गिधाडांचा रक्षक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-May-2021   
Total Views |
vulture_1  H x


गिधाडासारख्या नामशेष होत असलेल्या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी आयुष्य वेचून रायगडमध्ये त्यांची संख्या स्थिर करणारे वन्यजीव अभ्यासक प्रेमसागर मेस्त्री यांच्याविषयी...

 
 
मुंबई (अक्षय मांडवकर) -  पक्षिनिरीक्षणाचा छंद आपल्यापैकी बर्‍याच जणांना असतो. मात्र, या माणसाने पक्षी संवर्धनाच्या माध्यमातून कोकणातील रायगड जिल्ह्यातून पक्ष्याची एक प्रजात नामशेष होण्यापासून वाचवली. निसर्गाचे स्वच्छतादूत असलेल्या गिधाडांचा हा रक्षक. रायगड जिल्ह्यातून गिधाडांची कमी होणारी संख्या निदर्शनास आल्यावर मोठ्या ध्यासाने त्यांनी या पक्ष्याच्या संवर्धनाला सुरुवात केली. स्थानिकांमध्ये या पक्ष्याविषयी जनजागृती केली. मायेने जखमी गिधाडांचा सांभाळ करून त्यांना निसर्गमुक्त केले. या अथक प्रयत्नांमुळे गिधाडांची संख्या 22 ते 350 पर्यंत वाढली. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर रायगडमधील गिधाड संवर्धन कार्याचे सादरीकरण केले. गेल्या 20 वर्षांपासून गिधाड संवर्धनासाठी झटणारा हा माणूस म्हणजे प्रेमसागर मेस्त्री.
 
 
 
 
मेस्त्री यांचा जन्म दि.4 डिसेंबर, 1970 रोजी रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये झाला. निसर्गाच्या सान्निध्यातच जन्मल्याने निसर्गाची गोडी लागणे साहाजिकच होते. बालपणीच्या सुरुवातीच्या काळातच मेस्त्री यांना पक्ष्यांमध्ये रस निर्माण झाला तो रूपा टिपणीस - दवणे यांच्या बरोबर पक्षिनिरिक्षण भटकंती करताना.' द बर्डस ऑफ इंडियन सबकाँटिनंट ' या पुस्तकाने पक्षांकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळाला. या पुस्तकात लेखक मार्टिन वूडकोक आणि पिटर स्कॉट यांच्या पेंटिंग केलेल्या चित्रांनी ते विशेष प्रभावित झाले. मित्रांसमवेत निसर्ग सहलींना जाणे,पक्ष्यांना ओळखणे आणि त्यांची नोंद चित्र काढून पोस्टकार्ड द्वारे मुंबई ला रूपा यांना कळविणे असा अभ्यासाचा छंदच त्यांना जडला. याच आवडीमुळे महाविद्यालयीन शिक्षणही त्याच अनुषंगाने विज्ञान शाखेत सुरू झाले. ठाणे काॅलेजमधून त्यांनी १९९२ साली पदवी आणि पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले. ठाणे कॉलेजच्या प्राचार्या डॉ माधुरी पेजावर यांनी तसेच आयसर पुणे संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ मिलिंद वाटवे यांच्या मर्गदर्शनाने पक्षांचे शास्त्रीय संशोधन सुरू झाले. बगळे या पक्षावरील पहिला प्रबंध त्यांनी सादर केला . याच वेळीं १९९७ साली महाड सारख्या गावात कोंकण पक्षीमित्र संमेलन आयोजित केले . या मध्ये त्यांना महाराष्ट्र आणि इतर राज्यांत पक्षांबद्दल चालणाऱ्या शास्त्रीय संशोधन कामाची माहिती मिळाली. पक्षांचे अधिवास नष्ट होण्याच्या घटना आणि पक्षी प्रजात नामशेष होण्यापासून वाचविण्याचे प्रयत्न करणाऱ्या जेराल्ड ड्युरेल या ऑस्ट्रेलियाच्या अवलिया बद्दल माहिती मिळाली आणि आपल्याला नेमक हेच करायचंय हे पक्क झालं. रायगड जिल्ह्यातील बगळ्यांची घरटी वाचविणे, तुरेवाला शहाबाज गरुड , समुद्री गरुड , तीसा गरुड , सर्प गरुड अशा पक्ष्यांना वाचविण्यात यशस्वी प्रयत्न चालू झाले. पदव्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी बी.एडचे शिक्षण घेतले. या शिक्षणानंतर त्यांचा शिक्षक म्हणून प्रवास सुरू झाला. मेस्त्रींनी संपूर्ण भारतभरात शिक्षकाच्या नोकरीच्या अशा संधी शोधल्या, जिथे ते पक्ष्यांच्या विविध प्रजातींचा आणि अधिवासांचा अभ्यास करू शकतील.
 
 
 
vulture_1  H x
 
(मंगोलिया देशातील सिनेरीयस गिधाडं स्थलांतर संशोधन मोहिमेत डॉ केव्हिन Denver zoo यांच्यासमेवत प्रेमसागर मेस्त्री) 
 

मेस्त्रींनी उत्तराखंड, उत्तरांचल, मध्य प्रदेश, पंजाब आणि देशाच्या दुर्गम भागांत पक्ष्यांचा अभ्यास केला. सोबतच त्या-त्या ठिकाणी शिक्षकाची नोकरी करुन आपले अर्थार्जन सुरू ठेवले. 1998 मध्ये नोकरी सोडून ते पुन्हा रायगडमध्ये परतले. मात्र, या संपूर्ण कालावधीत त्यांना अनुभव तर मिळालाच, सोबतच पक्ष्यांविषयी सखोल अभ्यास करायला मिळाला. परतल्यानंतर त्यांनी पक्षी संवर्धन क्षेत्रात काम केलेल्या तज्ज्ञांशी संवाद सुरू ठेवला. तसेच संशोधन कार्यासाठी परदेश दौरे केले. अर्थार्जनासाठी त्यांनी कोकणात येणारे पर्यटक आणि निसर्गप्रेमींसाठी कार्यशाळा आणि सहलींचे आयोजन करण्यास सुरुवात केली. त्यांना या भागामध्ये आढळणार्‍या पक्ष्यांविषयी माहिती दिली.
 
 
 
 
महाराष्ट्रातून गिधाडे नामशेष होत असल्याची बातमी मेस्त्रींनी एका वर्तमानपत्रामध्ये वाचली आणि त्यानंतर सद्यस्थितीत त्यांच्याकडून सुरू असलेल्या कामाला आकार मिळण्यास सुुरुवात झाली. गिधाडांच्या संख्येत इतक्या मोठ्या प्रमाणात घट होण्यामागील कारण शोधून त्यांचे संवर्धन करण्याचे त्यांनी ठरवले. त्यासाठी मेस्त्रींनी 1999 साली ’सोसायटी ऑफ इको-एन्डेन्झर्ड स्पिसीज कॉन्झर्वेशन अ‍ॅण्ड प्रोटेक्शन’ (सिस्केप) या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. या माध्यमातून म्हसाळा, श्रीवर्धन, चिरगाव या तालुक्यात सर्वेक्षण केले. सर्वेक्षणाअंती अपुरे अन्न आणि अधिवास नष्टतेमुळे गिधाडांची संख्या कमी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांना या भागामध्ये केवळ 22 गिधाडे आणि त्यांची घरटी आढळून आली. त्यामुळे त्यांनी गिधाडांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करुन त्यांच्या संवर्धनाचे काम सुरू केले.
 
 
 
vulture_1  H x  
 
(चिरगाव ग्रामस्थ गिधाडाला निसर्गमुक्त करताना)
 
 
मेस्त्रींनी गिधाड संवर्धनाच्या कामाला सुरुवात केल्यानंतर पुढल्या पाच वर्षांमध्ये गिधाडांच्या अधिवास क्षेत्रात गावकर्‍यांच्या मदतीने सुमारे 50 हजार वृक्षांचे रोपण केले. संवर्धन कार्यात स्थानिकांची मदत मिळवण्यासाठी त्यांना गिधाडांचे महत्त्व आणि संरक्षणाची गरज समजवण्यात आली. सोबतच देवरायांचा शोध घेऊन गिधाडांना राहण्यायोग्य अधिवास निर्माण करता येऊ शकेल का, यासाठी प्रयत्न करण्यात आला. अधिवासाचे पुनर्संचयन करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. वडघर, नाणेमाची, खामगाव, चीरगाव आणि आसपास भागामध्ये गिधाड संवर्धन कार्याचा विस्तार करण्यात आला. मेस्त्रींनी चिरगाव, खामगाव, गोवले आणि कुमशेत भागातील हरित क्षेत्रांना राखीव वनांचा दर्जा मिळवून देण्यासाठी वन विभागाकडे पाठपुरावा केला. या सगळ्या कामांमुळे हरित क्षेत्राचे संवर्धन झाले. ज्यामुळे ३४ देवराया संरक्षित झाल्या आणि त्यामध्ये गिधाड, धनेश आणि घुबडांचा अधिवास निर्माण झाला.
 
 
 
 
गिधाड संवर्धन कार्याकडे शहरवासीयांना आकर्षित करुन जनजागृती करण्यासाठी मेस्त्रींनी निसर्ग शिबीर आणि सहलींच्या आयोजनास सुरुवात केली. त्यांनी शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांमध्ये व्याख्याने दिली. प्राणीशास्त्र आणि जीवशास्त्राचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचले. गिधाडांविषयी या विद्यार्थ्यांना संशोधन प्रबंध तयार करण्यासाठी मदत केली. गिधाडांच्या अधिवासाच्या संवर्धनाबरोबरच त्यांच्या अन्नसुरक्षेच्या दृष्टीनेदेखील मेस्त्रींनी काम केले. गिधाडांना सुरळीत अन्नपुरवठा करण्यासाठी गावकर्‍यांचे जाळे तयार केले. प्रवासादरम्यान आजबाजूला कुजलेला मृत प्राणी दिसल्यास त्यासंबंधी माहिती देण्याची विनंती प्रवाशांना केली. यामुळे गावकर्‍यांनी आपली मेलेली जनावरे गिधाडांना टाकण्यास सुरुवात केली. त्याचा आर्थिक मोबदला त्यांना मिळाला. या कामामध्ये संथपणा आल्यावर मेस्त्रींनी स्वत: बाजारामधून मांस विकत घेतले आणि ते गिधाडांना टाकले.
 
 
vulture_1  H x
 
 ( चिरगावं गिधाड अभ्यास संशोधन सवर्धन केंद्र)



या कामांव्यतिरिक्त मेस्त्री यांनी २०१२ पर्यंत १७ गिधाडांचा बचाव केला आहे. संवर्धन आणि संरक्षण कामामुळे तालुक्यांमधील गिधाडांची संख्या २०१९ साली ३४७ पोहोचली. मात्र, निसर्ग चक्रीवादळामुळे गिधाडांचा मृत्यू होऊन ही संख्या २४९ पर्यंत रोडावली. यानंतर मेस्त्रींनी पुन्हा एकदा गिधाड संवर्धनासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी त्यांना ४३ स्वयंसेवकांची मदत मिळत आहे. लाॅकडाऊनचा फटकाही त्यांचा कामाला बसला आहे. मृत गुरांची माहिती मिळत नसल्याने खाण्याचा अभाव निर्माण होत आहे.परंतु, मेस्त्रींनी हार न मानता बॅकेमधून कर्ज काढून हे काम सुरू ठेवले आहे. जागतिक शिकारी पक्षी परिषद (ARRCN) या संस्थेच्या माध्यमातून डेनव्हर झू या अमेरिकेतील संस्थेने मंगोलिया देशातील सिनेरियस काळे मोठे गिधाड या गिधाड प्रजाती शास्त्रीय संशोधन मोहिमेकरता आमंत्रित केले. 'रेडिओ टेलिमेट्री प्रोग्राम ऑन सिनेरियस व्हलचर' या प्रकल्पअंतर्गत ही गिधाडे भारतात कशी स्थलांतर करतात आणि त्यांचे मार्ग शोधण्याचे काम करण्याची संधी त्यांना मिळाली. रशियातील रशियन शिकारी पक्षी वैज्ञानिक संशोधन मोहिमेत देखील शिकारी पक्षी स्थलांतर अभ्यास मोहिमेत त्यांचा सहभाग असतो. या अनुभव ज्ञानाचा फायदा करियर म्हणून आजच्या तरुण पिढीला व्हावा यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. या कार्याची दाखल घेत शासनाने त्यांना महाराष्ट्र राज्य वन विभाग मानद वन्यजीव रक्षक असे पद देऊन या कार्याचा गौरव केला आहे. मोठ्या जिद्दाने गिधाड संरक्षणाचे काम करणाऱ्या मेस्त्रीं आणि त्यांच्या टीमला पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा !
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@