आदित्यजी, खोक्यांमधून बाहेर या!

    27-Oct-2022   
Total Views |
 
आदित्य ठाकरे
 
 
 
 
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सत्ता हातची गेल्यानंतर शेतकर्‍यांचा कळवळा दाटून आला आणि त्यापाठोपाठ पुत्र आदित्य ठाकरेंनाही शेतकर्‍यांची एकाएकी चिंता भासू लागली. उद्धव ठाकरे हे अवघ्या काही तासांसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या बांधावर गेले. गेली अडीच वर्ष ‘फेसबुक सरकार’ चालवणारे उद्धव अचानक शेतकर्‍यांच्या बांधावर प्रकट झाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवून आता त्यांचे पुत्र आदित्यही नाशिक जिल्ह्यातील सोनारी, धामणगाव, पांढुर्ली अशा अनेक गावांमधील शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी त्यांच्या बांधावर गेले. परंतु, युवराजांनी पाहणी कमी आणि राजकीय उजळणीच भरमसाठ केली. मागे वळून पाहता, नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा करूनही महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षे शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली.
 
 
 
परंतु, यंदाच्या दिवाळीपूर्वीच फडणवीस-शिंदे सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी करत तब्बल 6 लाख, 90 हजारांहून अधिक शेतकर्‍यांच्या खात्यात अडीच हजार कोटी रुपये जमा केले. अवघ्या एका क्लिकवर ही मदत थेट शेतकर्‍यांच्या बँक खात्यात पोहोचल्याने शेतकर्‍यांची यंदाची दिवाळी गोड झाली. त्याचप्रमाणे राज्यात जून ते ऑगस्टदरम्यान अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे नुकसानग्रस्त 25 लाख, 93 हजारांहून अधिक शेतकर्‍यांना तब्बल 3 हजार, 501 कोटींची मदत जाहीर करण्यात आली. ठाकरे आणि फडणवीस-शिंदे सरकार यामध्ये कुणी किती मदत केली हे सर्वांसमोर आहेच. परंतु, सत्ता गेल्यानंतर शेतकर्‍यांचा बांध आठवला हेही नसे थोडके! तिथे जाऊनही आदित्य यांनी हे घटनाबाह्य, 50 खोक्यांचं सरकार आहे, शेतकर्‍यांचा आवाज दाबला जातोय, अशी टीकाटिप्पणी केली. तसेच, वातावरणीय बदलामुळे शेतकर्‍यांचे हाल होत असल्याचा साक्षात्कारही त्यांना झाला. बांधावर जाऊन पाहणी केली त्यात काही वावगे नाही. परंतु, तिथे जाऊनही राजकीय घोकंपट्टीच! स्वतः सत्तेत असताना चुना लावला आणि आता बांधावर जाऊन चमकोगिरी आणि बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच हा प्रकार! आदित्यजी, आता तुम्ही सत्तेत नाही, अन्यथा बांधाऐवजी पाहणीही ऑनलाईन झाली असती. तेवढं खोक्यांमधून बाहेर पडा!
 
 
खुर्ची बदलली, पण सवयीचं काय?
 
 
 
आम्ही आता बदलतोय,’ असे सांगितले तर गेले. परंतु, सवयीला औषध नसते हेच खरे. गांधी परिवार आणि काँग्रेस तरी त्याला अपवाद कसा ठरेल म्हणा. खुर्च्या बदलल्या, मात्र सवयी त्याच! नुकत्याच काँग्रेस मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची शपथ घेतली. या सोहळ्यात काँग्रेसने अध्यक्ष भले बदलला, परंतु, सवयी त्याच ठेवल्याचे दिसून आले. धक्कादायक बाब म्हणजे, 1984 साली झालेल्या शीख दंगलीचे आरोप असलेला काँग्रेस नेता जगदीश टायटलर या शपथविधी सोहळ्याला हजर होता. टायटलर यांना दिलेल्या आमंत्रणामुळे आजही ते काँग्रेसला प्रिय असल्याचे यावरून स्पष्ट झाले. खर्गे अध्यक्षपदाची शपथ घेण्याच्या सोहळ्यातील फोटो दिल्ली भाजपचे प्रवक्ते तजिंदर बग्गा यांनी ट्विट केला असून त्या फोटोत टायटलर स्पष्टपणे दिसत आहे. 1984च्या शीख दंगलीचे आरोप असणार्‍या टायटलरला अजूनही काँग्रेस मान-सन्मान देत असून त्यावर भाजपने मात्र टीका केली आहे.
 
 
 
बग्गा यांनी ट्विट केलेल्या फोटोत मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मीरा कुमार यांच्या मागच्या खुर्चीवर टायटलर बसलेला दिसत आहे. नानावटी आयोगानुसार, दंगलीच्या आरोपींमध्ये काँग्रेसचे माजी खासदार जगदीश टायटलरलाचाही समावेश होता. टायटलरने लाय डिटेक्टर टेस्टलाही नकार दिला होता. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर भडकलेल्या शीख दंगलीत तब्बल 2800 हून अधिक जण मारले गेले होते. यात काँग्रेस नेता सज्जन कुमार आणि जगदीश टायटलरवर दंगल भडकावण्याचा आरोप लावण्यात आला होता. त्यातील सज्जन कुमार याला आजीवन तुरूंगवासाची शिक्षा मिळाली असून अन्य आरोपींना आजीवन कारावासाची शिक्षा मिळाली. ‘संपुआ-2’च्या कार्यकाळात ‘सीबीआय’ने टायटलरला क्लीनचीट दिली होती. परंतु, या अहवालाला सत्र न्यायालयाने नाकारत चौकशी करण्यास सांगितले होते. दरम्यान, टायटलरशी सर्व संबंध तोडण्याचे सांगूनही काँग्रेसने त्यांना कधीही दूर केले नाही. जानेवारी 2019 मध्ये माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर टायटलरला कार्यक्रमात आमंत्रण दिल्याने काँग्रेसवर मोठी टीका झाली. त्यामुळे काँग्रेसचं टायटलर प्रेम अद्याप तसूभरही कमी झाले नाही, हेच खरे!
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.