गोखले पुलाचे पाडकाम आणि नवीन पुलाचे नियोजन

    22-Nov-2022   
Total Views |

गोखले पुल 
 
 
 
 
मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणारा गोखले पूल धोकादायक म्हणून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. तेव्हा यानिमित्ताने पुलाची सद्यस्थिती, पुलाचे पाडकाम, त्यामुळे झालेली वाहतूककोंडी आणि नव्या पुलाच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया यासंबंधी माहिती देणारा हा लेख...
 
मुंबईतील अंधेरी या उपनगराला पूर्व-पश्चिम जोडणारा गोखले पूल दि. 7 नोव्हेंबरपासून वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे या परिसरातून प्रवास करणार्‍या प्रवाशांना मोठ्या वाहतूककोंडीला तोंड द्यावे लागत आहे. हा पूल मुंबई महानगरपालिकेने धोकादायक ठरल्यामुळे वाहतुकीसाठी तो पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने व वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्ग मुंबईकरांना सूचविले असले तरी त्यामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न मात्र मिटलेला नाही. त्यातच हा धोकादायक ठरलेला पूल पश्चिम रेल्वेमार्गावर असल्याने रेल्वे वाहतुकीला या पुलाच्या पाडकामापर्यंत कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, हेसुद्धा पश्चिम रेल्वेला डोळ्यांत तेल घालून जपायला हवे.
 
 
गोखले पूल बंद केल्यामुळे पादचारी, दुचाकी, रिक्षा व चारचाकी वाहतूकदारसुद्धा त्रस्त आहेत. प्रारंभी गोखले पुलाच्या पाडकामापासून ते पुनर्बांधणीपर्यंत नेमके मुंबई महापालिका की पश्चिम रेल्वे हे संपूर्ण काम करणार, अशा अनेक मुद्द्यांवर दोन्ही संस्थांचा समन्वय होत नव्हता. ‘आयआयटी, मुंबई’ व ‘व्हीजेटीआय’ या नावाजलेल्या संस्था सध्या सल्लागार म्हणून या पुलासंबंधीचे काम बघत आहेत. शिवाय सहा महिन्यांतून एकदा पूल तपासण्याचे ठरल्याप्रमाणे दुसर्‍या सल्लागाराकडेही (एससीजी कन्सल्टन्सी) महापालिकेने या पुलाची तपासण्याची जबाबदारी दिली होती. खरंतर कुठलाही पूल हा एक अडथळा निवारक घटक करतो. परंतु, या पुलाची स्थिती अशी झाली आहे की, आता नवीन पूल पुन्हा बांधून होईपर्यंत, बराच काळ वाहतुकीला अडथळा निर्माण होणार आहे.
 
 
गोखले पुलाचे काम सुरू करताना कामांचे अनेक विभागांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. ते असे की- सर्वप्रथम पूल वाहतुकीला पूर्णपणे बंद करणे. तसेच या पुलाचे पाडकाम करण्याकरिता दोन भागांपेक्षा जास्त भाग पाडायला हवेत. पुलाच्या रचनेत चार मार्गिकांमध्ये व पदपथ वजन क्षमतेमध्ये सुधारणा करून तो नव्याने बांधायला हवा. पुलाचा रेल्वेमार्गाचा भाग व महापालिकेकडील उताराचा भाग त्या-त्या संस्थांनी जबाबदारीने तपासायला हवा. बांधकामाला वेळ लागू नये म्हणून पूल ‘प्रीफॅब्रिकेटेड’ व ‘प्रीकास्ट’ पद्धतीने टप्प्याटप्प्यांत बांधणे, पादचारी, दोनचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहतूक टप्प्याटप्प्याने कधी सुरू करता येईल, या सगळ्या चिंतेच्या व नियोजनाच्या बाबी असल्याने व या कामात अनेक गुंतागुंत निर्माण झाली आहे. सर्व तांत्रिक बाबींकरिता अनुभवी व कुशल कंत्राटदार व कारागिर, ‘डेडिकेटेड’ व हुशार अभियंते या कामावर महापालिकेने व रेल्वेने नेमायला हवेत. आता पुढच्या वर्षी या पुलाच्या दोन मार्गिका व उर्वरित मार्गिका सप्टेंबर 2023 पर्यंत वाहतुकीस खुल्या करण्यात येतील. संपूर्ण पूल पूर्ण होण्यास कमीत कमी दोन वर्षे वा त्यापेक्षा अधिक काळ जाईल, असा अंदाज आहे. त्यामुळे मुंबईच्या आधीच गर्दीच्या वाहतुकीला हे एक जबरदस्त दुखणे ठरणार आहे.
 
 
पुलाची प्राथमिक माहिती
 
मुंबई महानगरपालिकेने हा 70 मीटर लांबीचा व ‘कॅन्टिलिव्हर’ पद्धतीचा पूल 1950 मध्ये फक्त वाहनांसाठी बांधला होता. 1975 मध्ये त्याला पदपथ जोडून तो पादचारी वाहतुकीकरिता वाढविण्यात आला. तो काही वर्षांनी रेल्वेकडे पर्यवेक्षणाकरिता दिला होता व महापालिकेने त्याकरिता रेल्वेला काही लाख रुपयांचा निधीही दिला होता.
 
 
नोव्हेंबर 2017 मध्ये वा त्याआधीच्या तपासणीत हा पूल धोकादायक आढळला नव्हता. पण, पुलाच्या कामातील पोलादी सळ्या गंजलेल्या आढळल्या व तो दुरुस्त करायचा का, पाडून पुन्हा नव्याने बांधायचा, ते ठरले नाही. पण, पश्चिम रेल्वे व मुंबई महापालिका ‘ही बाब काहीच महत्त्वाची नाही’ असे समजून गप्प राहिले व कमनिशिबी पालिकेला दि. 3 जुलै, 2018 मध्ये पूल अपघाताला तोंड द्यावे लागले. या अपघातात अपघातात एक महिला मृत्युमुखी पडली व चौघे जखमी झाले होते. न्यायालयाने याकरिता महापालिकेला दोषी ठरविले.
 
 
या अपघातानंतर रेल्वे तपासणी पथकाला असे आढळले की, या पुलाच्या दक्षिणेकडील ‘पेव्हरब्लॉक’-पदपथाखाली (3 मीटर रुंद व 40 मीटर लांब) किमान 60 ‘ऑप्टिकल फायबर’ वा ‘इलेक्ट्रिक केबल्स’ टाकलेल्या होत्या. हे केबल्सचे काम कोणी, केव्हा व कोणाच्या परवानगीने केले ते तपासणी पथकाला समजले नाही. या पदपथाखाली केबलचे वजन जास्त झाल्यामुळे कदाचित पदपथाची बाजू कोसळली असावी, असा तर्क आहे.
 
 
 

गोखले पुल 
 
 
 
पुलाचे पाडकाम
 
पूल कोणी पाडायचा, याबद्दलचा वाद शुक्रवार, दि. 11 नोव्हेंबरला मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत सोडवण्यात आला. पश्चिम रेल्वे प्रशासनातर्फे गोखले पुलाचे रेल्वेच्या हद्दीतील पाडकाम होणार असून या कामासाठी महापालिकेने निधी द्यावा, असे मागणीचे पत्र रेल्वेने महापालिकेला पाठविले आहे.
 
 
गोखले उड्डाणपूल पाडकामासाठी पश्चिम रेल्वेकडून निविदा जारी करण्यात आली आहे. यासाठी 17 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. दि. 2 डिसेंबरला ही निविदा खुली होईल. रुळांवरील गर्डरचा भाग पाडण्याकरिता 30 तासांच्या ‘मेगाब्लॉक’चे नियोजनही पश्चिम रेल्वेकडून सुरू आहे.
 
 
जानेवारी 2023 पासून पुलाचे किरकोळ काम पाडण्याचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. अंतिम टप्प्यात रुळावरील गर्डर हटविण्याच्या कामाकरिता लोकल व लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
 
 
पर्यायी मार्गांची वेगाने दुरुस्ती
 
गोखले पूल वाहतुकीसाठी बंद केल्यावर उपलब्ध असलेल्या पर्यायी मार्गांवप कोंडी होत असल्याने त्या रस्त्यावरील फेरीवाले व पार्क केलेल्या गाड्या यावर लक्ष केंद्रित करून त्या अडचणी हटविण्याकरिता कारवाई केली जात आहे. अतिशय वर्दळीच्या परिसरातील वाहतुकीला अडथळा येऊ नये म्हणून रात्री अतिरिक्त पथके नेमून 48 तासांत हे काम पूर्ण करण्यात आले. पर्यायी मार्गांच्या डागडुजीकरिता व पुनर्पृष्ठीकरण करण्यासाठी पलिकेने 25 कोटी रुपयांची निविदाही काढली आहे.
 
 
पर्यायी मार्ग कोणते?
 
खार सबवे, मिलन सबवे उड्डाणपूल, कॅप्टन गोरे (विलेपार्ले उड्डाणपूल) उड्डाणपूल, अंधेरी सबवे, बाळासाहेब ठाकरे (जोगेश्वरी) उड्डाणपूल, मृणालताई (गोरेगाव) उड्डाणपूल. गोखले पूल बंद झाल्याने ‘मेट्रो-1’च्या प्रवासीसंख्येत 11 हजारांनी वाढ झाली आहे. आझादनगर स्थानकावर प्रवासी 26 टक्क्यांनी वाढले, तर डीएननगर व आझादनगर स्थानकावरील संख्या 17 टक्क्यांनी वाढली आहे.
 
 
वाहतूक पोलिसांनी महापालिकेला सहा महिन्यांत पुलाची किमान एक तरी मार्गिका सुरू करा, ही विनंती केली आहे.
वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यास संबंधित यंत्रणांनी सुरुवात केली आहे. पूल बंद झाल्यामुळे या परिसरातील वाहतुकीचा पुढील सहा-सात दिवसांत अभ्यास करण्यात येणार आहे. कोणत्या भागात किती व कधी पोलीस तैनात करायचे, याचे नियोजन सुरू आहे. रस्त्याच्या कडेची वाहने हटविण्याची व्यवस्था झाली आहे. डीएननगर, जोगेश्वरी, ओशिवरा, सहार, वाकोला, सांताक्रुझ आणि गोरेगाव या सात विभागांवर ताण वाढला आहे. पोलिसांनी 200 वाहतूक वॉर्डन उपलब्ध करावे, अशी महापालिकेला विनंती केली आहे. या सात विभागांकरिता अतिरिक्त कुमक पुरविण्यात आली आहे.
 
 
नवीन पुलाचे संकल्पचित्र
 
पालिका गोखले पुलाचे बांधकाम करणार आहे व त्याकरिता पालिकेच्या हद्दीतील पाडकाम आणि पालिका व रेल्वे हद्दीतील नवीन बांधकामाकरिता पालिकेने निविदा मागविल्या आहेत व त्याचा अंदाजे खर्च 84 कोटी, 72 लाख रुपये होणार आहे. ‘आयआयटी’च्या ’स्ट्रक्चरल डिझाईन’प्रमाणे पूल उभारणीचे बांधकामाच्या कामासाठी 30 नोव्हेंबरला निविदांचे पाकीट उघडले जाणार आहे. पावसाळ्यासह येत्या आठ महिन्यांमध्ये पुलाचे काम पूर्ण करण्याची अट निविदेत समाविष्ट करण्यात आली आहे.
 
 
रेल्वेच्या अखत्यारितील पूल रेल्वेकडून तोडल्यानंतर हे काम पुढील पावसाळ्याच्या आतच पूर्ण करण्याचे पालिकेने लक्ष्य निर्धारित केले आहे. रेल्वेकडून तोडकाम होत असतानाच पालिकेकडून ’स्ट्रक्चरल डिझाईन’प्रमाणे बांधकामातील ‘प्रीफॅब्रिकेटेड’ व ‘प्रीकास्ट काँक्रीट गर्डर’ व इतर युनिट्स वर्कशॉपमध्ये सुरू केले जाणार आहेत. रेल्वेचे 90 मीटरचे पूलकाम नव्या वर्षात जानेवारीपासून रात्रीच्या वेळात ‘ब्लॉक’ घेऊन हटविण्यात येणार आहे. मार्च 2023 पर्यंत ते पूर्ण होईल व पालिकेकडे पुलाच्या उत्तरेकडील वाहन रस्त्याच्या भागाचे ‘गर्डर कास्टिंग’ तयार करून ते बसविण्याची जबाबदारी व ते मे 2023 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा राहणार आहे. या नियोजनाप्रमाणे वाहतुकीकरिता एक मार्गिका जून 2023 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.
 
 
हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी पालिकेकडून चाचपणी
 
हा पूल बंद ठेवण्यात आला असला, तरी तो पादचारी, दुचाकी तसेच हलक्या वाहनांसाठी पुलाच्या दक्षिणेकडील मार्गिकेवरून चालू ठेवता येईल का, याची चाचपणी पालिकेने सल्लागारांशी चर्चा करून सुरू केली आहे. पालिकेने व रेल्वेने काम होत असताना जीवितहानी होणार नाही, याची मात्र खबरदारी घ्यावी.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अच्युत राईलकर

गणित आणि भौतिकशास्त्रात बीएससी करुन त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केले. महानगरपालिकेपासून ते मध्य पूर्व तसेच थायलंडमध्ये बांधकामअभियंता म्हणून कार्याचा व्यापक अनुभव. पायाभूत सोयीसुविधा, शहरीकरण, संशोधनपर विषयात अभ्यासपूर्ण लेखनाचा प्रदीर्घ अनुभव.