मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या जनहितकारी योजनांपैकी विशेष चर्चेत आलेली 'लाडकी बहीण' योजना आता रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘लाडकी बहीण’ या शीर्षकाने मराठी चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली असून, या विषयावर आधारित हा पहिलाच सिनेमा असल्याने सर्वसामान्यांमध्ये याविषयी उत्सुकता वाढली आहे. महिलांच्या सक्षमीकरणाच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन व संकल्पना गणेश शिंदे यांनी मांडली असून, निर्मितीची धुरा शितल गणेश शिंदे, बाबासाहेब पाटील व अनिल वणवे या निर्मात्यांनी ओम साई सिने फिल्म्स व शुभम फिल्म प्रोडक्शनच्या माध्यमातून उचलली आहे.
सातारा येथे पार पडलेल्या मुहूर्त समारंभात सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते चित्रपटाच्या क्लॅपची सुरुवात करण्यात आली. या वेळी कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले, कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपाध्यक्ष पंकज चव्हाण, तहसीलदार व इतर मान्यवर उपस्थित होते. हा मुहूर्त केवळ औपचारिक नसून, एका योजनेंतून प्रेरित झालेल्या कथेला सादर करण्याची सुरुवात असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
या चित्रपटात अण्णा नाईक आणि लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या प्रमुख भूमिका असून, त्यांच्यासह मोहन जोशी, विजय पाटकर, माधव अभ्यंकर, शशांक शेंडे, अनिल नगरकर, सुरेखा कुडची, उषा नाडकर्णी, भारत गणेशपुरे, जयवंत वाडकर, प्रिया बेर्डे, सारिका जाधव, जयश्री सोनवले, रुक्मिणी सुतार यांसारखे अनुभवी कलाकार देखील सहभागी आहेत. ‘लाडकी बहीण’ केवळ योजना केंद्रस्थानी ठेवत नसून, एका कुटुंबातील कथा, संघर्ष, नात्यांची गुंफण आणि सशक्त स्त्री पात्राचं वास्तवदर्शी चित्रण करत असल्याचे निर्मात्यांचे म्हणणे आहे.
चित्रपटाचे छायांकन गजानन शिंदे करत असून, संगीत दिग्दर्शन विनीत देशपांडे यांच्याकडे आहे. प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते आणि आनंद शिंदे यांच्या दमदार आवाजात सादर होणारी गाणी या चित्रपटात विशेष आकर्षण ठरणार आहेत. पंकज चव्हाण नृत्यदिग्दर्शक म्हणून काम पाहत असून, प्रशांत कबाडे आणि शिवाजी सावंत कार्यकारी निर्मात्याच्या भूमिकेत आहेत.
'लाडकी बहीण योजना'ने महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवले. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या या प्रयत्नात सरकारच्या पाठबळाने अनेक कुटुंबांचे चित्र पालटले. या वास्तवावर आधारित कथा रुपेरी पडद्यावर मांडणे ही केवळ कलात्मक जबाबदारी नसून समाजप्रबोधनाचाही एक भाग असल्याचे मत दिग्दर्शकांनी मांडले आहे. सामाजिक विषयाची हळुवार मांडणी, कुटुंबप्रधान भावनिक छटा आणि मनोरंजनाची सांगड घालणारा हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात घर करेल, असा विश्वास निर्मितीसंस्थेला आहे.
'लाडकी बहीण' हा सिनेमा म्हणजे योजना, कुटुंब, संघर्ष आणि सशक्ततेची एक भावनिक कथा जी महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला आपली वाटेल.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.