मुंबई (प्रतिनिधी) - भंडारा जिल्ह्यातील गराडा/बूज गावाजवळील एका उपसा सिंचनाच्या विहिरीमध्ये बुधवारी सकाळी वाघाचे दोन बछडे मृतावस्थेमध्ये आढळून आले. विहिरीला कठडा नसल्याने या बछड्यांना आपल्या जीवाला मुकावे लागले. वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा कठडे नसलेल्या विहिरींमध्ये पडून मृत्युमुखी पडणाऱ्या वन्यजीवांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पहाटे धावण्यासाठी गेलेल्या तरुणांना गराडा/बूज गावाच्या तलावाजवळ टेकेपार उपसा सिंचनच्या विहरीमध्ये वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले. याची माहिती वन विभागाला मिळताच अधिकारी त्याठिकाणी आले. त्यांनी विहिरीमधून दोन बछड्यांचे मृतदेह बाहेर काढले. घटनास्थळी विहिरीजवळ वाघिणीचे पगमार्क आढळून आले आहेत. त्यामुळे तिने पिल्लांना विहिरीबाहेर काढण्यासाठी प्रयत्न केल्याची शक्यता आहे. मंगळवारी भंडारा जवळील बेला येथे वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले होते. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे उपसा विहिरीत सहा फुटांपर्यंत पाणी भरले होते. त्यामुळे विहिरीत पडल्यानंतर पाण्यात बुडून पिल्लांचा करुण अंत झाला. बछडे मादी प्रजातीचे असून त्यांचे वय दोन महिने होते.