ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात नालेसफाईत हातसफाई होत असल्याची पोलखोल भाजप आणि राष्ट्रवादीने केल्यानंतरही ठेकेदारांकडुन ठाणेकरांच्या जिविताशी खेळ सुरुच आहे. शहरातील अनेक नाल्याची सफाई केल्यानंतर नाल्यातील गाळ नाल्यांच्या काठावर काढुन जैसे थे ठेवल्याने ऐन पावसाळ्यात पुन्हा नाले तुंबण्याचा धोका निर्माण झाला आहे.सोमवारी दस्तुरखुद्द ठामपा आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांच्या दोऱ्यात ही बाब स्पष्ट झाल्याने मनपा अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा समोर आला आहे.तर,रस्तोरस्ती डागडुजीच्या कामामुळे पावसाळा सुरु झाला तरी शहरातील ३०६ छोट्या-मोठ्या नाल्यांच्या सफाईची कामे ठेकेदारामार्फत सुरूच आहेत.
सोमवारी या नालेसफाईची तसेच रस्ते दुरुस्तीच्या कामांची पाहणी ठाणे मनपा आयुक्त डॉ.शर्मा यांनी करून नालेसफाईचा आढावा घेतला.यापुर्वी महापौरानी पाहणी दौरा करून ७० टक्के नालेसफाईचा दावा करीत पावसाळ्यापुर्वी नालेसफाई पुर्ण करण्याचे आदेश दिले होते.तर,भाजपा ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आ.निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर आदींनीही नालेसफाईची पोलखोल करून संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती.त्यानंतर,सोमवारी आयुक्त डॉ.शर्मा यांनी नालेसफाईचा आढावा घेतला असता अनेक गंभीर बाबी समोर आल्या.ठेकेदारानी नाल्याची सफाई करून नाल्याबाहेर गाळ तसाच ठेवल्याचे समोर आले आहे. कामगार हॉस्पिटल नाल्याचे रुंदीकरण करण्यासोबतच नालेसफाईची अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करून सुकलेला गाळ त्वरित उचलण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान ज्ञानेश्वरनगर, इंदिरानगर रोड क्र. २२, साठेनगर येथील रस्त्याच्या कामाची पाहणी करून पावसाळ्याच्या पूर्वी रस्त्याचे कॉक्रीटीकरण पूर्ण करण्यासोबतच रस्त्याच्या बाजूला असणारे मातीचे ढीग, कचरा तात्काळ साफ करून नवीन दुभाजक बसविण्याचे आदेश आयुक्तानी संबंधित विभागास दिले.
पहिल्याच पावसाने रस्त्यावर चिखलाचा सडा
ठाण्याच्या मनोरमानगर भागात जेव्हीएम स्पेस या विकासकाच्या माध्यमातून कन्स्ट्रक्शनचे काम चालू आहे.या कामाचे डंपर रस्त्यावरून ये - जा करत असल्यामुळे रस्त्यावर चिखल होत आहे.नुकत्याच पडलेल्या पावसामुळे येथील सर्व रस्ते चिखलमय झाले.त्यामुळे या निसरड्या रस्त्यांवरून पादचाऱ्यांना चालणे व दुचाकीस्वारांना गाडी चालवणे कठीण झाले असल्याने पालिकेने संबंधितांवर कारवाई करावी.अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ठाणे उपशहर अध्यक्ष प्रमोद पत्ताडे यांनी केली आहे.