बोटांनी व नखांनी गाठला कलेचा ‘सोपान’

    18-Nov-2022   
Total Views |
mansa


‘आला रे आला रंगारी आला’ म्हणून हेटाळणी व्हायची. परंतु, त्यांनी सातत्य ठेवत बोटं आणि नखांचा वापर करून आजपर्यंत हजारो चित्रे रेखाटली. जाणून घेऊया सोपान वासुदेव खंडागळे यांच्याविषयी...


बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील निमगावी जन्मलेल्या सोपान वासुदेव खंडागळे यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही स्वतःला सिद्ध केले. बोटांचा आणि नखांचा वापर चित्रकलेसाठीही होऊ शकतो, हे त्यांनी दाखवून दिले. त्यांचे बालपण प्रचंड गरिबीत गेले. आई-वडिलांचा लोहारकामाचा व्यवसाय असल्याने दिवसभरात मिळेल तेवढ्या पैशांत उदरनिर्वाह सुरू होता. निमगावच्या मराठी प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असताना कलेची पार्श्वभूमी नसतानाही सोपान यांना चित्रकलेची आवड निर्माण झाली. मातकामाची आवड असल्याने घरच्या घरी ते मूर्तीही बनवत. दुसर्‍या इयत्तेत असताना चित्रकला परीक्षेत त्यांनी तालुक्यातून दुसरा क्रमांक मिळवला.

पाचवी ते नववीपर्यंतचे शिक्षण महात्मा फुले हायस्कूलमध्ये त्यांनी घेतले. यावेळी कलाशिक्षक वामन ढगे यांनी सोपान यांना चित्रकलेसह अक्षरलेखनाचेही धडे दिले. त्यानंतर कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी छोटी-मोठी कामे करण्यास सुरूवात केली. गरज पडेल तेव्हा शेतात कापूस वेचायला जाणे, 50 रुपये दराने भिंती रंगवायला जाणे, तसेच शेतात मजुरीची कामेही त्यांनी केली. चित्र काढण्यासाठी आवश्यक पेपर आणण्यासाठी कित्येक मैल प्रवास करून खामगावला जावे लागत असे. ते शक्य नसल्याने सोपान यांनी चक्क लग्नपत्रिकांच्या कोर्‍या जागेत चित्रे काढण्यास सुरुवात केली.

समता महाविद्यालयात दहावी पूर्ण केल्यानंतर पुढे बाबासाहेब नाईक चित्रकला महाविद्यालयात वस्त्रकाम शाखेत त्यांनी प्रवेश घेतला. हलाखीच्या परिस्थितीमुळे तत्काळ नोकरी मिळावी, यासाठी त्यांनी चित्रकलेऐवजी वस्त्रकाम शिक्षणाचा अभ्यासक्रम निवडला. एकदा नखाने आणि बोटाने चित्र काढणारे इफ्तेखार अहमद राजा यांचा एक कार्यक्रम महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी काहीतरी वेगळं आहे आणि साहित्य कमी लागते, हे ओळखून सोपान यांनी त्याप्रमाणे घरच्या घरी सराव सुरू केला. शिक्षकांनीही त्यांना अनेक कामे मिळवून दिली. रंग नसतील तेव्हा शिक्षक स्वतः सोपान यांना मदत करत. ‘टेक्स्टाईल डिझायनर’ची पदवी घेतल्यानंतर ते नोकरीच्या शोधात थेट सुरतला आले. सुरुवातीचे तीन-चार महिने नोकरी मिळत नसल्याने ते त्यांची चित्रे सोबत घेऊन मंदिरामध्ये जाऊन बसत.

एकदा गुलाणे काकांनी त्यांना चित्राविषयी विचारणा केली. त्यावेळी त्यांनी सोपान यांना घरातील भिंतीवर चित्र काढून देशील का, असे विचारले. कामाची आणि पैशांची गरज असल्याने सोपान यांनी तत्काळ होकार दिला. भिंतीवर नखाने आणि बोटाने निसर्गचित्र काढल्यानंतर त्यांना त्या कामाचे 300 रुपये मिळाले. पुढे पैसे वाचवण्यासाठी त्यांनी दीड वर्षे अर्धा डब्बा खात होते. नंतर त्यांनी एका ‘टेक्स्टाईल’ कंपनीत चार हजार रुपये पगारावर नोकरी सुरू केली. पैसे येत गेले आणि परिस्थितीमध्ये सुधारणा होत गेली. पुढे त्यांनी चित्रकलेत सुधारणा केल्या. नव्या आणि आधुनिक चित्रकलेला समजून घेतलं.

बोटाने आणि नखाच्या साहाय्याने काढलेले त्यांचे चित्र एखाद्या छायाचित्रासारखेच वाटते. पुण्यात त्यांनी तांदळाच्या दाण्यापेक्षाही छोटे चित्र अवघ्या 40 सेकंदात काढले, ज्याची दखल ‘भारत बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’नेही घेतली. व्यक्तिचित्र, निसर्गचित्र, ‘अ‍ॅब्स्ट्रॅक्ट’, ’मॉर्डन आर्ट’, अक्षरलेखनासह भिंतीवरही सोपान बोटाने आणि नखाने चित्र अगदी सहज काढतात. आतापर्यंत त्यांनी तीन हजारांहून अधिक चित्रे काढली आहेत. सध्या ते शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वखर्चाने जातात.जे ‘इफेक्ट’ ब्रशने देता येत नाही, ते बोटांनी सहज देता येतात. अन्य चित्रांपेक्षा रंगाची, वेळेची आणि पैशांची बचत त्यामुळे होते. नखांना आणि हाताला रंग लागल्यानंतर ते हात धुणेही मोठी अवघड गोष्ट असते. परंतु, आतापर्यंत कधीही त्रास झाला नसल्याचे सोपान सांगतात.

“हा आयुष्यात काहीही करू शकत नाही, असे बोलले जायचे. गावात टिंगळटवाळी व्हायची. आला रंगारी भिंती रंगवायला, असे म्हणून हेटाळणी व्हायची. फक्त वेडं ठरवणं शिल्लक राहिले होते. पण, त्याकडे कधीही लक्ष दिले नाही. चित्र विकले जाईल किंवा नाही यापेक्षा जो आनंद मिळतो तो पैशांत न मोजता येणारा असतो. रंगात हात टाकला, तर पुनर्जन्म झाल्यासारखे वाटते,” असे सोपान सांगतात. “अशक्य काही नाही. सातत्य हवे. वडिलांनी नेहमी खंबीर पाठिंबा दिला. आधी वेळ होता, पण पैसे नव्हते. परंतु, आता पैसे आहेत तर वेळ नाही,” अशी खंतही सोपान व्यक्त करतात.

आपली नोकरी सांभाळून ते चित्रकलेची आवड जोपासत आहेत. सोपान यांना महादेव गोपाळे, प्रा. उज्ज्वल दीपके, प्रवीण बाळापुरे, विनोद वानखेडे, किरण तायडे, वामन ढगे, प्रमोद खंडागळे यांचे मोलाचे सहकार्य लाभते. भविष्यात चित्रांच्या विक्रीतून मिळालेल्या पैशांतून समाजसेवा करण्याचा त्यांचा मानस आहे. लहानपणी आई-वडिलांना लोखंडाला आकार देताना पाहणार्‍या सोपान यांनी मोठेपणी मात्र बोटाने आणि नखांनी चित्रे काढण्याचा ध्यास घेतला. केवळ ध्यास नाही तर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांच्या आगामी वाटचालीला दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा...!


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.