मुंबई(प्रतिनिधी) (बिबट्या) : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत असलेल्या आरे दुग्ध वसाहतीत सोमवारी दि. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी बिबट्याच्या हल्ल्यात एका दोन वर्षाच्या चिमुकलीच्या मृत्यू झाला आहे. आरे कॉलनीतील युनिट १५ मधील पाड्यात सकाळच्या वेळी सकाळी साडे सहाच्या सुमारास ही चिमुकली आपल्या आई सोबत घरी जात होती. दिवाळीचा पहिला दिवस असल्याने घराच्या आवारात दिवे लावून ही मुलगी घरी परतत असताना बिबट्याने तिच्यावर हल्ला केला.
परंतु, हे आपले सावज नाही असे लक्षात आल्यावर बिबट्याने तिला सोडून दिले. त्यानंतर स्थानिक वन प्रशासनाने या मुलीला रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी या घटनेमुळे परिसरात शोकाकुल वातावरण आहे. सामान्यतः बिबट्या आपल्या दृष्टीक्षेपाच्या खाली म्हणजेच लहान असलेल्या प्राण्यांवर हल्ला करतो. बिबट्याच्या गैरसमजामुळे त्याने चिमुकली वर हल्ला केला असावा असे सांगण्यात आले आहे. या भागात वन विभागाकडून जनजागृतीसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. तसेच या बिबट्याला पकडण्यासाठी जागोजागी कॅमेरा ट्रॅप आणि पिंजरे लावण्यात आले आहेत, तथा वनरक्षक तैनात करण्यात आले आहे आहेत. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि याची पुनरावृत्ती होणार नाही याची संपूर्ण दक्षता वन विभागाकडून घेतली जाईल अशी ग्वाही तुळशी रेंजचे वन परिक्षेत्र अधिकारी दिनेश देसले यांनी दिली.