर आक्रमण केलं होतं, असा एक काल्पनिक सिद्धांत त्याच्याकरवी लंडनच्या एका विद्वत् परिषदेत सादर करवून घेतला. या टप्प्यावर ही ‘मिसइन्फर्मेशन’ होती. मग इंग्रजांनी भारतासह संपूर्ण ब्रिटिश साम्राज्यात सर्वत्र हा ‘आर्य आक्रमणाचा सिद्धांत’ प्रस्थापित करवला. या टप्प्यावर त्याला ‘डिसइन्फर्मेशन’म्हणावं लागेल. कारण, त्यातून भारतीय समाजात आक्रमक, विजेते, गोरे आर्य आणि स्थानिक, पराभूत, काळे द्रविड असा भेद इंग्रजांना निर्माण करायचा होता.
 
 
कित्येकदा या अफवा किंवा चुकीच्या बातम्या लोकमानसात इतक्या दृढ होऊन जातात की त्यांना सिद्धांताच रूप प्राप्त होतं. या बातम्या चुकीच्या आहेत, अफवा आहेत त्यांना कसलाही आधार नाही, असं पुन्हा पुन्हा सिद्ध होऊनसुद्धा समाज त्यांच्यावर विश्वास ठेवतो. मग त्यांना एक गूढ रहस्यमय स्वरूप प्राप्त होते. त्यामुळे त्या लोकांना अधिकच आवडू लागतात. ऐकणारा आणि सांगणारा प्रत्येक जण त्यात स्वतःच्या कल्पनेची अधिक भर घालतो. अशा सिद्धांतांना पाश्चिमात्यदेशात ‘कॉन्स्मिरसी थिअरी’ असं म्हटलं जातं.
 
 
या संदर्भात तिकडच्या सगळ्यात लाडका ‘कारस्थान सिद्धांत’ म्हणजे ‘इल्युमिनाटी’ नावाची एक गुप्त संघटना संपूर्ण जगावर राज्य करू इच्छित आहे, हा होय. ‘इल्युमिनाटी’संघटनेची अधिकृत स्थापना इ.स. 1772 साली बव्हेरिया (आजचा जर्मनीमध्ये) झाली. ‘इल्युमिनाटी’ आणि चर्च यांच्यामध्ये संघर्ष होऊन अखेर सरकारने 1785 साली ‘इल्युमिनाटी’सह सर्व गुप्त संस्थांवर बंदी घातली. पण, ‘कारस्थान सिद्धांत’वाल्या लोकांच म्हणणं असं आहे की, फार प्राचीन काळापासून ‘इल्युमिनाटी’ अस्तित्वात होतीच. गूढ, रहस्यमय, अतींद्रिय असा शक्तींची उपासना करणारे ‘इल्युमिनाटी’ सदस्य त्या शक्तींच्या बळावर एक दिवस नक्कीच जगावर राज्य करतील. 2000 साली डॅन ब्राउन या ‘बस्ेट सेलर’ यादीतल्या लेखकाने ‘एंजल्स अॅण्ड डेमन्स’ ही कादंबरी लिहून ‘इल्युमिनाटी’च्या कारवायांवर बराच प्रकाश टाकला. पुढे या कादंबरीवर चित्रपटही निघाला. अनेकांच्या मते, डॅन ब्राउनच्या ‘दा विंची कोड’पेक्षीही ‘एजंल्स अॅण्ड डेमन्स’ अधिक प्रभावी आहे. या दोन्ही कादंबर्या मराठीतही भाषांतरित झालेल्या आहेत. वैज्ञानिकांच्या मते, या सगळ्याला मनोरंजक कल्पनाविलास यापेक्षा अधिक किंमत नाही.
 
 
आणखी एका फार गाजलेल्या कारस्थान सिद्धांताला या महिन्यात 100 वर्षं पूर्ण होत आहेत. तो सिद्धांत म्हणजे ‘फारोहांचा शाप.’ इजिप्त या देशातले ‘फारोह’ किंवा ‘फेरोह’या नावाने खोळखले जाणारे अतिप्राचीन राजे, त्यांनी बांधलेले अवाढव्य पिरॅमिड्स, चेऑप्स या ठिकाणच्या पिरॅमिडसमोर असणारी स्फिंक्सची तितकीच अवाढव्य मूर्ती, ‘रामासिस’ नावाच्या राजांचे प्रचंड पुतळे अशा सर्व गोष्टींमुळे इजिप्तबद्दल सर्वांच्याच मनात एक अतिशय गूढ असा भाव असतो. ही आधुनिक काळातील गोष्ट आहे असं नव्हे. अगदी ग्रीक आणि रोमन साम्राज्याच्या काळापासून अनेक प्रवाशांचे इजिप्तच्या पिरॅमिड्सबद्दलचे प्रवासवृत्तांत उपलब्ध आहेत.
 
 
आधुनिक काळात इजिप्तमधल्या प्राचीन वास्तू आणि वस्तूंचा शास्त्रशुद्ध अभ्यास प्रथम फे्ंरचांनी केला. फे्ंरच सेनापती जनरल नेपोलियन बोनापार्ट याने 1978 मध्ये इजिप्तवर स्वारी केली. तेव्हा त्याच्यासोबत विवान्त देनन नावाचा पुरातत्त्वशास्त्रज्ञ देखील होता. देननच्या नेतृत्वाखाली फे्ंरच पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी इजिप्तच्या असंख्य पुराणवास्तूंचा अभ्यासही केला आणि त्या लुटल्या देखील. त्या कालखंडात फे्ंरचांना सतत ऐकायला मिळायचं की, या वास्तू आणि वस्तू फारोहांच्या आहेत. जर कुणी त्या चोरण्याचा प्रयत्न केला, तर फारोहांच्या शापाने त्याचा भयंकर मृत्यू ओढवेल. फे्ंरचांनी या शापाकडे दुर्लक्ष करून बिनदिक्कत लूट केली. पुढे फे्ंरचांचा पराभव झाला. इजिप्तचा ताबा इंग्रजांकडे आला. तेव्हापासून म्हणजे साधारण 1801 सालापासून अनेक इंग्रज पुरातत्त्व मोहिमांनी इजिप्तमधले असंख्य पुरातात्त्विक अवशेष शोधून काढले.
 
 
पण, फारच महत्त्वाचा शोध लागला नोव्हेंबर 1922 मध्ये. हॉवर्ड कार्टर नावाचा इंग्रज पुरातत्त्वशास्त्रज्ञ 1899 सालापासून इजिप्तमध्ये काम करीत होता. दि. 4 नोव्हेंबर, 1922 या दिवशी त्याला तुतनखामुन या फारोहाच्या थडग्याचा शोध लागला. त्याने हे वृत्त तारेने ब्रिटनमधला आपला आश्रयदाता लॉर्ड कार्नारव्हॉन याला कळवलं. लॉर्ड कार्नारव्हॉन आपली मुलगी इव्हीलिन हिच्यासह तातडीने इजिप्तला आला. मग दि. 26 नोव्हेंबर, 1922 या दिवशी हॉवर्ड कार्टर त्याचा मुख्य मदतनीस आर्थर कॉलेंडर लॉर्ड कार्नारव्हॉन त्याची मुलगी इव्हीलीन यांच्यासह एकूण 26 लोकांनी तुतनखामुनच्या थडग्यात प्रवेश केला. त्यांना एका पेटीत बंद केलेला तुतनखामुनचा मृतदेह आणि असंख्य सोन्याच्या वस्तू दिसल्या. जगभरच्या पुरातत्त्व क्षेत्रातली ही फारच महत्त्वपूर्ण घटना होती. पण, या बरोबरच स्थानिक लोकांमध्ये जोरात चर्चा झाली की, या लोकांनी फारोहाला चाळवलं आहे. आता काहीतरी भयंकर घडणार. वर्तमानपत्रांनी या अफवादेखील चविष्टपणे चघळून छापल्या.
 
 
...आणि चार महिन्यांनी पहिला दणका बसला. लॉर्ड कार्नारव्हॉन कैरोमध्येच मरण पावला. त्या रात्री संपूर्ण कैरो शहरातली वीज कोणत्या तरी अज्ञात कारणाने गायब झाली होती. विशेष म्हणजे त्याच रात्री लॉर्ड कार्नारव्हॉनचा आवडता कुत्रा ब्रिटनमधल्या त्याच्या घरात मरण पावला. त्याच्या पुढच्या महिन्यात जॉर्ज गाउल्ड मरण पावला. गाउल्ड हा अमेरिकन रेल्वे अधिकारी तुतनखामुनच्या थडग्यात शिरलेल्या 26 जणांपैकी एक होता. त्याच्या पुढच्या वर्षी सर आर्चिबाल्ड डग्लस रीड मरण पावला. शवपेटीतून बाहेर काढलेल्या तुतनखामुनच्या ममीची क्ष-किरण चिकित्सा रीडने केली होती. इजिप्टॉलॉजिस्ट प्रा. ह्यू इव्हीलिन व्हाईट याने आत्महत्या केली. आर्थर मूस नावाचा शास्त्रज्ञ मृतावस्थेत आढळला. त्याच्यावर कुणीतरी आर्सेनिक या जहाल विषाचा प्रयोग केलेला आढळला. अमेरिकन इजिप्टॉलॉजिस्ट एरॉन अंबर याच्या घराला आग लागली आणि तो मेला.
 
 
या घटनांनी लॉर्ड कार्नारव्हॉनची मुलगी इव्हीलिन ही इतकी हादरली की, तिने आपला नियोजित नवरा ब्रोग्रेव्ह बुकँप याला नियोजित विवाहबंधनातून मुक्त करण्याची तयारी केली. ती म्हणाली, “माझ्यावर जर काही संकट कोसळणार असेलच, तर त्याचे परिणाम तुला भोगायला लागू नयेत.” पण, बुकँप खरा प्रेमिक निघाला. तो म्हणाला, “संकटातच तुला माझ्या आधाराची गरज आहे.”
 
 
आणि बुकँपच खरा ठरला. इव्हीलिनला काहीही झालं नाही. ती पुढे 1980 सालापर्यंत जगली. एकंदरीतच हा ‘फरोहाचा शाप’ कारस्थान सिद्धांत बंडल ठरला. कारण, वर सांगितलेल्या सहा जणांनंतर उरलेल्या 20 जणांना काहीही झालं नाही. ते नॉर्मल आयुष्य जगले आणि ठरावीक सरासरी वय झाल्यावर मेले. सगळ्यात मुख्य म्हणजे संशोधक हॉवर्ड कार्टर, ज्याने तुतनखामुनच्या थडग्याची शिळा उघडून सर्वप्रथम आत पाय ठेवला; तुतनखामुनची शवपेटी उघडून त्याची ममी बाहेर काढली, तो पुढे 17 वर्षं जगला आणि 1939 साली नैसर्गिक मृत्यूने मेला.
 
 
परंतु, आजही असंख्य कादंबर्या, कथा, चित्रपट यांमधून ‘फरोहाच्या शापा’चा हा कारस्थान सिद्धांत चविष्टपणे पुन्हा पुन्हा चघळला जात असतो. अलीकडचे हॉलिवूडचे लोकप्रिय नायक डॉ. इंडियाना जोन्स आणि नायिका लॉरा क्राफ्ट हे एकाच वेळी पुरातत्त्वशास्त्रज्ञ आणि जेम्स बॉँड असतात. ते फारोहाच्या थडग्यात शिरल्यावर काय-काय यावर अनेक चित्रपट निघालेत. लोकांना कारस्थान सिद्धांत चघळायला आवडतात. विज्ञान काहीही म्हणो!
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.